संपूर्ण जगभर लोक नवीन वर्षाच्या स्वागताची आणि त्याबरोबर येणा-या अनुभवांना सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. याप्रसंगी अम्मा परमात्म्याला प्रार्थना करु इच्छिते की, आमच्या हृदयांत प्रेम, करुणा ओसंडून वाहू दे, आमची हृदये ईश्वराप्रती जागरुक राहू दे, आणि आमच्या दैनंदिन व्यवहारात ते अधिकाधिक व्यक्त होऊ दे. ज्यांच्याकडे धनधान्याची विपुलता आहे, त्यांच्या मनात अन्न-वस्त्र-निवा-याचा अभाव असलेल्यांना मदत करण्याचा भाव उपजू दे.
हे परमात्मन्! मानवजात आपल्या उच्च मूल्यांपासून ढळून पशुत्वाच्या निम्नतम पातळीवर उतरण्यास कारणीभूत असलेल्या आमच्या मनातील युद्ध, संघर्ष व दहशतवादी विचारांचे पूर्णतः उच्चाटन कर. समाजाचा चांगुलपणा ज्यामुळे पोखरुन निघत आहे असा भ्रष्टाचार, खोटारडेपणा व शोषण कमी होऊ दे. लहान मुले, अपंग व दीनदुबळ्याचे रक्षण करण्याचा मनोभाव आमच्यात निर्माण कर.
वरील सर्व गोष्टींसाठी अम्मा तिच्या हृदयाच्या गाभा-यातून आर्त प्रार्थना करीत आहे. ही प्रार्थना पूर्ण व्हावी म्हणून अम्मा माझ्या सर्व लेकरांनांही माझ्याबरोबर प्रार्थना करण्याची व त्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न करण्याची विनंती करते आहे.
आजच्या या जगात एकाच घरात राहणारे दोघेजणही परस्पर प्रेम, विश्वास व शांतीने एकत्र राहू शकत नाही. सतत वाद घालणे, भांडणे व एकमेकांवर दोषारोपण करणे यातच सारे आयुष्य निघून जाते. प्रेम देणे किवा घेणे या करिता त्यांना वेळच नाहीये आणि इच्छाही नाहीये. लोक एक दुस-यांवर प्रेम करण्याऐवजी कुत्री, मांजरी व पक्षी पाळून त्यांच्यावर प्रेम करतात. जणूकाही मानव मानवाखेरीज दुस-या कशावरही प्रेम करायला तयार आहे. एवढेच नाही तर आपण आपले मोबाईल फोन, कॉम्प्युटर्स व इलेक्ट्रोनिक्स वस्तूंवरही खूप प्रेम करतो. पण एकमेकांवर प्रेम करणे व विश्वास दाखवणे मात्र आपल्याला अजूनही जमत नाही.
हे नुतन वर्ष प्रत्येकाचे हृदय प्रेम, कारुण्य, प्रकाश, सुगंध व सौन्दयाने भरुन टाको. हे साध्य होण्यासाठी प्रार्थना करुया, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया.
।। ॐ लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु ।।