भगवंताला आपल्याकडून काहीही नको आहे. आपण भगवंताला धूपदीप ‘अर्पण करतो. या गोष्टी भगवंताला हव्यात म्हणून आपण त्याला त्या अर्पण करीत नाही. खरंतर आपल्या डोळ्यांची ज्योतीही ईश्वरप्रदत्त आहे. असे असताना दोनचार रुपयांच्या आपल्या दिव्याच्या ज्योतीची त्या भगवंताला काय आवश्यकता? परंतु ईश्वराचा आश्रय घेतला तर त्यात आपलाच लाभ आहे. आपण देवाला जे काही अर्पण करतो, ते आपल्या समर्पणाचे प्रतीक असते. अशा रीतीने आपल्यात समर्पणभाव विकसित होतो. एवढेच नाही तर तेलातुपाच्या दिव्यातून निघणारा धूर वातावरणाचीही शुद्धी करतो. याचप्रमाणे मी आणि माझ्या इच्छांची पूर्ती हा मनोभाव सोडून देऊन सारंकाही भगवंताचेच आहे. त्याच्या इच्छेनुसार सारंकाही होवो, या मनोभावाचा विकास झाला पाहिजे. अशा समर्पणभावानेच भक्ती परिपूर्ण होईल.

समर्पणाची भक्तीशक्ती

अहंकार! केवळ हीच एक आपली सृष्टी आहे. त्याचाच परिपूर्ण त्याग करायचा आहे. त्याचेच भगवंताला समर्पण करायचे आहे. त्याचे समर्पण केल्यानंतर जे काही शेष राहील ती ईश्वरसृष्टीच असेल. त्यानंतर आपण भगवंताच्या ओठांवरील मुरली बनून जाऊ. नाद उद्घोष करणारा शख बनून जाऊ. त्यासाठी आपल्या पृथक व्यक्तित्वाचा त्याग करणे पर्याप्त आहे. ‘मी’ आणि ‘माझे’पणाचा त्याग केल्यावर व्यक्तित्व उरत नाही, फक्त सर्वव्यापी चैतन्यच उरते. ज्याप्रमाणे बीज हातात ठेवल्याने ते अंकुरित होत नाही, खडकावर टाकल्यावरही ते अंकुरित होत नाही. ते मातीतच पेरले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही कर्माचे उचित फळ मिळण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. समर्पणभावाचे जागरण झाले की भगवंताच्या कृपेने सारकाही स्वयमेव सिद्ध होते. भगवदचरणी आपण आपल्या मनाचे समर्पण केले पाहिजे.

आपण मंदिरात जाऊन पुष्पांजली अर्पण करतो. वस्तुतः ईश्वरचरणी आपले हृदयपुष्प अर्पण केले पाहिजे. जेव्हा आपण आपले मन ईश्वरचरणी ।अर्पण करतो तेव्हा तीच भक्ती होते व तेच वास्तविक समर्पण होते. परंतु त्या मनाचे प्रतीक म्हणून आपण पुष्प अर्पण करतो. जर मन दुःखभाराने पीडित असेल तर आपल्या दुःखांचे भगवंतासमोर निवेदन करण्यात काही चूक नाही. आपण आपल्या अंतरीचे दःख भगवंताला सांगून त्याला आपल्या दुःखात वाटेकरी करुन आपले दुःख त्याच्यासमोर हलके करु शकतो. परंतु आपली प्रार्थना भक्तीसाठी असली पाहिजे. केवळ त्यातूनच पूर्ण फलप्राप्ती होईल. तथापि आपण असे समजू नये की देवाला सारंकाही तपशीलवार सांगितले तरच त्याला समजेल.

कर्मापासून पलायन करु नका- 

प्रश्‍न : गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, काहीही झाले तरी आपण आपल्या स्वधर्माचा त्याग करता कामा नये. जर असे असेल तर अधिक लाभ मिळणारा दुसरा व्यवसाय करण्यासाठी आपण आपला वर्तमान व्यवसाय कसा काय सोडू शकतो?

अम्मा : त्या काळी अनेक लोकांचा असा समज होता की सार्‍या कर्मांचा त्याग करुन, अरण्यात जाऊन संन्यासी बनून राहिल्यानेच मोक्ष मिळू शकतो. या धारणेविरुद्ध भगवंताने घोषणा केली की सर्वस्वाचा त्याग करण्याची जरुरी नसून लोकांनी आपले या जगातील नियत कर्म आपल्या स्वधर्मात दृढपणे स्थित होऊन निष्ठापूर्वक पार पाडले पाहिजे. भगवंताने पुढे आणखी स्पष्ट केले की आपण आपल्या कर्मांचा त्याग न करता ती कर्मे उचित मनोभावाने पार पाडली तर तीच कर्मे आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातात.

धर्मपालनाच्या या संकल्पनेत आणखी एक महत्वपूर्ण तथ्य दडलेले आहे. शिल्पकाराच्या कुटुंबात जन्मलेले मूल सहजतेने चांगला शिल्पकार बनू शकते, कारण त्याच्यातील सूप्त गुण विकसित होण्यासाठी परिस्थिती  अनुकूल असते. अधिकांश वेळा मूल जन्मत:च ती देणगी घेऊन आलेले असते. पिता किंवा मातेचे कौशल्य मुलाला वारसा म्हणून मिळालेले असते. असे मूल जी गोष्ट दहा दिवसांत शिकू शकते, तेच शिकण्यासाठी इतर मुलांना कदाचित वर्षे लागतील. अशाप्रकारे वंशपरंपरेने प्राप्त झालेल्या कारागिरीत उन्नती करण्याची पुष्कळ संभावना दडलेली असते. परंतु बाहेरच्या व्यक्तीला ते कौशल्य हस्तगत करण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागते.

जुन्या काळी लोक त्यांचे पारंपारिक व्यवसाय स्वत:च्या घरीच करीत असत. ते कार्यालयात वा कारखान्यात जाऊन काम करीत नसत. घरातील सर्वचजण त्यांच्या पारंपारिक व्यवसायात सहभागी असत. गुरुकुलात विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर मुले त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात प्रवेश करीत. व्यक्ती कोणता व्यवसाय निवडते त्यावर तो चारपैकी कोणत्या वर्णाश्रमाचा आहे हे ठरत असे, केवळ त्याच्या जन्मानुसार नव्हे. कोणतेही मूल एका विशिष्ट जातीत वा धर्मात जन्मत नाही, सारी देवाचीच लेकरे आहेत. मोठी झाल्यावरच त्यांच्या गुणकर्मानुसार ती वेगवेगळ्या जातीत विभागली जात. त्या काळी क्षत्रिय जातीत जन्मलेल्या मुलाला ब्राह्मण बनण्याचा अधिकार होता, आणि ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले मूल क्षत्रिय बनू शकत असे. लाकुडकाम करणार्‍या व्यक्तीला सुतार म्हटले जाई. जरी तो सुतार ब्राह्मण कुटुंबात जन्मला असला तरी त्याला सुतार म्हटले जाई. तथापि नंतरच्या कालखंडात सनातन धर्माच्या नियमांत शिथिलता आल्यामुळे जन्मानुसार जाती ठरु लागल्या.

जुन्या काळी, लोक नुसतेच पैसा कमविण्यासाठी काम करीत नसत. सर्वांचे या जीवनातील लक्ष्य आत्मज्ञान प्राप्त करणे हे होते, आणि आपल्या वाट्याला आलेले नियत कर्म हे ती अवस्था प्राप्त करण्यासाठी एक साधन होते. आपल्या कर्मात सर्वोत्तम निपुणता प्राप्त करण्यात लोक ईश्वरानुभूतीचा आनंद प्राप्त करीत.

जेव्हा प्रत्येकजण आर्थिक लाभासाठी काम करतो तेव्हा सामाजिक सद्भाव नष्ट होतो, स्वार्थीपणा व लोभ यांचे प्राबल्य वाढते.

त्याकाळी कामगाराला पूर्वनिर्धारित वेतन देण्याची प्रथाही अस्तित्वात नव्हती. कामगारांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वेतन दिले जाई आणि त्यांना जे काही मिळे त्यात ते संतुष्ट असत. ते परस्परांचा आदर राखीत. वेतन देणारा व वेतन घेणारा असे दोघेही पूर्णपणे संतुष्ट असत. लोक अधिक स्वार्थी झाल्यावर ती प्रथा लोप पावली. मालकाचा मनोभाव, ‘कमी दाम, जास्त काम’ असा बनला आणि कामगारांनीही ‘कमी काम, अधिक दाम’ असा विचार करायला सुरुवात केली.

असे म्हटले जाते की, तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तेव्हा तुम्ही देवतेला जे पैसे अर्पण करता ते मोजून टाकू नये, तर तुम्ही ओंजळभर पैसे अर्पण करावे. हल्ली लोक पाचदहा पैशांची नाणी बाजूला काढून ठेवतात, म्हणजे, ओंजळभरुन पैसे जरी दिले तरी थोड्याशा रुपयांपेक्षा अधिक पैेसे जाणार नाहीत!

आज अधिकांश लोकांना त्यांची मुले इंजिनीयर व डॉक्टर व्हावीत असे वाटते की जेणेकरुन ते पुष्कळ पैसा कमावून समाजात प्रतिष्ठा मिळवतील. फार कमी पालक त्यांच्या मुलांचा कल व आवडीवर लक्ष देतात. जर शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा निरोगी असेल तर मुलांची प्रतिभा आपोआपच समोर येईल. परंतु याउलट आजची स्पर्धा मुलांमध्ये तणाव निर्माण करीत आहे. आपले ध्येय प्राप्त करण्यात ते असफल झाले तर ते त्यांचे मनोबळ गमावून बसतात आणि आपले उर्वरीत आयुष्य निराशेत घालवितात. अनेकांना त्यांची निराशा आत्महत्येस प्रवृत्त करते. हे कदापि घडू देता कामा नये. आपली आध्यात्मिक उन्नती व जगाची सेवा हाच आपल्या शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. हे ध्येय आपल्याला कोणत्याही कार्यक्षेत्रात प्रगती करण्यास प्रेरणा प्रदान करील. समजा, आपण अयशस्वी झालो तरी निराश होऊन आपले जीवन वाया घालविण्याऐवजी आपल्याला पुन्हा प्रयत्न करण्यास प्रेरित करील.

आपण जेव्हा जीवनात एखादे कार्यक्षेत्र निवडतो, तेव्हा त्या क्षेत्रात शक्य होईल तेवढे अधिकाधिक प्राविण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्या क्षेत्रात चिकटून राहून जीवनात यशस्वी झाले पाहिजे. कोट्याधीश बनणे हे जीवनाचे ध्येय नसून, शाश्‍वत आनंदाची अनुभूती घेणे हेच जीवनाचे लक्ष्य आहे. असे असले तरी कुटुंबाचे भरणपोषण करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे. आपल्या कामाचा मोबदला  स्वीकारताना आपल्याला जरुरी तेवढेच घेणे हेच आपले एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे.

जुन्याकाळी, लोक कठोर परिश्रम करीत असत, परंतु आपले उत्पन्न स्वत:ला व कुटुंबाला आवश्यक तेवढेच ठेवीत, व उरलेले गरीबांना वाटून टाकीत. आज समाजात व्यापार प्रबंधन(बिझीनेस मॅनेजमेंट) अत्यंत आकर्षक व्यवसाय बनला आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी व्यापार आवश्यक आहे, परंतु व्यापाराचे ध्येय केवळ वैयक्तिक लाभ एवढेच असू नये, तर देशाची प्रगतीही विचारात घेतली पाहिजे. आज आपल्याला असे अनेक व्यापारी व उद्योगपती आढळून येतील की त्यांनी  केवळ स्वत:पुरतीच नव्हे तर आगामी हजार पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती गोळा करुन ठेवली आहे! त्याचवेळी, त्यांच्या सभोवती असंख्य  गरीब लोक आहेत, जे रात्रंदिवस काबाडकष्ट करुनही एकवेळच्या जेवणासाठीही पुरेसा पैसा जमा करण्यास असमर्थ आहेत. याविषयावर क्वचितच कोणी विचार करतो. आजच्या अधिकांश लोकांचे लक्ष्य आहे, ‘दुसर्‍यांच्या जीवावर स्वत:साठी अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेणे!फ

जर तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र सोडून दुसरे निवडले, तर त्याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कामावर संतुष्ट नाही. पण हे जरुरी नाही की तुम्हाला नवीन कामात समाधान मिळेल. कारण समाधान मनावर अवलंबून असते, बाह्य कर्म वा परिस्थितींवर नव्हे. जर लोकांनी अधिक पैसा मिळविण्यासाठी आपले कार्यक्षेत्र बदलले तर त्यातून त्यांची लोभीवृत्तीच दिसून येते. त्यांचा दृष्टिकोन बदलल्याखेरीज अशा लोकांना जीवनात कधीच समाधान गवसणार नाही. परंतु ज्यांनी आपल्या मनावर प्रभुत्व मिळविले आहे, त्यांच्यासाठी कोणतीही परिस्थिती अनुकूल सिद्ध होईल. त्यांना कोणत्याही कार्यक्षेत्रात आनंदच मिळेल. काहीही, कोणीही त्यांना असमाधानी बनवू शकणार नाही. आपण जे काही काम करीत असू, त्यात अशाप्रकारची मनोदशा आपण विकसित केली पाहिजे.

जर आपण एक प्रकारचा व्यवसाय सोडून दुसरा सुरु केला, तर कदाचित आपल्याला तात्पुरते समाधान मिळेल, पण हे जरुरी नाही की ते टिकून राहील. बर्फात पडलेला साप निरुपद्रवी वाटेल. पण त्याला थोडीशी ऊब दिली तर लवकरच फुत्कारुन व दंश करुन तो आपला खरा स्वभाव दाखविल. त्याचप्रमाणे, परिस्थिती उद्भवताच मन त्याचा सत्य स्वभाव प्रगट करील आणि तुम्ही तुमची मन:शांती गमावून बसाल. मनाचे फाजील लाड पुरविणे व ते मागेल, ते सर्व त्याला देत राहणे हा काही मनाला नियंत्रित करण्याचा मार्ग नाही. आपण मनाला नियंत्रित करुन त्याला यथार्थ लक्ष्याकडे वळविले पाहिजे. त्याचप्रमाणे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या कर्तव्याप्रती दृढ, निष्ठापूर्वक राहण्याचा उपदेश केला आणि अशाप्रकारे तो जीवनात यशस्वी झाला. तुम्ही तुमच्या पसंतीचे कोणतेही काम करा, पण तुमचा मनोभाव बदलला पाहिजे. त्यानंतर मग य्ाुद्धही यज्ञकर्म बनते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हाच उपदेश केला. काही स्वार्थी कारणांसाठी आपल्या नियत कर्मांपासून पलायन करण्यास त्यांनी कदापि उत्तेजन दिले नाही. तसेच दोन डोळे बंद करुन तिसरा डोळा उघडण्याचा उपदेशही त्यांनी केला नाही. त्यांचे उदाहरण आपल्याला, दोन्ही डोळे उघडे ठेवून तिसर्‍या डोळ्याने पाहण्याचे शिकविते. दुसर्‍या शब्दात, भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सर्व गोष्टींतील अंतर्निहित एकत्व ध्यानी ठेवून जीवनाला तोंड देण्यास शिकविले आहे.

श्रीमद्भगवद्गीतेचे अध्ययन करुन श्रीकृष्ण बनले पाहिजे.

श्रीमद्भगवद्गीतेचे अध्ययन करुन श्रीकृष्णासारखे कर्मनिष्ठ बनले पाहिजे.

 

 

जन्मदिन प्रसंगीच्या प्रवचनाचा सारांश (27 सप्टेंबर 2016)

परमात्मा त्या अखंड सत्तेचे नाव आहे, ज्यात कसले विभाजन नाही, कोणतीही सीमा नाही. निसर्गमाता(प्रकृती), वातावरण, पशु-पक्षी, वृक्ष-वनस्पती यांचा कण् अन् कण् त्या ईश्वरीय ऊर्जेने ओतप्रोत आहे. जड-चेतन, सर्वांमध्ये परमात्मा व्याप्त आहे. जर आपण या सत्याची अनुभूती घेतली तर आपण स्वतःवर आणि दुसर्‍यांवर केवळ प्रेमच करु.

प्रेेमाचा प्रथम तरंग तर आपल्या आतूनच उठतो. जर आपण एखाद्या शांत जलाशयात खडा फेकला तर पहिला तरंग त्या खड्याच्या आसपासच उठत असल्याचे आपल्याला दिसून येईल. मग हळूहळू त्या तरंगाचा विस्तार होत तो किनार्‍यापर्यंत पोहोचतो. याचप्रमाणे प्रेमाचा आरंभही आपल्या आतच करु शकलो तर तो हळुहळू विस्तारत या संपूर्ण विश्‍वाला आपल्या कवेत घेईल.

जर आपण कबुतराच्या गळ्यात दगड बांधला तर तो बिचारा उडू शकणार नाही. आज आपणही आपल्या प्रेमरूपी पक्ष्याच्या गळ्यात आसक्तीरुपी दगड बांधून बसलो आहोत आणि म्हणूनच आपण मुक्तीच्या आकाशात झेप घेऊ शकत नाही. मी आणि माझेपणाच्या शृंखलांनी बद्ध होऊन आपण आपल्या प्रेमाला बंदिस्त करून टाकले आहे. प्रेमशून्य जीवन हे जीवनच नाही. प्रेम नसेल तर सेवाही केली जाऊ शकत नाही.

आज, मनुष्याचे जीवन अंतर्बाह्य, दुःखाच्या आक्रोशाने भरुन गेले आहे. त्याच्यावर ज्या दोन गोष्टी राज्य करतात, त्या आहेत- वासना आणि क्रोध. पहिली गोष्ट पूर्ण झाली नाही की क्रोध उफाळून येतो. आज मानवाची मनःस्थिति अशी झाली आहे.

 

नुकतेच, भारतीय वृत्तमाध्यमांमध्ये वादविवादाचा गरमागरम मुद्दा होता- लोकांवर हल्ला करणार्‍या भटक्या कुत्र्यांची समस्या. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य लोक कुणालाच या समस्येचे उत्तर सापडत नव्हते. कुत्र्यांमध्ये विवेकबुद्धी नसते, म्हणून ते लोकांना चावतात. परंतु आपण मानव तर विवेकबुद्धीने संपन्न आहोत आणि तरीही एक-दुसर्‍यांना फाडण्यासाठी एवढे तत्पर? त्याचे काय समाधान देऊ शकतो?

जगामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत फार काही बदलले नाही. उलट सुधारण्याऐवजी परिस्थिती जास्त बिघडली आहे. दहशतवाद मानवजातीसाठी सर्वात मोठी समस्या बनला आहे. त्याने समाजाची शांती हिरावली आहे. आकडेवारी पाहिली तर या चालू वर्षातच जगभरात विविध ठिकाणी 1200 दहशतवादी हल्ले झाले आहेत.

आज आपली जागृत-अवस्थेची वास्तविकता, कोणत्याही भयानक दुःस्वप्नापेक्षाही वाईट आहे. आपण म्हणतो की शिक्षण क्षेत्रात केरळ राज्य इतर राज्यांपेक्षा खूप पुढारलेले आहे. परंतु त्याबरोबरच आपल्या या लहानशा केरळ राज्याने धार्मिक पृथ्थकरण, राजकीय मतभेदांच्या नावावर होणारे शत्रूत्व, गुन्हेगारी, बलात्कार व महिलांवरील अत्याचार इत्यादी क्षेत्रांत अनेक मोठ्या राज्यांनाही मागे टाकले आहे. चांगल्या परिवारातील सुशिक्षित लोकही गुंडगिरीमध्ये दिसत आहेत. अंमली पदार्थ व दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यांच्या या वाईट सवयींमुळे त्यांचे स्वतःचेच नाही तर दुसर्‍यांचेही जीवन नष्ट होत आहे. जीवन नरकप्राय बनत चालले आहे. वाहन अपघात, कौटुंबिक हिंसाचार, गल्लीतील भांडणे, महिला व मुलांचे लैंगिक शोषण इत्यादी समस्या विक्राळ बनत आहेत.

आज मानवजात एक चालती-फिरती समस्या बनली आहे! नैसर्गिक समस्यांचे नियंत्रण आपल्या हातात नसले तरी येणार्‍या समस्यांची चाहूल समजण्याचे तंत्रज्ञान तर आपल्या जवळ आहे ना?  परंतु, विज्ञान अजूनपर्यंत असे एखादे यंत्र बनवू शकले नाही, जे मनुष्याच्या मनात राहणार्‍या समस्यांचा शोध घेऊ शकेल. आज आपल्या जवळ ज्ञान तर खूप आहे परंतु विवेक फारच कमी आहे. ज्याप्रमाणे आपले डोके दुखत असेल तेव्हाच आपल्याला डोके असल्याची जाणीव होते, त्याचप्रमाणे आपल्या जीवनात दुःख, समस्या आल्यावरच आपण एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो.

ग्लोबल वार्मिंग (जागतिक तापमान वाढ), वातावरणातील बदल, मानव, निसर्ग व पृथ्वी इत्यादींच्या भवितव्यासंबंधी, त्यांचे विश्लेषण करण्यासाठी व त्यावरील समाधान शोधण्यासाठी जगभरात उच्चस्तरीय संमेलने, परिसंवाद व वादविवाद होत असतात.  दुसरीकडे मनुष्याच्या मनाच्या तापमानातही भयंकर वृद्धी होत आहे. त्याचे आंतरिक वातावऱण खूप खराब झाले आहे, परंतु दुर्दैवाने त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. उच्च स्तरीय वाद-विवाद व विचारमंचाच्या परिसंवादाचा केंद्रबिंदू भावी समस्यांचे समाधान शोधणे हे आहे. परंतु आज जग ज्या समस्यांना तोंड देत आहे, त्यांच्या समाधानाच्या दिशेने क्वचितच पावले पडत आहेत.

परिस्थिती एवढी बिघडली आहे की भय आणि विरोध, जीवनाचे मूलबिंदू बनले आहेत. प्रत्येकजण तणावमुक्त राहू इच्छितो. परंतु अधिकांश लोक फुकटचा तणाव ओढवून घेत आहेत.

जीवनातील परिस्थिती सतत बदलत राहतील. परिवर्तन निसर्गाचा स्थिर नियम आहे. परंतु आपले अनुभव गोड वा कडू बनविणारे तर आपण स्वतःच असतो- आपले मन आणि मनोभाव. जोपर्यंत आपण आपल्या मनावर संयम बाळगण्याचे शिकत नाही, दुःख आपला पिच्छा सोडणार नाही.

एकदा मन नियंत्रणात आले की मग कोणतीही समस्या, कोणताही दुखद प्रसंग आपल्याला विचलीत करु शकणार नाही, दुबळे बनवू शकणार नाही. खरेतर सुखाचा पायाच मुळात कृतज्ञताभाव आहे.

जर मन कृतज्ञतेने भरुन गेले तर आपण सहजतेने सुखी होऊ. अनेकदा आपण नकारात्मक व निंदात्मक तेव्हा होतो, जेव्हा आपले मन, आपले विचार एखाद्या अतिकडे झुकते आणि आपण वर्तमान क्षणाच्या सुखापासून वंचित राहतो.

आज भारत ज्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे, ते फार उत्साहवर्धक आहे. आपण आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे चाललो आहोत. अंतरिक्षात आपल्या मंगळयानाच्या यशाने आपल्याला जगभर मान-सन्मान मिळाला आहे. परंतु आपल्या देशातील समस्त गरिबांचे जीवन मंगलमय होईल तेव्हाच देशाची प्रगती पूर्णत्वास पोहोचली आहे असे समजले जाईल. गेल्या दोन वर्षात मठाने भारतभरात 101 गावे दत्तक घेऊन तेथे कार्य सुरु केले आहे. काही गावांची परिस्थिती तर फारच निराशाजनक आहे. गेल्या शंभर वर्षात तेथे काहीच बदल झालेला नाही. आपण प्रगती करावी आणि आपल्या ग्रामीण क्षेत्राकडे दुर्लक्ष करावे हे योग्य नाही. हे  तर आपल्या हातापायांचा विकास व्हावा परंतु बाकी शरीर अविकसित राहावे असे आहे. आपल्याला याचा कधी विसर पडू नये की भारताचा आत्मा त्याच्या गावात वसलेला आहे. गावांमध्ये काळानुरुप भौतिक समृद्धीत विकास झाला पाहिजे, परंतु आपली मूळ संस्कृती व संस्कार कायम ठेवून. हृदयात कारुण्याचा उदय झाल्यावरच आपण मनुष्य बनतो, अन्यथा आपण पशूवतच असतो.

शिक्षण असे असले पाहिजे जे वचन, विचार व दृष्टिकोनाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रकाश प्रदान करू शकेल. हल्ली लोक एवढाच विचार करतात, मी यशस्वी होऊ इच्छितो! अधिकांश लोकांचा एकच मंत्र असतो- मी, मी, मी. जर लोकांनी मनात एकाच फळप्राप्तीच्या दिशेने कार्य केले तर ते त्यासाठी काहीही करण्यास संकोच करत नाही. अपराधही करतील. असा स्वार्थी दृष्टिकोन असेल तर व्यक्ती इतर सर्वांना आपला शत्रू समजू लागते. प्रत्येक गोष्टीवर आपले प्रभुत्व मिळविण्याच्या फंदात, व्यक्तीचे कर्म कुटिल व अपूर्ण होतात. कर्मांमध्ये आनंद व सहभाग असेल तरच त्यात पूर्णत्व येते.

पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा, आज मानवापुढील एक फार मोठी समस्या बनून उभा आहे . आपण आपल्या पूर्वजांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहिलो तर आपण या समस्येचे समाधानही सहजतेने शोधून काढू. जुन्या काळी आपल्या पूर्वजांना निसर्गाच्या संरक्षणासाठी अलग प्रयत्न करावे लागत नव्हते. कारण त्यांची जीवनशैलीच अशा प्रकारची होती की निसर्गाचे संरक्षण आपोआप होत होते. त्यांची जीवन-शैली, उपासना आणि सांस्कृतिक रुढी-प्रथा…सर्वांमध्ये पर्यावरण-संरक्षण समाविष्ट होते. समस्त भूतमात्र व सृष्टीप्रति श्रद्धा व आदर, त्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग होते. निसर्गाकडून जेवढे जरुरी आहे तेवढेच घ्यावे आणि तेदेखील त्याचे शोषण वा नाश न करता ही गोष्ट त्यांच्या आतमध्ये खूप खोलवर रुजलेली होती. जुन्या काळी मध काढण्यासाठी मधमाशांच्या पोळ्यामध्ये बाण मारत असत आणि जेवढा मध खाली पडत असे, तो एका भांड्यात जमा करत.

आजच्या प्रमाणे पूर्ण पोळ्याची नासधूस केली जात नसे. आपले पूर्वजही भूक शमविण्यासाठी निसर्गावरच अवलंबून होते परंतु असे असूनही त्यांच्या मनातील निसर्गाप्रतिचा करुणाभाव कधी लोपला नव्हता.

त्यांच्या मनात मधमाशांच्या परिश्रमाबद्दल आदरभाव होता. परंतु आजच्या जगात आपण काय पाहत आहोत ? मनुष्य मनुष्याकडून व निसर्गाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त ओरबडून घेत आहे. आणि त्यांचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझी लेकरे जी फळे व भाजीपाला पिकवून मला देतात ते मला मौल्यवान हिर्‍यांपेक्षाही जास्त मौल्यवान आहे. जेव्हा आपण एखादे बीज लावून त्याची देखभाल करतो तेव्हा त्याचा तो विकास पाहण्याचा आनंद अपूर्व असतो. त्यातून आपण समस्त निसर्गाप्रति आपले आंतरिक संबंध स्थापित करण्याविषयी जागृत होतो. या आनंदाचा ज्यांनी एकदा जरी  अनुभव घेतला असेल ते मग कधीही बागकाम सोडू शकत नाहीत.

आत्मविश्वास  मनाची अशुद्धी व बंधनांपासून मुक्त होण्यासाठी मदत करणार्‍या बूस्टर-रॉकेटसमान आहे जेणेकरुन आपण अध्यात्माच्या आकाशात उंच भरारी घेऊ शकू. तो आपल्याला अध्यात्ममार्गावर वेगाने पुढे जाण्याची शक्ती देतो.

कॉम्प्युटरचे हार्डवेयर व सॉफ्टवेयर असे दोन भाग असतात. सर्वसामान्य भाषेत बाहेरचा दिसणारा भाग म्हणजे हार्डवेयर आणि आतील न दिसणारा भाग म्हणजे सॉफ्टवेयर. परंतु तसे पाहिले तर हे दोन्ही वेगवेगळे नाहीत. कारण हार्डवेयर सॉफ्टवेयरविना काम करु शकत नाही आणि सॉफ्टवेयरपण, हार्डवेयरविना काम करु शकत नाही. हीच गोष्ट नामरूपात्मक दृश्य जगत व त्याच्या आतील अदृश्य शक्तीला लागू पडते. आपल्याला दिसणारे हे दृश्य जगत (नाम-रूप) हार्डवेयर आहे. या दृश्य जगतातील प्रत्येक गोष्ट परस्पर जोडणारी व सुव्यस्थित चालवणारी, एकमेव अखंड चेतन सत्ता कॉम्प्यूटरच्या सॉफ्टवेयरसमान आहे. तिलाच परमात्मा वा परब्रह्म म्हटले आहे. प्रत्येक कर्म करतेवेळी, आपण या सत्तेप्रति जागरूकता टिकवून ठेवली पाहिजे.

आपल्यात धैर्य व सहनशीलता यासारखे गुण असतील तर जीवनात वसंताचे आगमन होईल. या गुणाविना, जीवन नेहमीच तप्त वाळवंटासारखे असेल. अशा जागी फुले, नद्या व किलबिलणारे पक्षी कसे असतील? प्रेम हे एक असे धन आहे, जे घेणार्‍यापेक्षा देणार्‍याला जास्त सुख देते. हे एक असे धन आहे जे आपल्याजवळ आहे परंतु आपल्याला अजून त्याचा पत्ताच नाही. हे एक असे शस्त्र आहे जे मोठ्या शक्तिशाली शत्रूलाही जिंकू शकते. हा एक असा पाश आहे ज्याने नित्यमुक्त भगवंतालाही बांधू शकतो. हा एक असा मंत्र आहे जो आपल्याला मायापाशातून मुक्त करु शकतो. हे एक असे चलन आहे जे सर्व देशांत, सर्व काळी चालू शकते. प्रेम ही काही खिशात लपवून ठेवण्याची वस्तू नाही तर कर्मांमध्ये अभिव्यक्त करण्याची वस्तू आहे. आपण जेव्हा प्रेमस्वरूप बनतो तेव्हा आपली इंद्रिये त्याचा सेतू बनतात. त्याला कुणाचा अहंकार पराजित करु शकत नाही. हे दुःखावरचे रामबाण औषध आहे, मौनाचा आधार आहे. हे जीवनातील आपली संपूर्ण विजयराशी आहे. माझ्या सार्‍या लेकरांची हृदये या निःस्वार्थ दिव्य प्रेमाने काठोकाठ भरलेली राहो. ईश्‍वरकृपा तुमच्या सर्वांवर सदैव टिकून राहो.

-श्रीमाता अमृतानंदमयी देवी

ओणमचा सण राजा आणि प्रजेमधील आदर्श नातेसंबंधाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महाबलीला आपल्या प्रजेच्या सर्वांगीण कल्याणाचीच काळजी होती. त्याखेरीज त्याच्या मनात दुसरी कसलीच कामना नव्हती. त्याची प्रजाही आपल्या राजावर मनःपूर्वक प्रेम करीत होती. ओणमचा सण आपल्यासमोर राजा आणि प्रजेमधील ऐक्यभाव, प्रेम आणि समत्वभावाचे उत्कृष्ट उदाहरण सादर करतो. राज्यकर्ते कसे असले पाहिजे? प्रजा कशी असली पाहिजे? याविषयी ओणमचा सण एक परिपूर्ण आदर्श सादर करतो, आणि खरेच आजच्या जगासाठी ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. ओणम हा मानवी नातेसंबंधाचा उत्सव आहे. अशा उत्सवांमुळे कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी व नातेवाईकांमधील नातेसंबंध दृढ होतात. आज आपण एका अशा कालखंडात राहत आहोत जेथे सारे मानवी संबंध अतिशय कमकुवत झाले आहेत. पति-पत्नीही परस्परांपासून दुरावत चालले आहेत. माता आणि लेकराचे नाते, पिता आणि लेकराचे नाते, शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते व शेजार्यांचे परस्परांशी असलेले नाते अशी सर्वच नाती कमकुवत झाली आहेत. ओणमचा सण ही सर्व नाते सुदृढ करण्याचा संदेश घेऊन येतो. आणि आपण हे साध्य केले तरच ओणम खर्या अर्थाने ओणम होतो. तथापि ओणम म्हणजे काही केवळ मानवी नात्यांचाच उत्सव नाही. हा तर मानव आणि निसर्गातील नातेबंधाचाही उत्सव आहे. त्याही पलिकडे हा ईश्वर आणि मानवामधील नातेबंधाचाही उत्सव आहे. ओणम मधील परिपूर्णतेमुळेच तो इतर सणांपेक्षा वेगळा आहे. ओणम मधे जीवनातील सर्वच पैलूंचा समावेश होतो. मुले, स्त्रिया, तरुण आणि वयोवृद्ध अशा सर्वांनाच ओणम मधे आपापली भूमिका आहे. कौटुंबिक व सामाजिक अशा दोन्ही स्तरावर ओणमचे महत्व आहे. त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालचे वातावरण, निसर्ग, आपले शरीर व मन अशा सर्वांवरच त्याचा प्रभाव पडतो.

{2 डिसेंबर 2014 रोजी ख्रिश्चन धर्मपीठ व्हॅटिकन सिटी, येथील पॉन्टीफ़िशल अकादमी ऑफ सायन्स मध्ये देह-व्यापार व आधुनिक गुलामी या विषयावर अम्मांनी दिलेले भाषण.}

watch video:

प्रेमस्वरूपी व आत्मस्वरूपी, आज येथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार. आदरणीय पोप फ्रान्सिस व इतर आदरणीय अतिथीगण. या ऐतिहासिक संमेलनात भाग घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी वेळ काढला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छिते. या प्रसंगी मी पॉन्टीफ़िशल अकादमी ऑफ सायन्सचे कुलपती आदरणीय पोप महोदय व या संमेलनाचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी अत्यंत परिश्रम घेतले त्या आदरणीय बिशप मार्सेलो सांशेज सोरोंडो यांचा दृढ संकल्प व सामाजिक जाणीवेबद्दल आभार व्यक्त करते.

मानवी देहव्यापार समाजासाठी अत्यंत वाईट असा शाप आहे. तो केवळ या शताब्दीपुरताच मर्यादित नाही तर अनादी काळापासून चालत आलेला आहे. आपण गुलामी व वेठबिगारी दूर करण्याचा जेवढा अधिक प्रयत्न करतो तेवढे अधिक ते उलटवार करतात. जणूकाही एखादा प्रेतात्मा आपल्याला पुनःपुन्हा त्रस्त करण्यासाठी येतो आहे. जसे की पोप महोदयांनी म्हटले आहे की आज आपण समाजाला एक शरीर समजले तर मानवी देह व्यापार म्हणजे त्या देहावरील उघड्या जखमेसारखा आहे. हा मानवतेप्रति अपराध आहे.

या अत्यंत क्रूर व अनैतिक गुन्ह्याचा समूळ नाश करणे व त्याची शिकार झालेल्या लोकांची मुक्तता व रक्षण करण्याच्या दिशेने काही भरीव पावले उचलणे हे प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे. तसेच न्याय व समाज कल्याणाप्रति बांधील असलेल्या प्रत्येक नागरिकाची देखील ही नैतिक जबाबदारी आहे. परंतु या समस्येचे समाधान सोपे नाही हे कटु सत्यही आपल्याला ठाऊक आहे, कारण की देह-व्यापाराची ही समस्या खूप जुनी व खोलवर रुजलेली आहे. या देह व्यापारामुळे कितीतरी निरागस व असहाय्य मुलांचे जीवन कोमेजून जाते. आपल्या मनात भविष्याची मधुर स्वप्ने पाहणार्या या निष्पाप जीवांचे जीवन पाहता पाहता नष्ट होते. आपल्याला हे जीवन परमात्म्याच्या कारुण्याने मिळाले आहे म्हणून आपण सत्कर्म करीत हे जीवनपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण केले पाहिजे. दुसर्यांचे जीवन नष्ट करणे म्हणजे परमात्म्याने दिलेल्या या अमूल्य भेटीचा दुरुपयोग करणे होय. सारे जीव परमात्म्याच्या हातातील केवळ एक उपकरण (कठपुतळी)आहेत.

धर्म हा परमात्म्याच्या दरबाराचा कायदा आहे. त्याचा आदर व पालन करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. देह-व्यापार हा घोर अधर्म आहे. सर्व धर्मगुरुंमध्ये दुसर्यांना देहव्यापाराच्या गुलामीच्या जाळ्यात फसविणारे मानवजातीचे अपराधी आणि दुर्दैवाने त्या जाळ्यात फसलेले अभागी जीव अशा दोघांनाही मदत करण्याची क्षमता असते. ह्या दोघांनाही योग्य मार्ग दाखविण्याची आवश्यकता आहे. धर्मगुरुंनी हे युद्ध लढून धर्मरक्षणासाठी तयार असले पाहिजे. या युद्धाचा उद्देश्य दुसर्यांना ठार मारणे असा नसून आसुरी बुद्धीच्या लोकांपासून असहाय लोकांचे रक्षण करणे हा आहे. आपण धर्म,वर्ण, जात इत्यादींनी प्रेरित होऊन सूडभावनेने काम न करता सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या दिव्यत्वाचे स्मरण ठेवून सहानुभूती विकसित करण्याची आवश्यकता आहे.

मानवाने धर्म, जात, भाषा, देश, प्रांत इत्यादींच्या नावावर खूप विभाजन केले आहे. आपणच उभ्या केलेल्या या भिंती पाडण्यासाठी आपण शुद्ध सर्वसमावेशक प्रेमाचा पुल बांधूया. कितीही कठोर हृदय असले तरी प्रेमाने ते मृदू होते. अत्यंत घनदाट अंधारातही प्रेमाचा प्रकाश प्रसारित होतो. निःस्वार्थ प्रेमात आपल्याला गुलाम बनविणार्या आसुरी मनाला स्वतःचाच मुक्तिप्रदा बनविण्याचे सामर्थ्य असते. देहव्यापार करुन दुसर्यांना गुलाम बनविणारे लोक एक प्रकारच्या नकारात्मक कुप्रवृत्तीचे शिकार झालेले असतात. धर्मगुरुंनी मनात कोणताही सुप्त व स्वार्थी उद्देश न बाळगता सर्व धर्मांचे सार तत्त्व असलेले निःस्वार्थ प्रेम व अध्यात्मावर आधारित, पुनर्वसनाची एक कार्ययोजना निश्चित केली पाहिजे.

उघड्या डोळ्यांनी अधर्म होत असलेला पाहूनही तो थांबविण्यासाठी काहीच न करणे हा देखील एक अधर्मच आहे. सरकार व राजकीय नेत्यांनी गुन्हेगार सुटू नये म्हणून पळवाटा नसलेले कायदे बनवून ते कठोरपणे लागू केले पाहिजे. अनेक देशांत तेथील सरकारे व काही बिगर सरकारी स्वयंसेवी संस्था देहव्यापाराच्या समस्या दूर करण्यासाठी लढा देत आहेत. परंतु मानवाला भोगवस्तू समजून त्याचा वापर करुन फेकून देणार्या देहव्यापाराच्या क्षेत्रांतील या माफियांचे सामर्थ्य व आर्थिक लाभ कमी झालेला काही दिसून येत नाही. या व्यापारातील पीडितांची संख्या वेगाने वाढतच चालली आहे. एखाद्या विशाल वृक्षाच्या मुळांसारखे या समस्येची मूळेही समाजात खोलवर रूजली आहेत. आपल्या डोळ्यांसमोर घडत असलेल्या या अन्याया विरुद्ध भरीव पावले उचलण्यात आपण अयशस्वी ठरलो, तर तो भावी पिढ्यांसाठी उपहासाचा विषय बनेल.

देह-व्यापाराची शिकार झालेले पीडित लोक त्यांचा आत्मसन्मान गमावून बसतात आणि त्यातून ते निराशेच्या खोल गर्तेत बुडतात. दहशतवादी त्यांचा उपयोग अंमली पदार्थांचे स्मगलिंग करण्यासाठी, आत्मघाती बॉम्बरच्या रूपात व अनेक प्रकारच्या बेकायदेशीर कामांसाठी करतात. आपण खात असलेले काही अन्नपदार्थ लहान मुलांना रात्रंदिवस सक्तीने राबवून त्यांच्याकडून जबरदस्तीने बनवून घेतले जातात. या पीडितांचे मुत्रपिंड व शरीराचे काही अवयव बाजारात विकाऊ वस्तू म्हणून विकले जातात. हे पीडित जेव्हा कोणत्याही कामासाठी निरुपयोगी ठरतात किंवा सततचा दुर्व्यवहार व दुरुपयोगाने मनोरुग्ण वा एड्स सारख्या असाध्य रोगांचे शिकार होतात तेव्हा त्यांना मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिले जाते.

मी स्वतः माझ्या कानांनी देहव्यापारात फसलेल्या हजारो लोकांच्या दर्दभर्या कहाण्या ऐकल्या आहेत. एकदा एक स्त्री माझ्याकडे येऊन रडू लागली. ती म्हणाली, ‘अम्मा, मला एड्स झाला आहे. मरण्याआधी माझ्या बाळाला माझ्या डोळ्यांनी पाहण्याची माझी एकमेव इच्छा आहे. अम्मा, माझ्यावर एवढी दया करा! मला मदत करा.’ अम्माने अधिक चौकशी केली असता तिने सांगितले, ‘मी 9 वर्षाची असताना एका घरात मोलकरीण म्हणून काम करत होते. तेथे मला एक प्रौढ माणूस भेटला. त्याने मला अधिक पगाराचे व इतर अनेक प्रलोभने दाखविली. माझ्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मी त्याच्या बरोबर गेले. नवीन ठिकाणी गेल्यावर तेथे माझ्यासारख्या अनेक मुलींना मी पाहिले. मला त्या कुणाशीही बोलू दिले नाही. अखेर तो कुंटणखाना असल्याचे मला समजले. पुरुषांनी माझ्यावर बलात्कार करणे सुरु केले. सुरुवातीला मला राग येत होता, अपराधीपणाही वाटत होता. परंतु काळाच्या ओघात आत्मसन्मानाची भावना मरुन गेली आणि आहे त्या घृणास्पद कामात आनंद शोधू लागले.

पाच वर्षानंतर मी एका मुलीला जन्म दिला. त्यांनी महिनाभर मला मुलीला स्तनपान करु दिले. नंतर अचानक त्यांनी मुलीला माझ्यापासून हिरावून घेतले. काही वर्षांनी मला एड्स झाल्याचे निदान झाले. त्यांनी मला माझ्या मुलीला भेटण्यास मनाई केली. मी फारच आजारी झाले तेव्हा ते म्हणाले की आम्ही तुला दवाखान्यात घेऊन जात आहोत, परंतु त्यांनी मला रस्त्यातच सोडून दिले. त्यांनी मला माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्यावे म्हणून मी परोपरीने विनंती केली परंतु त्यांनी काहीएक ऐकले नाही. त्यांनी मला परत कुंटणखाण्यातही घेतले नाही. मी ज्यांच्याकडे मदतीसाठी हात पसरला त्या सर्वांनी माझ्याशी अत्यंत तिरस्कृत व घृणास्पद व्यवहार केला. माझ्यासाठी सारे दरवाजे बंद झाले होते. आता मी आणखी जगू इच्छित नाही. मरण्याआधी माझ्या बाळाला पाहण्याची माझी एकमात्र इच्छा आहे. ते लोक तिलाही माझ्यासारखे हार्मोन्सची इंजेक्शने देऊन मोठी बनवतील का? आणि उपयोग करुन रस्त्यावर फेकून देतील का?’’

तिची ती दयनीय कथा ऐकून मी काही लोकांना तिच्या मुलीचा शोध घेण्यास पाठविले. ते अत्यंत कठीण काम होते. अशा अनेक स्त्रियांनी त्यांच्या दुःखद कथा अम्माला सांगितल्या आहेत. एका दुर्दैवी स्त्रीने तिची कथा सांगितली- ‘एक माणूस नियमितपणे आमच्या भेटीसाठी येत असे. आम्हाला ज्या कशाची आवश्यकता असायची त्याची तो मोठ्या आपुलकीने मदत करायचा. अशाप्रकारे तो आमच्या चांगला परिचयाचा झाला होता. काही दिवसांनी त्याने आमच्या मुलांना विदेशात पाठवून त्याच्या मित्राच्या कंपनीत चांगले काम देण्याचा प्रस्ताव ठेवला. दरमहा मोठी रक्कम पाठविली जाईल असे त्याने आश्वासन दिले. त्याने आम्हा सर्वांना प्रत्येकी 1000 रुपये अॅडव्हान्सही दिला. नंतर तो आमच्या मुलांना घेऊन गेला. त्या दिवसापासून आम्ही त्या माणसाला व आमच्या मुलांना परत पाहिले नाही. आमची मुले कुठे आहेत तेही आम्हाला माहित नाही. आम्ही ऐकले आहे की ते कुंटणखान्यात आहेत. काही लोक त्यांना शोधण्यासाठी त्या कुंटनखान्यात गेली असता त्यांना सांगितले गेले की मुलांना विकून दुसरीकडे पाठविले आहे. एवढे सांगून ती ढसढसा रडू लागली.

आज प्रत्येक गोष्टीचे मूल्य वाढले आहे. पुरुष त्यांचे वीर्य विकत आहेत आणि स्त्रियाही त्यांची बीजांडे विकून मोठा पैसा मिळवत आहेत. परंतु त्याचवेळी अनेक देशांमध्ये वेश्यावृत्तीसाठी किंवा वेठबिगार म्हणून 10-20 डॉलरच्या मोबदल्यात मुले विकली जात आहेत.

देह-व्यापार एक जटिल समस्या आहे. त्याचे समाधानही बहुमुखी असले पाहिजे. आपल्याला धर्म, दारिद्य्र व कायदेशीर बाबी इत्यादी समग्र पैलूंवर लक्ष द्यावे लागेल. समाजसेवा व जागरूकता-अभियानांचीही या कार्यात महत्त्वाची भूमिका आहे. हे सर्व पैलू विचारात घेऊन आपण परस्पर सहकार्याने सद्य परिस्थिती सुधारू शकतो. नियमितपणे मधुमेहाचे औषध घेऊनही जर तो रोगी गोड पदार्थ खात राहिला तर त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल. मधुमेहासाठी आहार नियंत्रण व जीवनशैलीतील बदल हे घटक औषधापेक्षाही जास्त महत्त्वाचे असतात. ज्यांना शाळेच्या अभावी योग्य शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत आणि अधिकांश मुले चौथी किंवा आठवी पर्यंतच शिकतात, अशा गरीब मुलांच्या बाबतीत केवळ आर्थिक मदतीने परिस्थिती सुधारणार नाही. आपण नव्या पिढीला तसेच देहव्यापारात फसलेल्यांना प्रायोगिक शिक्षण दिले पाहिजे की जेणेकरुन त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण होईल. आपण त्यांच्यामधील सुप्त साहस व आत्मविश्वास जागवून त्यांना परिस्थितीवर मात करण्यास मदत केली पाहिजे. आपण त्यांना जाणीव करुन दिली पाहिजे की ते मांजरीच्या पिल्लांसारखे असहाय्य व दुर्बळ नाहीत तर शक्तिशाली साहसी सिंह आहेत. आपण त्यांचे मनोबळ वाढविले पाहिजे.

शिक्षण दोन प्रकारचे असते. एक आहे उपजीविकेसाठीचे शिक्षण आणि दुसरे आहे जीवनाविषयीचे शिक्षण. आपण महाविद्यालयात डॉक्टर, इंजीनियर किंवा वकील बनण्यासाठी जे शिक्षण घेतो ते उदरनिर्वाहासाठीचे शिक्षण झाले. याउलट जीवनाविषयीच्या शिक्षणासाठी अध्यात्माची मूलभूत तत्त्वे समजून घेण्याची जरुरी असते. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ यंत्रांची भाषा समजणारे लोक निर्माण करणे हा नाही. शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे हृदयाची संस्कृती प्रदान करणे- एक अशी संस्कृती जी चिरस्थायी संस्कारांवर आधारित आहे.

अम्मांचे भक्तगण जेव्हा गावांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी जातात तेव्हा महिलांना लैंगिक शिक्षण व जीवन संपन्न बनविणारे शिक्षणही दिले जाते. परिणामस्वरुप अनेक तरुण मुली स्वतःला वेश्यावृत्तीसाठी विकण्यापासून वाचवू शकल्या. अनेकदा त्यांचे मातापिताच त्यांची विक्री करतात. ज्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले गेले होते अशा काही जणी अम्माकडे मदत मागण्यासाठी आल्या असता अम्माने त्यातील 80 % मुलींना वाचविले आहे. उर्वरीत 20% तेच नरकप्राय जीवन जगत आहेत. त्यांची बदलण्याची इच्छा नाही आणि अम्मानेही त्यांना दुसरे काही काम करण्याची जबरदस्ती केली नाही.

कामवासना ही एक प्रकारची भूकच आहे. आपल्याला भूक लागली तरी आपण जे काही समोर येईल त्यावर ताव मारीत नाही. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन खाद्यपदार्थांची ऑर्डर देतो. आपल्या आजूबाजूला बसलेल्यांनीही अनेक पदार्थांची ऑर्डर दिलेली असते. अशा वेळी आपल्या मनात कधी असा विचार येऊ शकतो की अरे, मी त्या पदार्थाची ऑर्डर दिली असती तर बरे झाले असते. आपल्या मनात असा विचार आला तरी आपण संयम बाळगतो. अशाप्रकारे जीवनात आपल्याला प्रत्येक ठिकाणी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे, विशेषतः कामवासनेच्या बाबतीत.

आध्यात्मिक संस्कार बालवयातच दिले पाहिजे. लहानपणी आई सांगायची की, ‘बेटी, नदीत कधी लघवी करु नये. नदी देवी आहे.’ खाडीच्या थंड पाण्यात पोहताना लघवीची इच्छा व्हायची पण आईचे शब्द आठवून आम्ही स्वतःवर संयम ठेवू शकत होतो. नदीप्रति आपला आदरभाव असेल तर आपण कधी तिच्यात घाण करणार नाही. जुन्या काळी लोकांचा नदीप्रति आदरभाव असल्याने आपले पूर्वज नदी स्वच्छ ठेवत होते आणि स्वच्छ नदी सर्वांनाच लाभदायक असते. देव आहे की नाही हे महत्त्वाचे नसून देवावर आपला विश्वास व श्रद्धा असेल तर आपल्यात चांगले संस्कार व समाजात धर्माची पताका उंच ठेवण्यास मदत होते. हे संस्कारच समाज व संपूर्ण सृष्टीत संतुलन टिकवून ठेवतात.

रस्ते वाहनांच्या रहदारीसाठी बनविले जातात. पण कुणी म्हटले की मी माझ्या मर्जीने गाडी चालवेन तर अशाने अपघात होतील. ज्याप्रमाणे रहदारीचे काही नियम असतात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक संस्कार आपल्याला नियमानुसार जगण्यास मदत करतात.

अनेक लोक बाल मजूरी संपविण्याच्या दिशेने कार्य करीत आहेत. परंतु नुसते कायद्याच्या आधाराने त्यावर बंदी घालून ही समस्या दूर होणार नाही. एकदा एकजण दहा वर्षाच्या मुलाला घेऊन अम्माकडे आला. तो मुलगा कसा अनाथ झाला हे सांगून तो म्हणाला की हा मुलगा आश्रमात राहून मोठा व्हावा अशी माझा इच्छा आहे. त्याच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असल्याने त्याची आई व बहीण घराजवळच्या एका काडेपेटी बनविणार्या कारखान्यात काम करु लागल्या. नंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी आईला मुत्रपिंडात खडा झाल्याने काम करण्यास मनाई केली आणि अखेर तिने अंथरुण धरले. त्याच्या बहिणीला एवढी कमी मजुरी मिळायची की त्यात त्यांचा उदरनिर्वाह होणे अवघड झाले. मग काही दिवसांनी बालमजूरी विरुद्ध कायदा बनला आणि काडेपेटी फॅक्टरीच्या मालकाला अटक झाली. त्याची फॅक्टरी बंद झाली आणि परिणामस्वरुप तेथे काम करणार्या सर्व मुलांची नोकरी गेली. आता कमाईचा दुसरा कोणताच मार्ग नसल्याने एके दिवशी आईने मुलाला सकाळी शाळेत पाठविल्यावर मुलीला विष देऊन स्वतःही विष घेऊन आत्महत्या केली. असे कारखाने बंद करणे योग्य आहे असे वाटते परंतु त्या कारखान्यावर पूर्णतः अवलंबून असलेल्या गरीब कुटुंबांचा त्यावेळी आपल्याला विसर पडतो. एखाद्या समस्येचे समाधान शोधण्याच्या प्रयत्नात जर आपण फक्त एकाच पैलूवर लक्ष देऊन इतर पैलूंकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम अशा गरीब लोकांना भोगावा लागतो ज्यांच्याकडे उपजीविकेसाठी दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नाही. म्हणून बालमजूरी व देहव्यापाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याआधी, आपण अशी एक संस्था स्थापन केली पाहिजे, जी अशा कुटुंबांना आत्मनिर्भर बनविण्याच्या कामी तसेच त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांना पूर्ण मदत करु शकेल.

करुणा अध्यात्माचा प्रारंभही आहे आणि शिखरही आहे. जर आपण ‘करुणा’ हा शब्द केवळ शब्दापुरताच मर्यादित न ठेवता तो कर्मामध्ये रूपांतरित केला तर जगातील जवळजवळ 90% समस्या दूर होतील. जगात दोन प्रकारचे दारिद्य्र दिसून येते. पहिला प्रकार आहे- अन्न, वस्त्र आणि निवार्याच्या अभावाचे दारिद्य्र आणि दुसरा प्रकार आहे प्रेम व कारुण्याच्या अभावाचे दारिद्य्र. परंतु आपण प्रथम दुसर्या प्रकारच्या दारिद्य्रावर काम केले पाहिजे. आपल्या हृदयात प्रेम व कारुण्य असेल तर आपण अन्न, वस्त्र व निवार्याचा अभाव असलेल्या दरिद्री नारायणाची पूर्ण मन लावून सेवा करु शकू.

भगवद्गीतेनुसार, सृष्टी आणि स्रष्टा भिन्न नसून एकाच वस्तूची दोन भिन्न नावे आहेत. जसे समुद्र आणि त्याच्या लाटा दोन नसून एकच वस्तू आहे. पाण्याने भरलेल्या हजार घटांमध्ये हजार सूर्य प्रतिबिंबित होत असलेले दिसले तरी वस्तुतः सूर्य एकच आहे. याचप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये एकच आत्मा विद्यमान आहे. ज्याप्रमाणे एका हाताला वेदना होत असतील तर दुसरा हात स्वाभाविकपणे वेदना दूर करण्यासाठी सरसावतो, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी दुसर्यांमध्ये स्वतःला पाहून सहाय्य व सहारा देण्यासाठी पुढे आले पाहिजे.

सर्व धर्म व सर्व देशांचे लोक मानवी गुलामीच्या विनाशकारी परिणामाचे शिकार ठरुन घोर यातना व दुःख सहन करीत आहेत. भाषा, जाती व वर्णभेदाने त्यांच्या शारीरिक व मानसिक दुःखात थोडाच फरक पडतो? हे सारे लोक एक समान मानव आहे. अंतहीन दुःख व भावनिक दमनाच्या पंज्यातून सुटण्यासाठी धडपडणारे मानव!

बाह्य जखमा भरुन येण्यासाठी काही अँटिबायोटिक्स व मलमे असतात. याचप्रमाणे आपल्या आतील अवयवांचे रोग दूर करण्यासाठी दुसर्या प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु आपल्या मनाचे घाव भरण्यासाठी एकमेव औषध आहे- शुद्ध प्रेम. देह-व्यापारात भरडल्या गेलेल्यांचे मानसिक व भावनिक घाव भरुन काढण्याचे एकच माध्यम आहे आणि ते आहे आपण त्यांची निस्स्वार्थ प्रेमाने देखभाल करावी जेणेकरुन त्या लोकांना भूतकाळात त्यांच्यावर लादलेल्या अंधःकारातून बाहेर पडून स्वतंत्र जीवनाच्या प्रकाशात जगण्याचे बळ मिळू शकेल. हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला समाजसेवकांचे एक पथक तयार करावे लागेल. आणि अशी समर्पित सेना निर्माण करण्याचे कार्य केवळ धर्म आणि आध्यात्मिक गुरुच करु शकतात.

माझी प्रार्थना आहे की सर्व प्राण्यांमध्ये अंतस्थ कारुण्याचा उदय होवो. आपल्या सर्वांमध्ये अशी विवेक बुद्धी जागृत व्हावी की आपण जीवन व आपल्या सभोवतालच्या सर्व जीव जंतूशी प्रेम व आदराने व्यवहार करावा. आपण काही पृथक पृथक द्वीप नसून ईश्वरीय सृष्टीच्या शृंखलेच्या परस्परांत गुंफलेल्या कड्या आहोत. ईश्वर कृपेने आपल्यास हे सत्य ओळखता यावे.आपण दुसर्यांचे सुखदुःख स्वतःचे सुखदुःख समजले पाहिजे. भूतकाळातील सर्व दुःख विसरुन, आपण सर्वांना क्षमा करण्यास सक्षम होवोत. या जगातील सर्व चांगुलपणासमोर नतमस्तक होऊन आपण अखंड सुखाचे भागीदार बनोत.

केवळ प्रेमाने परिपूर्ण संरक्षण व देखभालीनेच देह व्यापाराची शिकार झालेल्यांची आपण तीन प्रकारे मदत करु शकतो. एक- त्यांचे भूतकाळातील घाव भरुन येण्यास, दुसरे त्यांच्यावर लादलेल्या अंधःकारातून त्यांना बाहेर काढण्यास, आणि तिसरे त्यांच्या जीवनात येणार्या नवीन पहाटेचे स्वागत करण्यासाठी त्यांना तयार करुन. आपल्या सर्वांनाच दुसर्यांच्या तसेच आपल्या स्वतःच्याही जुन्या चुका व त्यातून मिळालेले दुःख विसरण्याचे सामर्थ्य लाभो. समष्टीप्रति आपण कृतज्ञतेचा अनुभव करुन नतमस्तक व्हावे!

देह-व्यापाराच्या समस्येचे नैतिक, आर्थिक व कायदेशीर असे अनेक पैलू आहेत. म्हणून त्याचे समाधानही अनेक स्तरांवर शोधावे लागेल. सर्वसमावेशक प्रयत्नांनीच आपण ही समस्या काही मर्यादेपर्यंत कमी करण्याची आशा करु शकतो. माझी परमात्म्याला प्रार्थना आहे की त्याने या कार्याशी संलग्न असलेल्या सर्वांना कार्य करण्याची शक्ती प्रदान करावी.

॥ ॐ लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु॥