प्रश्न – हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवीदेवतांची आराधना केली जाते. वस्तुतः ईश्वर एक आहे की अनेक?

अम्मा – हिंदू धर्मात ईश्वर अनेक नाहीत. हिंदू धर्मात एकाच ईश्वरावर विश्वास ठेवला जातो. एवढेच नाही तर हिंदू धर्म अशी घोषणा करतो की संपूर्ण ब्रह्मांडात ईश्वराहून भिन्न असे दुसरे काहीच नाही. दृष्यमान जगतातील ही सर्व भिन्नभिन्न नामरूपे ही त्या एकमेव परमात्म्याचीच अभिव्यक्ती आहे.

ईश्वर सर्वव्यापी चैतन्य आहे. तो नामरूपांच्या अतीत आहे. परंतु भक्तांवर अनुग्रह, कृपा करण्यासाठी आपल्या इच्छेनुसार तो कोणतेही रूप धारण करु शकतो, नानाविध भाव धारण करु शकतो. हवा मंद मंद झुळकीच्या स्वरूपात वाहू शकते, सोसाट्याच्या वाःयाच्या रूपात वाहून धुराळा उडवू शकते आणि चक्री वादळाच्या रूपात वाहून आपल्या बरोबर काहीही उडवू शकते. तर मग या हवेचा नियंता कोणते रूप धारण करु शकणार नाही? त्याच्या ऐश्वर्याचे वर्णन कोण करु शकेल? ईश्वर सगुण व निर्गुण असे दोन्ही भाव स्वीकारु शकतो, जसे वायू स्तब्धही राहू शकतो, आणि शक्ति शाली स्वरूपही धारण करु शकतो; जसे पाणी वाफ बनू शकते तसेच बर्फही बनू शकते. त्याचप्रमाणे सर्वेश्वराची शिव, विष्णू, गणेश, कार्तिकेय, दुर्गा, सरस्वती, काली इत्यादी नाना रूपांत आराधना केली तरी तत्वतः ती एकाच परमात्म्याची आराधना ठरते.
प्रत्येकाची आवडनिवड, रुचि निरनिराळी असते. प्रत्येकाचे संस्कार भिन्न असतात व प्रत्येकाचे संगोपनही वेगवेगळ्या वातावरणात झालेले असते. म्हणून हिंदू धर्म आपल्या अनुयायांना त्यांची मानसिक जडण घडण, आवडनिवड व आध्यात्मिक उन्नतीच्या स्तरानुसार कोणत्याही भावांत, कोणत्याही रूपात ईश्वराची आराधना करण्याचे स्वातंत्र्य देतो. हिंदू धर्मात ईश्वराच्या नानाविध भावरूपांची उत्पत्ती याच स्वातंत्र्याचे फलस्वरूप आहे. ते भिन्न ईश्वर नसून एकाच ईश्वराचे भिन्न भिन्न भाव आहेत.

आत्मस्वरूपी व प्रेमस्वरूपी सर्वांना नमस्कार.

माझ्या मुलांनो! मानवाला मानसिक शांती मिळविण्यास मदत व्हावी म्हणून धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांची सुरुवात केली गेली होती. परंतु त्यांचा वांछित परिणाम मिळत असल्याचे कुठे दिसून येत नाही, आणि त्यासाठी दोषी आहे मानवाचा पैशाचा अती लोभ. पैसा व भोगविलासावरच सारे लक्ष केन्द्रित केल्याने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ काय आहे याचाच मुळी विसर पडला आहे. जीवनाला जीवन देणा-या प्रेमाचा आपल्याला साफ विसर पडला आहे.

देवाने आपल्याला मानव जन्म देऊन विकसित व विशाल होण्याची एक अमूल्य संधी दिली आहे. आपले विचार व कर्म जीवनाला एक सुव्यवस्थित स्वरूप व शुद्धता देऊन जीवनाला अर्थ प्रदान करतात. परंतु दुर्दैवाने आज आपण जीवनाला एकमेव अर्थ दिला आहे- ‘पैसा कमविण्याची संधी.’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मानव कोणत्याही भल्याबु-या साधनांचा उपयोग करण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत उच्च नैतिक मूल्यांचे जे पतन होत आहे ते पाहून आश्चर्य वाटू नये.

अध्यात्म, पैसे कमविण्याच्या वा इच्च्छापूर्तीच्या विरुद्ध नाहीये. परंतु आपण एक संतुलित दृष्टिकोन बाळगावा अशी रास्त अपेक्षा अध्यात्माकडून बाळगली जाते. संपत्ती व मानवता तराजूच्या दोन पारड्यासारखे आहेत. त्यांच्यात संतुलन राहील याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. तेवढ्यासाठीच आपल्या ऋषिमुनींनी अर्थ व कामाच्या तुलनेत धर्माला अधिक महत्व दिले आहे. धर्माचा बळी देऊन अर्थ-काम कदापि मिळवू नये असे बजावले आहे.

समाजातील जीवनमूल्यांचा -हास थांबविण्यासाठी परिवर्तन अत्यंत आवश्यक आहे. तथापि हे परिवर्तन मुख्यतः आंतरिक असले पाहिजे. आपल्या नकारात्मक वृत्तींना सद्गुणांमध्ये परिवर्तित केले पाहिजे. जर आपण स्वतः या परिवर्तनासाठी तयार नसू तर निसर्ग वा देव ती कामगिरी पार पाडेल. ईश्वर दुष्ट प्रवृत्तींची अधिक वाढ होऊ देणार. उदार व्यक्तींचा समाज निर्माण करणे ही आज काळाची गरज झाली आहे.
शिक्षण – मुलांवर उच्च जीवनमूल्यांचे संस्कार बालपणांतच करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. स्पर्धेच्या नावावर मुलांमध्ये द्वेष व घृणा वाढू देऊ नये. आपण त्यांना परस्परांवर प्रेम करण्याचे शिकविले पाहिजे. शाळा कॉलेजातील अभ्यासक्रमात प्रेम व कारुण्याच्या पाठांचा समावेश असला पाहिजे. यातून पददलित वर्गाचे दुःखकष्ट व शोषण दूर करण्यास मदत होईल, युद्ध व हिसक संघर्ष कमी होतील व विश्वशांतीचे आपले स्वप्नही काही प्रमाणात साध्य होईल. परस्पर प्रेम वाढल्यावर निसर्गही शांत होईल.

सच्चे सुख आपल्या स्वतःच्या मनाला समजावून घेतल्यावरच येऊ शकते. जोपर्यंत आपण स्वतःच आपल्या दुर्बल मनाने निर्माण केलेल्या अंधार कोठडीत बंद राहण्याचा निश्चय केला आहे तोपर्यंत कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही. आपल्याकडे इतर कितीही साधनसंपत्ती असली पण जर आपल्या स्वतःच्या मनाचाच कृपाशीर्वाद नसेल तर आपण सुखी होऊ शकणार नाही. खरेतर सुखी होणे फारसे अवघड नाही, त्यासाठी फक्त एकच वस्तू हवी आणि ती आहे प्रेम! प्रेम जीवनाचा केन्द्रबिदू आहे. आपली सर्व कर्म या बिदूवर लक्ष केन्द्रित करुनच पार पाडली पाहिजेत, तेव्हाच आपण स्वतःही प्रेमाचा अनुभव करु शकू, आणि हे प्रेम इतरांनाही वाटू शकू. आज आपल्या जीवनात इतर सारंकाही आहे, पण शुद्ध प्रेम नाहीये. म्हणूनच सगळीकडे सहृदय मनुष्य कमी होऊन त्यांच्या जागी हृदयशून्य यंत्रमानव जन्माला येत आहे. आपल्या सर्वात जवळची वस्तू असलेले प्रेम आज आपल्यासाठी सगळ्यात दूरचे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी एक महिला दर्शनासाठी आली होती. तिच्या पतीला पक्षवात झाला आहे. शेजाःयांच्या घरी धुणीभांडी करुन ती महिला कसेतरी घर चालवत आहे. ते कुटुंब मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. माझ्या मुलांनो! हे एक उदहारण आहे. लाखो परिवारांची हीच कहाणी आहे. आणि दुसरीकडे कितीतरी लोक ऐषारामी जीवन जगत आहेत. आलिशान पार्ट्यांमध्ये मद्यप्राशन करुन पैसा बरबाद करीत आहेत. अनेक लोक दुष्कर्मात गुंतले आहे. केवळ स्वतःच्याच स्वार्थाचा विचार करीत आहेत. आणि त्याचवेळी दुसरीकडे अनेक लोक एकवेळच्या जेवणालाही महाग झाले आहेत. आपल्या इच्छाआकांक्षा पूर्ण करुन सुखाच्या शोधात मग्न असणा-या आपल्या मनात त्या बिचाःया गरीबांचा क्षणभर तरी विचार येतो का? माझ्या मुलांनो! अशा अभागी लोकांचा तुम्ही आधी विचार केला पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्यास तयार झाले पाहिजे. आपल्या स्वतःच्या सुखाचा मार्ग त्यातूनच जाणार आहे हे लक्षात घ्या. ॐ

प्रश्न – “अम्मा, जेव्हा जेव्हा मला तणावाच्या परिस्थितींना तोंड द्यावे लागते त्यावेळी मला अत्यंत असहाय्य व गोंधळल्यासारखं वाटतं. या परिस्थितीत मी काय करावं असं तुम्हाला वाटतं?

अम्मा – “माझ्या मुलांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला संकटाशी, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तुमची पहिली उपजत प्रतिक्रिया असते ती त्या परिस्थितीला पाठ दाखवून पळ काढण्याची. लोकांना असं वाटतं की परिस्थितीपासून दूर गेल्यावर आपली समस्यांपासून सुटका होईल. पण हे खरं नाही. ते कदाचित थोड्या काळापुरते सुटका करून घेऊ शकत असतीलही, पण आज नाही तर उद्या, तीच समस्या पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक ताकदीने तुमच्यासमोर उभी राहते.

“तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे की बाह्य परिस्थितीत आपल्याला घायाळ करण्याचे सामर्थ्य नसते. परंतु तुमचे मन त्या परिस्थितीला वेगळ्या त-हेने चित्रित करते आणि मग तुमच्या आंतूनच दुःखाचे बुडबुडे वर उठतात. तुम्ही जेव्हा एखादी परिस्थिती चुकीच्या मार्गाने चित्रित करता तेव्हा तिचे समस्येत रूपांतर होते. मनाला बाह्य परिस्थितीचे चित्रिकरण करू न देणे, त्यावर टीप्पणी करू न देणे हे ध्येय असले पाहिजे आणि तुम्ही साक्षीभावाची कला आत्मसात केली, तरच हे शक्य आहे.

“माझ्या मुलांनो, तुमच्या समस्या बाह्य परिस्थितीत दडलेल्या नाहीत. तुम्ही बाह्य परिस्थिती टाळू शकत नाही. त्या तर जीवनाचे अभिन्न अंगच आहे. उदा. एक वयस्कर स्त्री एका सुप्रभाती एका नवविवाहित जोडप्याच्या घरी जाते. त्या स्त्रीला पाहून पतीला खूप आनंद होतो. तो आनंदाने ओरडतो, ‘अरे वा आई! तू आलीस? फारच छान! तुला पाहून मला खूपच आनंद झाला.’ परंतु त्याच्या पत्नीच्या कपाळावर मात्र आपल्या सासूला पाहून आठ्या पडतात. याचे तुम्ही कसे स्पष्टीकरण द्याल? एकच व्यक्ती दोन व्यक्तींच्या मनात एकाच वेळी दोन भिन्न प्रतिक्रिया कशी काय निर्माण करू शकते? त्या स्त्रीने घराच्या दारातून आत प्रवेश करण्यापलीकडे दुसरे काहीही केलेले नाही. ही फक्त एक साधी परिस्थिती आहे. पण एका व्यक्तीसाठी ती आनंददायी क्षण बनतो, तर दुस-यासाठी तीच परिस्थिती मोठ्या दुःखाचे कारण बनते. एका व्यक्तीसाठी ती समस्या आहे, तर दुस-यासाठी अगदीच त्याउलट. म्हणून आपले ध्येय असले पाहिजे ते मनाला बाह्य परिस्थितीत ढवळाढवळ वा टीकाटिप्प्णी करू न देण्याचे. परंतु तुमचे मन एवढे दुर्बळ व ढवळाढवळ करणारे आहे की तुम्ही अगदी सहजतेने त्या परिस्थितीचे शिकार बनून भ्रमित होता. तुम्ही त्या परिस्थितींवर नकारात्मक रीतीने प्रतिक्रिया व्यक्त करता तेव्हाच समस्या उद्भवते. दुस-या शब्दांत तुमच्या समस्येचे मूळ तुमच्यातच असते. तुमच्या समस्येचे मूळ जेथे आहे त्या मनाची अढी प्रथम दूर करा आणि मग बाह्य अढी आपोआपच सरळ होईल.

“काही विद्यार्थी अम्माकडे येऊन म्हणतात, ‘अम्मा माझे परीक्षेचे पेपर एक भयंकर समस्या होती.’ अम्मा त्यांना उलट विचारते, ‘समस्या कुठे आहे? ही समस्या तुमच्या प्रश्नपत्रिकेत शोधायची का? नाही, कारण त्याच परीक्षेत इतर अनेक जण विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. तर मग खरी समस्या तुम्ही स्वतःच आहात, कारण तुम्ही पुरेसा अभ्यास केला नव्हता. म्हणून ती परीक्षा तुमच्यासाठी समस्या असेल, परंतु जे खरोखरच चांगला अभ्यास करून परीक्षेला बसले त्यांच्यासाठी ती मुळीच समस्या नाही.’

“अनेक लोक अम्माला सांगतात की त्यांचे त्यांच्या पती वा पत्नीशी जमत नाही. परंतु तीच व्यक्ती दुस-या कुणाचा चांगला मित्र वा मैत्रिण असते, कुणाचा भाऊ वा बहिण असते, आणि त्यांच्या मुलांसाठी प्रेमळ माता, पिता असते. पांडवांसाठी श्रीकृष्ण जीवलग सखा होता, परंतु त्याच श्रीकृष्णाला कौरवांनी आपला शत्रू मानले. या उदाहरणात समस्या श्रीकृष्णात आहे का? नाही, ती समस्या कौरवांत च दडलेली होती.

“पाश्चात्य देशांत लोक बराच काळ अगोदर लग्न जमवून ठेवतात(डेटिंग), आणि जर ते परस्परांना पसंत असेल तरच पुढे लग्न करतात आणि अपत्यप्राप्ती होऊ देतात. ते काही काळ सुखाचा संसार करतात, परंतु लवकरच समस्या उद्भवू लागतात. भय आणि क्रोधावर आधारित संघर्ष सुरू होतो. त्या दोघांनाही परिस्थितीपासून सुटका करुन घेऊन पळ काढायचा असतो आणि मग त्याची परिणती घटस्फोटात होते. त्यानंतर काही काळ कडुगोड आठवणीवर दिवस कंठतात, पण ते फार काळ टिकत नाही. ते पुन्हा दुस-या कुणाशी लग्नाच्या आणाभाका घेतात आणि पूर्वीच्या त्याच अनुभवांचे दुष्टचक्र पुढे चालू राहते. हे असं कितीवेळा घडतं यावर जरा विचार करा. ते परस्परांना दूषणे देत राहातात, एकमेकांच्या चुका व दोष पुन्हा पुन्हा उगाळत राहतात. पण समस्येचं खरं मूळ आपल्यातच आहे याची मात्र त्यांना जाणीवही नसते.

“तुम्ही त्या व्यक्तीपासून काही काळ दूर पळ काढाल. आपल्या समस्येचा अंत होईल या आशेने तुम्ही एका लग्नापासून फारकत घेऊन दुसरे, तिसरे अशा उड्या मारीत राहाल, पण ते सुख फार काळ टिकत नाही. कारण तुम्हाला दुस-या व्यक्तीतही नव्या वेष्टनात, नव्या परिस्थितीत तीच दुर्बलता आणि तीच वैचारिक पातळी आढळून येते.

“कित्येकदा तर समस्या पहिल्यापेक्षाही अधिक भीषण स्वरूपात समोर येतात. व्यक्तीचे बाह्य रूप, रंग किवा चेहरामोहरा बदललेला असतो पण त्या वेष्टनातील समजून घेण्याची वैचारिक पातळी मात्र तीच असते. कारण तुम्ही आंतरिक दृष्ट्या बदललेले नसता. म्हणून तुम्ही नव्याने पसंत केलेल्या जोडीदाराचा चेतनेचा स्तर पूर्वीचाच राहतो. फक्त बाह्य रूपरंगात तेवढा बदल होतो.
“जोपर्यंत तुमच्या चेतनेच्या स्तरात आणि पर्यायाने तुमच्या मनोभावात प्रकर्षाने जाणवण्याइतपत बदल होत नाही, तोपर्यंत तुमच्या समस्या दूर होणार नाहीत. तुम्ही कुठेही गेलात तरी त्या तुमच्या जीवनात डोकावून तुम्हाला निरंतर त्रस्त करीतच राहतील. तुमचे मन भविष्याची खोटी आशा दाखवून जीवनातील प्राप्त परिस्थितीपासून दूर पळण्याचे आपले पूर्वीचेच तंत्र सांगत राहील.

“समस्या या बाह्य परिस्थितीशी निगडीत आहेत, हा गैरसमजच एकदा तुम्ही तुमच्या मनातून समूळ काढून टाकला की तुमच्या साःया समस्या कायमस्वरूपी नष्ट होतील. समजून घ्या की समस्यांचे मूळ तुमच्या स्वतःच्याच मनामध्ये आहे. एकदा तुम्हाला त्याची जाणीव झाली की मग तुम्ही तुमची आंतरिक दुर्बलता दूर करण्याची प्रक्रिया सुरू करू शकता. हे ध्येय साध्य करण्यासाठी ध्यानाचा अवलंब केला जातो. ध्यानातून तुम्हाला जे आंतरिक मौन, निस्तब्धता व तणावमुक्तता मिळेल केवळ त्याचीच तुम्हाला याकामी मदत होईल.” ॐ

“या नुतन सहस्राब्दात आपले परम लक्ष्य असावे, आपल्या सत्य स्वरूपाला ओळखण्याचे- आपल्या अंतरात नित्य स्थित असलेल्या विश्व चैतन्याचा शोध घेण्याचे. आगामी शताब्दीत हे लक्ष्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नाला आपण प्राधान्य दिले पाहिजे, किंबहुना हे शतक या महत्वपूर्ण लक्ष्याच्या नावानेच ओळखले जावे.”
– संयुक्त राष्ट्र संघाच्या(युनो)आंतरधर्मिय परिषदेत अम्मांचे संबोधन – 1995

“हा क्षण आपल्या अंतःकरणात प्रेम व करुणा जागविण्याचा आहे. ही वेळ आपल्या हृदयाने प्रार्थना करण्याची आणि हाताने कर्म करण्याची आहे. अशावेळी दुःखीकष्टी लोकांच्या सहाय्यासाठी आपले हात पुढे येवोत आणि अशाप्रकारे सहानुभूती आणि दयेचा दीप आपल्या अंतरात प्रज्वलित होवो.”
अम्मांचा नववर्षाचा संदेश, 2005

“हा क्षण आपल्या अंतःकरणात प्रेम व करुणा जागविण्याचा आहे. ही वेळ आपल्या हृदयाने प्रार्थना करण्याची आणि हाताने कर्म करण्याची आहे. अशावेळी दुःखीकष्टी लोकांच्या सहाय्यासाठी आपले हात पुढे येवोत आणि अशाप्रकारे सहानुभूती आणि दयेचा दीप आपल्या अंतरात प्रज्वलित होवो.”
— अम्मांचा नववर्षाचा संदेश, 2005