ओणमचा सण राजा आणि प्रजेमधील आदर्श नातेसंबंधाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महाबलीला आपल्या प्रजेच्या सर्वांगीण कल्याणाचीच काळजी होती. त्याखेरीज त्याच्या मनात दुसरी कसलीच कामना नव्हती. त्याची प्रजाही आपल्या राजावर मनःपूर्वक प्रेम करीत होती. ओणमचा सण आपल्यासमोर राजा आणि प्रजेमधील ऐक्यभाव, प्रेम आणि समत्वभावाचे उत्कृष्ट उदाहरण सादर करतो. राज्यकर्ते कसे असले पाहिजे? प्रजा कशी असली पाहिजे? याविषयी ओणमचा सण एक परिपूर्ण आदर्श सादर करतो, आणि खरेच आजच्या जगासाठी ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. ओणम हा मानवी नातेसंबंधाचा उत्सव आहे. अशा उत्सवांमुळे कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी व नातेवाईकांमधील नातेसंबंध दृढ होतात. आज आपण एका अशा कालखंडात राहत आहोत जेथे सारे मानवी संबंध अतिशय कमकुवत झाले आहेत. पति-पत्नीही परस्परांपासून दुरावत चालले आहेत. माता आणि लेकराचे नाते, पिता आणि लेकराचे नाते, शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते व शेजार्यांचे परस्परांशी असलेले नाते अशी सर्वच नाती कमकुवत झाली आहेत. ओणमचा सण ही सर्व नाते सुदृढ करण्याचा संदेश घेऊन येतो. आणि आपण हे साध्य केले तरच ओणम खर्या अर्थाने ओणम होतो. तथापि ओणम म्हणजे काही केवळ मानवी नात्यांचाच उत्सव नाही. हा तर मानव आणि निसर्गातील नातेबंधाचाही उत्सव आहे. त्याही पलिकडे हा ईश्वर आणि मानवामधील नातेबंधाचाही उत्सव आहे. ओणम मधील परिपूर्णतेमुळेच तो इतर सणांपेक्षा वेगळा आहे. ओणम मधे जीवनातील सर्वच पैलूंचा समावेश होतो. मुले, स्त्रिया, तरुण आणि वयोवृद्ध अशा सर्वांनाच ओणम मधे आपापली भूमिका आहे. कौटुंबिक व सामाजिक अशा दोन्ही स्तरावर ओणमचे महत्व आहे. त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालचे वातावरण, निसर्ग, आपले शरीर व मन अशा सर्वांवरच त्याचा प्रभाव पडतो.