हिंदू धर्माला ‘सनातन धर्म’ असेही म्हटले जाते. याचे कारण असे की तो कोणत्याही देश-काळासाठी उपयुक्त आहे. तो संपूर्ण जगाच्या उत्थानासाठी शाश्वत सत्याची शिकवण देतो. सनातन धर्म सर्वसमावेशक आहे. त्यात भौगोलिक सीमा व संकुचित मनोवृत्तींसाठी कोणतेही स्थान नाही.
‘असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्माऽमृतं गमय।’
(हे परमात्मन् मला असत्याकडून सत्याकडे, अज्ञानरूपी अंधकारातून आत्मदर्शनरूपी ज्ञानप्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा.)
‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु।’ (सर्व लोक सुखी होवोत.)
‘पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।’
(माझे आत्मस्वरूप पूर्ण आहे, तसेच हे व्यक्त व अव्यक्त ब्रह्मही पूर्णच आहे. त्या पूर्ण ब्रह्मात माझे आत्मस्वरूपरूपी पूर्ण ब्रह्म मिळविले किंवा वजा केले तरी अवशेष जे राहते तेही पूर्णच राहते.)
आपल्या ऋषिमुनींनी जगाला अशा प्रकारच्या उदात मंत्रांची देणगी दिली आहे. त्यांच्यात कुठेही, कोणालाही, कोणत्याही प्रकारे परपीडनाचा भाव लेशभरही पाहायला मिळत नाही. ऋषींनी त्या परम अद्वैत सत्याची अनुभूती घेतली होती.
फ्रिज वस्तूला थंड बनवितो, हीटर गरम करतो, बल्ब प्रकाश देतो, पंखा हवा देतो. परंतु या सर्व उपकरणांना कार्यप्रवण करणारा विद्युतप्रवाह तर एकच असतो. या उपकरणांचे कार्य, उपयोग, किंमत भिन्न आहे, म्हणून एकातून वाहणारा विद्युतप्रवाह दुस-यातून वाहणा-या विद्युत प्रवाहापेक्षा श्रेष्ठ वा नीच आहे असे म्हणण्यात काही अर्थ आहे का? ज्याप्रमाणे भिन्न यंत्रांतून प्रवाहित होणारा विद्युतप्रवाह एकच असतो, त्याचप्रमाणे निरनिराळ्या वस्तूंच्या बाह्य नाम-रूपात वैविध्य असूनही सर्वांमध्ये अंतस्थ चैतन्य एकच आहे. हे आंतरिक ऐक्य पाहण्याची शक्ती साधना करून प्राप्त केली पाहिजे. अनुभवसिद्ध ऋषिमुनींनी ते सत्य आपल्या अनुयायांमध्ये संचारित केले. या आत्मदर्शनानेच भारतातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनशैलीचे रूप घडविले आहे. ह्या संस्कारांच्या अनुयायांना हिंदू म्हणतात. वस्तुतः हा इतर धर्मांसारखा एक धर्म नाहीये. कारण की धर्माचा सर्वसाधारण अर्थ एखाद्या विशिष्ट व्यक्तीने स्थापन केलेला असे मानले जाते. उलटपक्षी सनातन धर्मातील हे सारे संस्कार, अनेक भिन्न मतमतांतरे, भिन्न काळात, भिन्न मार्गांनी, भिन्न दृष्टिकोन असलेल्या अनेक सत्यद्रष्ट्या ऋषींच्या अनुभवांचा समन्वय आहे. म्हणून हिंदू धर्म कोणत्याही एका व्यक्तीने स्थापन केलेला नाहीये. तसेच सनातन धर्माचे आधारभूत तत्व कोणत्याही एका धर्मग्रंथापुरते मर्यादित नाहीये. हा धर्म समग्र जीवनदर्शन आहे.
सनातन धर्म असे म्हणत नाही की, ईश्वरप्राप्तीसाठी एकच ठराविक साचेबंद मार्ग असून त्याला फक्त एका विशिष्ट नावानेच पुकारले जाऊ शकते. सनातन धर्म एखाद्या सूपर मार्केटसारखा आहे. असे काहीही नाही की जे इथे उपलब्ध नाही. महात्म्यांनी दाखविलेल्या अनेक मार्गांपैकी कोणत्याही एका इष्ट मार्गाची निवड करण्याचे किंवा स्वतःच एखादा नवीन मार्ग शोधून काढण्याचेही स्वातंत्र्य सनातन धर्मात आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्याचे किंवा न ठेवण्याचेही स्वातंत्र्य सनातन धर्म देतो.
सनातन धर्म दुःखापासून आत्यंतिक मुक्तीलाच मोक्ष म्हणतो. ते लक्ष्य प्राप्त करण्याच्या मार्गाबद्दल सनातन धर्म कोणताही हट्ट धरीत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीनुसार सद्गुरू लोकांना उपदेश देतात, त्यांना मार्गदर्शन करतात.
सनातन धर्म सर्वांमध्ये दिव्यत्व पाहत असल्याने त्यात अंतहीन नरकाची कल्पनासुद्धा नाही. सनातन धर्माचे असे मत आहे की कितीही मोठा पापी असला तरी तो सद्विचार व सत्कर्मांच्या माध्यमातून स्वतःला शुद्ध करू शकतो व ईश्वरसाक्षात्कार प्राप्त करू शकतो. कितीही पापकर्मे केली असली तरी एखाद्यात खरोखर पश्चात्ताप जागला तर तो वाचू शकतो. असे कोणतेही पाप नाही की जे पश्चात्तापाने धुतले जात नाही.
ज्याप्रमाणे बिझीनेस चालविण्यासाठी बिझीनेस मॅनेजमेंट शिकण्याची आवश्यकता आहे तसेच जीवन आनंदपूर्ण बनविण्यासाठी जीवनाचे मॅनेजमेंट शिकण्याची आवश्यकता आहे. जीवनाच्या मॅनेजमेंटचे समग्र शास्त्र आहे, ‘सनातन धर्म.’