अम्मांच्या सेवाकार्याचा अल्पसा परिचय
आध्यात्मिक कार्यक्रम – अम्मांच्या आश्रमाच्या भारतात व परदेशात अनेक शाखा सुरु झाल्या आहेत. या सर्व शाखांत नियमितपणे भजन, सत्संग, पूजा, नगरसंकीर्तन असे अनेक आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय काही प्रमुख मठ शाखांमध्ये अम्मांनी स्वहस्ते ‘ब्रह्मस्थानम्’ मंदिरांची स्थापना केली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांत एकाच शिलेत शिव, देवी, गणपती व राहु या देवतांची अम्मांनी स्वहस्ते प्राणप्रतिष्ठा केली आहे. येथे नियमित सत्संग, भजन कार्यक्रम होतात. इथे दर आठवड्यास ग्रहदोष निवारण पूजा आयोजित केल्या जातात.
शैक्षणिक क्षेत्र
अमृता विश्वविद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)
नव्या पिढीत उच्च जीवनमूल्ये रुजविणे, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे, गौरवशाली भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारी नवीन पिढी घडवून चारित्र्य संपन्न समर्थ भारत घडविणे इत्यादी महान उद्दिष्टे समोर ठेऊन विज्ञान, अध्यात्म व सेवा यांचे सुंदर संमिश्रण करुन अम्मांच्या निर्देशानुसार कोईम्बतूर जवळ चारशे एकर जागेत ‘अमृता विश्वविद्यापीठम्“ स्थापना केली.
इंजिनीअरिग, कॉम्प्युटर, मॅनेजमेंट, मेडिकल, आयुर्वेद, फार्मसी,नर्सिंग इत्यादी अनेक कॉलेज या विद्यापीठाच्या अंतर्गत चालू आहेत. भारतभर ‘अमृत विद्यालय’ या नावाने 60 शाळा चालू असून फक्त चौथी शिकलेल्या अम्मांच्या सर्व संस्थांमधून 60000 विद्यार्थी शिकत आहेत.
वैद्यकीय सेवा
’अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, 1300 खाटांचे सूपरस्पेशालिटी हॉस्पिटल (कोचीन) ’आयुर्वेदीक चिकित्सालय, अमृतपुरी
’अमृता धर्मार्थ हॉस्पिटल – अमृतपुरी, कलपेट्टा व म्हैसूर
अमृतकृपासागर हॉस्पिस – कॅन्सर रोग्यांसाठी शुश्रुषालय व स्थानिक जनतेसाठी डिस्पेन्सरी, बदलापूर(प), जिल्हा ठाणे (महाराष्ट्र)
भारतातील अनेक आश्रमाशाखांत मोफत वैद्यकीय शिबिरे, डिस्पेन्सरी एड्सच्या रोग्यांसाठी हॉस्पिस इत्यादी चालू आहेत.
समाजकल्याण योजना –
अमृतकुटीरम् – ‘अमृतकुटीरम्’ योजने अंतर्गत भारतभर गरीब व बेघरांसाठी 100000 काँक्रिटची घरे मोफत बांधून देण्याचे उद्दिष्ट. आतापर्यंत 35000 घरे बांधून दिली आहेत. महाराष्ट्रातही पिपरी-चिचवड महानगरपालिका हद्दीतील अंजिठानगर येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन कार्य हाती घेऊन झोपडपट्टीवासियांना 750 सदनिका बांधून दिल्या आहेत.
गुजरातमधील भूकंपग्रस्त भुजमध्ये 3 गावे दत्तक घेऊन या गावातील सर्व घरे, रस्ते, देवमंदिर, समाजमंदिर, शाळा, दवाखाना, पाण्याची टाकी इत्यादी सुविधांनी युक्त अशा तीन आदर्श गावांचे पुनर्निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील किल्लारीच्या भूकंपातही आश्रमाने भरीव मदत दिली होती.
सुनामीग्रस्तांचे पुनर्वसन – 2004 साली दक्षिण भारतात आलेल्या सुनामी आपत्तीच्या वेळी अम्मांच्या आश्रमाने सुनामीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 225 कोटी रूपयांची योजना राबवून केरळ, तमिळनाडु, अंदमान व श्रीलंकेत 6200 पक्की घरे बांधून दिली. या आपत्तीत अनाथ झालेल्या मुलांना कायमस्वरूपी आधार दिला. कोळ्यांना 700 बोटी, इंजिन व जाळी वाटली.
मुलांच्या मनातील पाण्याचे भय दूर करण्यासाठी अम्मांनी स्वतः पाण्यात उतरुन मुलांना पोहायला शिकवले.
वृद्धाश्रम- शिवकाशी, बंगळूर, कारवार, कोट्टायम येथे वृद्धाश्रम असून अशाप्रकारचे वृद्धाश्रम लवकरच इतर राज्यांतही सुरू होत आहेत.
मासिक पेन्शन – भारतभर 100000 गरीब अबलांना मासिक पेन्शन देण्याची योजना सुरु आहे.
मातृवंदनम् – दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अमृता युवाधर्मधाराचे (अयुध) सदस्य जन्मदात्री माता व भारतमातेची पूजा करून जननी व जन्मभूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. ‘अयुध’ या युवकांच्या आघाडीमार्फत विविध सेवाप्रकल्प चालविण्यात येतात. तसेच अयुधचे सदस्य योगाभ्यास, ध्यान, धार्मिक व आध्यात्मिक विषयांवर चर्चासत्र आयोजित करतात.
अन्नदान – भारतातील आश्रम शाखांच्या माध्यमातून दरमहा 100000 गरीबांना अन्नदान केले जाते. अमेरिकेतही अम्मांच्या स्थानीक भक्तांतर्फे ‘मदर्स किचन’ या अभिनव उपक्रमा अंतर्गत वर्षाला चाळीस हजार गरीबांना भोजन दिले जाते.
मुंबई – जुलै 2005 मध्ये मुंबईत अभूतपूर्व पाऊस पडल्याने ओढावलेल्या बिकट परिस्थितीत अम्मांच्या मठाने पूरग्रस्तांना मदत केली. अन्नधान्य, स्वयंपाकाची भांडी, स्टोव्ह, कपडे इत्यादी वस्तू वाटल्या. कोचीनच्या अमृता हॉस्पिटलमधून अम्बुलन्स, तज्ञ डॉक्टर व परिचारिकांचे वैद्यकीय पथकाने 50000 रुग्णांची तपासणी करुन उपचार केले व साडेचार कोटी रूपयांची औषधे वाटली.