केरळच्या समुद्रतटवर्ती एका दुर्गम खेड्यात जन्मलेल्या अम्मा म्हणतात की त्यांना सदैव ज्ञान होते की या नामरूपात्मक नित्य परिवर्तनशील विश्वाच्या मागे एक उच्चतम सत्य सत्ता विद्यमान आहे. अगदी बालवयातही अम्मा चराचरातील सर्वांप्रती प्रेम व कारुण्य अभिव्यक्त करीत असत.

त्या म्हणतात-
“अम्माकडून या विश्वातील समस्त भूतमात्रांकडे प्रेमाचा एक अखंड प्रवाह निरंतर प्रवाहित होत असतो. हा अम्माचा जन्मजात स्वभावच आहे.”

“बालपणापासूनच अम्माला नवल वाटायचे की लोकांना अशाप्रकारे दुःख-कष्ट का भोगावे लागतात? ते गरीब का आहेत? त्यांची उपासमार का होते आहे? उदाहरणार्थ, अम्माच्या जन्मगावातील अधिकांश लोक मच्छिमार आहेत. कधीकधी ते दर्यावर मासेमारीसाठी गेले असताना त्यांना काहीच मासळी मिळत नसे, आणि परिणामी त्यांना उपाशी राहावे लागे. कधीकधी तर ही उपासमार कित्येक दिवस चालत असे. अम्माचे संबंध या गावक-यांशी अत्यंत घनिष्ठ असल्याने त्यांचे जीवन व अडचणींचे जवळून निरीक्षण करुन जगाचा सत्य स्वभाव तिला कळून आला होता.

“बालपणापासूनच अम्माला सर्व प्रकारची घरकामे करावी लागत. त्यातले एक काम होते घरच्या गाईंची देखभाल करणे. गाईंसाठी चारापाणी म्हणून रोज शेजारच्या 30-40 घरी जाऊन निवडून उरलेल्या भाजीचा कचरा गोळा करण्यासाठी जाई तेव्हा नेहमीच लोक हालअपेष्टा भोगत असल्याचे आढळून येई. कधी म्हातारपणामुळे, तर कधी गरीबीमुळे तर कधी रोगराईमुळे. अशावेळी अम्मा त्या अभागी जीवांजवळ बसून त्यांच्या दुःखांच्या दर्दभ-या कहाण्या आस्थेने ऐकून त्यांचे सांत्वन करीत असे व त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करीत असे.
“कधी कधी अम्मा या लोकांना आपल्या घरी आणून त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालून त्यांना पोटभर खाऊ घालीत असे. कधीकधी तर उपासमारीने त्रस्त असलेल्या त्या बिचा-यांना मदत करण्यासाठी घरच्या तुटपुंज्या शिदोरीतून चोरीही करावी लागे.

“अम्माने पाहिले की मुले लहान असताना आपल्या मातापित्यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. परंतु मोठे झाल्यावर त्याच मुलांना आपले वृद्ध आईवडिल एक ओझे वाटू लागते. हे पाहून अम्माला आश्चर्य वाटत असे की या जगात एवढा विरोधाभास का आहे? या जगात सच्च्या प्रेमाचा एवढा अभाव का आहे? या सर्व दुःखाचे मूळ कारण काय आहे आणि ते निवारण करण्याचा मार्ग काय आहे?

“बालपणापासूनच अम्माला ज्ञान होते की हे जगत् शाश्वत सत्य नसून एकमेव परमात्माच नित्य सत्य आहे. म्हणून अम्मा अधिकांश वेळ गहन ध्यानात लीन असे. अम्माच्या आईवडिलांना व नातेवाईकांना हे काय घडतेय हे कळत नव्हते. अज्ञानवश ते अम्मावर रागावत व ध्यानधारणेला विरोध करीत.

“परंतु कुटुंबियांकडून होणारा छळ व निंदेमुळे मुळीच विचलित न होता अम्मा तिच्या विश्वातच डुंबलेली असे. या काळात झोप व आहाराचा त्याग करुन ती रात्रंदिवस खुल्या आकाशाखालीच राहत असे.“

अम्मा पुढे म्हणतात, “ध्यानावस्थेत त्याचबरोबर दिवसभरातील इतर वेळीही अम्मा सभोवताली दिसणा-या दुःखाचे मूळ काय आहे याविषयी विचार करीत असे. एकदा तिला असे वाटले की मानवजातीचे सध्याचे दुःखभोग हे त्यांच्या पूर्वकर्माचेच फळ आहे. परंतु अम्माचे एवढ्यावर समाधान झाले नाही. आणखी गहन विचार केला असता आतूनच उत्तर आले, ‘जर दुःख भोगणे हे त्यांचे कर्मफळ असेल तर त्यांना मदत करणे हा तुझा धर्म नाही का? जर एखादा खोल खड्ड्यात पडला तर हे त्याचे कर्मफळच आहे असे म्हणून त्याला तसेच सोडून पुढे जाणे योग्य आहे का? अर्थात नाही. अशावेळी त्याला खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी मदत करणे हा आपला धर्म आहे.”

“संपूर्ण सृष्टीशी एकरुपतेची अनुभूती घेतल्यानंतर अम्माला जाणवले की दुःखपिडीत मानवजातीचा उद्धार करणे हा तिच्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तेव्हापासून अम्माने सर्वांना आलिंगन देऊन जगभर सत्य, प्रेम व कारुण्याच्या संदेशाचा प्रसार करण्याचे आध्यात्मिक कार्य सुरु केले.”

आज अम्मा वर्षभरातील अधिकांश वेळ भारत व भारताबाहेर भ्रमण करुन दुःखपिडीत मानवजातीला प्रेमाने आलिंगन देऊन, त्यांचे सांत्वन करुन त्यांची दुःखे हलकी करण्यात व्यतित करतात. त्यांच्या आश्रमात 3000 स्थायी निवासी असून त्याव्यतिरिक्त जगाच्या कानाकोप-यांतून दररोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. अम्मांच्या आदर्शाने प्रेरीत झालेले आश्रमवासी व दर्शनार्थी भक्तगणही स्वतःला जनसेवेसाठी वाहून घेतात. अम्मांच्या धर्मार्थ जनसेवेच्या विशाल जाळ्याच्या माध्यमातून ते बेघरांसाठी घरे बांधतात, निराधारांना पेन्शन देतात आणि रुग्णांना औषधे देऊन त्यांची सेवाशुश्रूषा करतात. जगभरातील असंख्य लोक या प्रेम-सेवा कार्यात आपले योगदान देत आहेत.

अम्मा म्हणतात, “प्रेम हेच एक असे औषध आहे जे या जगाचे दुर्धर घाव भरु शकते. या जगात प्रेमच सर्वांना एकत्र बांधते. जेव्हा उदात्त प्रेमाची ही जाणीव आपल्यात उदय पावेल तेव्हा आपापसातील सारे अंतर्विरोध मावळून जगात शांती व सद्भावाचे राज्य अवतरेल.”