दक्षिण भारतातील केरळमधील सद्गुरु ‘श्रीमाता अमृतानंदमयी देवी’ तथा ‘अम्मा ‘ आजच्या भौतिकतेच्या युगात सच्च्या प्रेमाला पारख्या झालेल्या आणि जीवनावरची श्रद्धा उडालेल्या जनसमुदायावर आपल्या अपार ईश्वरी प्रेमाचा वर्षाव करीत आहेत. अल्प वयातच आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थित असलेल्या अम्मा संपूर्ण चराचर आपला आत्माविष्कार म्हणून पाहतात. संसाराच्या तापात होरपळलेल्या आर्त मानवाच्या दुःखांचे ओझे आपल्याकडे घेऊन त्याबदल्यात त्यांना आशेचा नवा किरण दाखवून पूर्णतेचा व अक्षय आनंदाचा मार्ग दाखवित आहेत. त्यांच्याकडे येणा-या आर्त, जिज्ञासू व मुमुक्षु अशा प्रत्येकालाच, जाती-धर्म-देश-वय-लिग अशा कोणत्याही भेदभावाविना मातृवात्सल्याने छातीशी कवटाळून, आपल्या हाताने दुःखी जणांचे अश्रू पुसून, हळूवारपणे पाठीवरुन हात फिरवून, कारुण्यपूर्ण वात्सल्याने प्रत्येकाचीच विचारपूस करुन आपल्या अपार दिव्य प्रेमाचा वर्षाव करतात. अशा रीतीने अम्मा असंख्य लोकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणीत आहेत. गेल्या 40 वर्षांत संपूर्ण जगभरातील जवळजवळ 2.60 कोटी लोकांना मातृवात्सल्याने आलिंगन दर्शन देणारी ही अम्मामाऊली एक अद्वितीय व अलौकिक विभूती आहे. अम्मामाऊली आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण जगाच्या कल्याणासाठी वेचीत आहेत. दुस-यांचे उत्थान करण्याच्या अम्मांच्या या अथक कार्याचे फलस्वरूप म्हणून संपूर्ण जगभर धर्मार्थ सेवाकार्याचे एक विशाल जाळेच विणले गेले आहे. या सेवाकार्याच्या माध्यमातून लोकांना निःस्वार्थ सेवेचे सौन्दर्य व महत्व पटत असून त्यामाध्यमातून ते शांतीचा अनुभव घेत आहेत.
अम्मांची शिकवण आहे की , “ जड, चेतन अशा सर्वच वस्तमध्ये दिव्यत्वाचा वास आहे. संपूर्ण चराचरात ही दैवी आधारभूत एकात्मता पाहणे हे नुसतेच अध्यात्माचे सार नसून सर्व दुःखांचा अंत करण्याचा तोच एकमेव मार्ग आहे .”
अम्मांची शिकवणूक वैश्विक आहे. जेव्हा जेव्हा त्यांना तुमचा धर्म कोणता असे विचारले जाते तेव्हा त्या म्हणतात, “माझा धर्म आहे-प्रेम. ”
त्या असा आग्रह धरीत नाही की तुम्ही देवाधर्मावर विश्वास ठेवलाच पाहिजे.
“तुमचे सत्यस्वरूप काय आहे, हे जाणून घ्या व तुमच्या त्या स्वस्वरूपावरच विश्वास ठेवा, ” एवढेच त्या आवर्जुन सांगतात.
संक्षिप्त जीवन चरित्र
27 सप्टेंबर 1953 साली केरळ मधील पश्चिम समुद्रतटावर वसलेल्या एका कोळीवाड्यात एका अद्भूत बालिकेचा जन्म झाला. आईवडिलांनी तिचं सुधामणी असं नामकरण केले. ती या जगात आली तीच मुळी चेह-यावर प्रसन्न हास्य घेऊन. नजिकच्या काळात ती जगाला जो आनंद आणि कृपाशीर्वाद प्रदान करणार होती, त्याची जणू ती भविष्यवाणीच व्यक्त करीत होती.
श्रीकृष्णासारखा गडद निळा रंग व इतर अनेक दैवी गुण घेऊन जन्मास आलेली सुधामणी वैशिष्ट्यपूर्ण बालिका होती. बालपणापासूनच तिला आपल्या सत्य स्वरूपाची पूर्ण जाणीव होती. श्रीकृष्ण भक्ती हा तिचा सहज अंतरंग स्वभाव होता. अगदी लहान वयापासूनच ती नेहमी बाह्य जगाचे भान विसरुन ध्यानमग्न असायची. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ती श्रीकृष्ण स्तुतीपर गीतरचना करुन आपल्या सुरेल व भक्तिपूर्ण आवाजात गाऊ लागली. गीतांच्या ओळी अत्यंत साध्या दिसत असल्या तरी त्यांत तत्त्वज्ञानाचा गूढ आशय भरलेला असायचा.
सुधामणी नऊ वर्षाची असतानाच आईच्या आजारपणामुळे घरकामाचा संपूर्ण बोजा तिच्या खांद्यावर पडला. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या सुधामणीचं प्राथमिक शिक्षण येथेच संपलं. घरकामाचा प्रचंड बोजा सुधामणी काहीही कुरकुर न करता मुकाट्याने उरकायची व आपल्या दिवसभरातील कामाचा प्रत्येक क्षण ती परमेश्वर चरणी अर्पण करायची. प्रत्येक अडथळा अथवा वाईट वागवणूक ती परमेश्वराचा कृपाप्रसाद समजून आनंदाने स्वीकारायची व हा परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा मार्ग आहे, या दृष्टीने बघायची. आपल्या आराध्य श्रीकृष्णाचं अखंड चितन हाच तिचा एकमेव आधार होता. मध्यरात्री बाराच्या सुमारास आपली सर्व कामे संपवून छोटी सुधामणी झोपण्याऐवजी उरलेली रात्र ध्यान-धारणा, भजन व श्रीकृष्ण चितनात घालवायची.
सुधामणीचा या लहान वयातही स्पष्टपणे व्यक्त होणारा दुसरा दैवी गुण म्हणजे, तिला गरीब आणि असाहाय्य लोकांबद्दल वाटणारं अपार प्रेम आणि करुणा. आपल्या दिवसभरातील घरकामातून वेळात वेळ काढून सुधामणी शेजा-यांची दुःखभ-या कहाण्या ऐकायची, विशेषतः असहाय्य वृद्धांना त्यांच्या मुलां-नातवंडाकडुन दिली जाणारी वाईट, उपेक्षेची वागवणूक पाहून तिचे हृदय हेलावून जाई. त्यांच्या कहाण्यांतून सुधामणीला जाणवलं की, सांसारिक प्रेम हे नेहमीच स्वार्थप्रेरित असून ते मर्यादित आणि अशाश्वत आहे. या स्वार्थी जगात मानवमात्राचा एकमेव आप्त-स्वकिय व आधार फक्त परमेश्वरच असून ईश्वरी प्रेमच सत्य-शाश्वत आहे, याची तिला जाणीव झाली.
सुधामणीने व्यवहारी जगाची क्रूरता, स्वार्थीपणा आणि त्यांचा परिणाम म्हणून आलेली दुःखं, निराशा अगदी जवळून पाहिली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून तिच्या ईश्वरप्रेमात वाढच झाली आणि त्याची परिणती तिच्या ईश्वरप्राप्तीच्या नैसर्गिक ओढीत झाली. ‘दुःखाच्या ओझ्याखाली दबलेल्या मानवाला दुःखमुक्त करुन त्यांना शाश्वत आनंदाचा मार्ग दाखविणे हाच तर आपला हा देह धारण करण्यामागील उद्देश आहे’, याची तिला बालवयातसुध्दा पूर्ण जाणीव होती. सुधामणी बालपणी देवीला प्रार्थना करायची, ‘हे जगदंबे! तू मला तुझे दर्शन नाही दिलेस तरी चालेल, परंतु मला तुझ्यावर निष्काम भक्तिभावाने प्रेम करु दे. तू माझ्यावर प्रेम नाही केलेस तरी चालेल, परंतु सर्वांवर प्रेम करणारे हृदय मला दे.’ सुधामणी आपल्या परीने दुःख-पीडितांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करायची. आजारी वृद्धांचे कपडे धुणे, त्यांना स्नान घालणे आणि आपल्या घरातून जेवण नेऊन त्यांना खाऊ घालणे, त्यांच्याशी सांत्वनपर संभाषण करुन त्यांना दिलासा देणे, अशी कामे घरातील सर्वांचा विरोध सहन करुन, प्रसंगी मार खाऊन; पण आनंदाने करायची.
वाढत्या वयाबरोबर सुधामणीच्या ईश्वर प्रेमात झपाट्याने वाढ झाली. ब्रह्मानंदी अवस्थेत ती जास्तीत जास्त काळ राहू लागली. जगाचे भान विसरुन ती परमानंदात मग्न होऊन मोठ्याने भजन गात नाचू लागे. सर्व चराचरांतून केवळ श्रीकृष्णच भरुन राहिला आहे; याचा तिला वेळोवेळी भास होऊ लागला. हे संपूर्ण विश्वच कृष्णमय असून आपणही त्याहून वेगळे नाही, या सर्वोच्च अद्वैत अवस्थेपर्यंत ती येऊन पोहोचली होती.
जगदंबेच्या अनपेक्षित दर्शनाने सुधामणीच्या साधना लीलेचा दुसरा टप्पा सुरु झाला. एका तेजःपुंज प्रकाशझोतात सुधामणीला जगन्मातेचे दिव्य दर्शन झाले. त्यानंतर जगन्मातेच्या पुन्हा दर्शनासाठी ती रात्रंदिवस दिव्योन्मादात राहू लागली. घरातील लोक व गावकरी तिची ही दिव्य अवस्था समजण्याएवढे सुज्ञ नव्हते. त्यांनी तिचा हर प्रकारे छळ केला. त्यांनी तिला घर सोडण्यास भाग पाडलं. सुधामणीच्या घरातील लोकांनी आणि गावक-यांनी तिला बहिष्कृत केले, पण याच काळात निसर्गातील विविध पशुपक्षी तिचे जिवाभावाचे मित्र बनून तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेऊन तिचे रक्षण करु लागले.
सुधामणी अत्यंत खडतर तपश्चर्येत महिनोन्-महिने व्यग्र राहिली. आपल्या शरीराच्या प्राथमिक गरजा-अन्न-पाणी, झोप यांचेही तिला भान नसे. तिचे संपूर्ण अस्तित्वच जगन्मातेचे दर्शन व प्रेम प्राप्त करुन तिच्याशी तादात्म्य पावण्यासाठी सिद्ध झाले होते. पायाखालची धरती, वृक्षवल्लरी, वा-याची झुळूक या सर्वांमध्ये तिला जगन्मातेच्या दिव्य अस्तित्वाचा प्रत्यय आला. याकाळात ती दिवसरात्र समाधी अवस्थेत असायची.
या साधनेची परिणती म्हणून अखेरीस जगज्जननी, आदिमाया पराशक्ती आपल्या संपूर्ण दिव्य ऐश्वर्यासहित सुधामणीसमोर प्रकट झाली. सुधामणीचे वैयक्तिक अस्तित्व जगदंबेच्या स्वरूपात विलीन झाले. या प्रसंगाचं वर्णन अम्मा आपल्या एका भजनांत पुढीलप्रमाणे करतात- ‘जगन्माता एक दिव्य तेजःपुंज प्रकाशझोत बनून माझ्यात विलीन झाली. माझं मन परमानंदाने बहारुन गेलं आणि ईश्वरी कृपावर्षावात मी न्हाऊन निघाले. हे संपूर्ण विश्व माझ्या निराकार आत्म्याहून भिन्न नाही या सत्याची प्रत्यक्ष अनुभूती आली.’
अशाप्रकारे सुधामणी जगन्मातेशी तादात्म्य पावून स्वतःच जगन्माता म्हणून उदयास आली. त्यानंतर निर्गुण ब्रह्मतत्त्वाचाही त्यांना साक्षात्कार झाला. जगन्मातेशी तादात्म्य पावलेली सुधामणी या सर्व जगाकडे आपली अजाण लेकरे या दृष्टीने पाहू लागली व भक्तजगात अम्मा(आई)या नावाने प्रसिद्ध पावली.
अम्मांच्या मातृवात्सल्यपूर्ण आलिंगन दर्शनासाठी, त्यांच्या कृपाकटाक्षासाठी हजारो लोक तासन्तास रांगेत उभे राहतात. दर्शनासाठी आलेल्या सर्वांनाच त्या भेटतात. दर्शनाच्या रांगेतील शेवटच्या व्यक्तीचे दर्शन होईपर्यंत त्या एका जागी अथक बसून असतात. अनेकदा अठरा-वीस तास एका जागी बसून हजारो लोकांचे अश्रू पुसून आशीर्वाद देतात. कधी कधी तर क्षणभराचीही विश्रांती न घेता 24 तास हजारो लोकांना दर्शन देतात.
अमृतपुरी आश्रम – साधनालीला पूर्ण करून आत्मज्ञानाच्या सर्वोच्च अवस्थेत स्थित झालेल्या अम्मांनी जगद् कल्याणासाठी आपल्या आध्यात्मिक अनुभूतीचा, सनातन धर्माचा- विश्वप्रेम, कारुण्याचा दिव्य संदेश जगभर पसरविण्यास सुरुवात केली. दर्शनासाठी आलेल्या हजारो लोकांना आईच्या ममतेने पाठीवर हात फिरवून, सांत्वना, आशीर्वाद देण्यास सुरुवात केली. स्वतःला पूर्णपणे गोरगरीब व दुःखी-पीडित मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतले व त्याद्वारे आपल्या आध्यात्मिक अनुभूतीचा, लाभ दुःखपिडीतांना देण्यास सुरुवात केली. त्यांच्याच एका शिष्याने त्यांना ‘माता अमृतानंदमयी’ हे नामाभिधान बहाल केले; परंतु जनसामान्यांत त्या अम्मा(आई) या नावानेच प्रसिद्ध पावल्या.
अम्मांचे दर्शन – अम्मांची दर्शनाची पद्धत अत्यंत विलक्षण आहे. जगन्मातेची साक्षात प्रतिमूर्ती असल्याने या माऊलीला पाहताक्षणीच हृदयाला पाझर फुटून नेत्रांद्वारे अश्रुधारा ओघळू लागतात. दर्शनासाठी आलेल्या सर्वांच्याच पाठीवर आईच्या ममतेने हात फिरवून, सर्वांच्या समस्या वैयक्तिकरित्या ऐकून अम्मा मार्गदर्शन करतात व सांत्वना, आशीर्वाद देतात. त्या देशविदेशात प्रवास करुन आपल्या आध्यात्मिक अनुभूतीचा, प्रेम व कारुण्याचा संदेश प्रसारित करीत आहेत. अम्मांच्या दर्शनाने लाखो लोकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडून आले आहे. त्या परिवर्तनामधूनच अम्मांच्या जनसेवा कार्यक्रमाचे विश्वव्यापी जाळे विणले गेले आहे.