सुनामी 2004
26 डिसेंबर 2004 रोजी दक्षिण आशियातील अनेक देशांना सुनामीचा फटका बसला होता. भारतात तमिळनाडू व केरळच्या किनारपट्टीवर अमृतपुरी आश्रम परिसरातही सुनामीच्या या विनाशकारी लाटा धडकल्या होत्या.
त्यावेळी आश्रमात उपस्थित असलेले देशविदेशातील 20000 भक्त व हजारो स्थानीक लोकांना अम्मांनी स्वतः पाण्यात उतरुन खाडीच्या पलिकडे मुख्य भूमीवर सुरक्षित स्थळी पाठवून अर्ध्या तासातच मदत शिबिर सुरु केले. सर्वस्व गमावलेल्या हजारो लोकांना सहा महिनेपर्यंत तीन वेळच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. सुनामी आपत्तीनंतर मठाने आपल्या जागेवर वीज, पंखा, स्वतंत्र बाथरुम इत्यादी सुविधांनी सुसज्ज अशा नऊ तात्पुरत्या निवारा शेड्स उभारुन 250 बेघर कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली.
केरळ, तमिळनाडू, पाँडेचेरी, अंदमान निकोबार द्वीपसमूह व श्रीलंकेतील आपद्ग्रस्तांसाठी एकूण 6200 सुनामी व भूकंप रोधक घरे बांधून दिली. केरळातील कोल्लम, अलेप्पी व कोच्ची जिल्ह्यातील सुनामीग्रस्त कुटुंबांना स्वयंपाकाची भांडी विकत घेण्यासाठी दीड कोटी रूपयांचे अर्थसहाय्य केले.
महिलांना शिलाई मशीन, 2500 तरुणींना नर्सिंग कोर्स, तरुणांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण व सुरक्षा रक्षक इत्यादी क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन नोकरीही दिली गेली. सुनामीच्या विनाशाने मानसिक आघात बसलेल्यांच्या शांती-समाधानाठी, त्यांच्या मनातील भय दूर करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अम्मांच्या आश्रमातर्फे विशेष कार्यक्रम राबविले गेले.
तमिळनाडूतील सुनामीग्रस्त नागपट्टनम् येथे आश्रमाने 100 कुटुंबासाठी तात्पुरत्या निवा-याची सोय केली. अम्मांनी स्वतः या तात्पुरत्या घरांना भेट देऊन आपद्ग्रस्ताचे अश्रू पुसले.
13 फेब्रुवारी 2005 रोजी अम्मांनी येथील सुनामीग्रस्त भागाला भेट दिली. हजारो कुटुंबांनी अम्मांच्या दर्शनासाठी धाव घेतली. अम्मांच्या मांडी-खांद्यावर मस्तक विसावून त्यांनी आपले अंतरीचे दुःख हलके केले. तसेच अम्मांनी ऐनवेळी जी मदत केली त्याबद्दल अम्मांचे आभार मानले. त्यांनी अम्मांच्या खांद्यावर मस्तक ठेऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. अम्मांनी त्यांना नवीन जीवन सुरु करण्यासाठी सर्वतोपरि मदत देण्याचे आश्वासन दिले. डिसेंबर 2005 मध्ये या कुटुंबांनी आश्रमाने बांधून दिलेल्या नवीन घरात प्रवेश केला.
अमृतपुरीच्या एका बाजूला अरबी समुद्र व दुस-या बाजूला खाडी आहे. 18 किलोमीटर लांबीच्या या द्वीपाला मुख्य भूमीला जोडणारा एकच पुल होता. सुनामीच्या वेळी खाडी पार करुन सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धडपडणारे अनेक गावकरी मृत्युमुखी पडल्याचे ऐकून अपार करुणामयी अम्मा अत्यंत व्यथित होऊन म्हणाल्या, ‘इथे एक पुल असता तर अनेकांचे प्राण वाचले असते.’ आणि अम्मांच्या निर्देशानुसार एका वर्षाच्या आतच आश्रमाने खाडीवर पुल बांधला.
भारताचे तात्कालीन पंतप्रधान श्री. अब्दुल कलाम यांनी या अमृतसेतूचे उद्घाटन केले. जर पुन्हा सुनामी आली तर अर्ध्या तासात हजारो गावकरी मुख्यभूमीवर जाऊन आपले प्राण वाचवू शकतील.
केरळच्या समुद्रकिना-यावर एक लाख खारफुटीची झाडे लावण्यात आली जेणेकरुन पुन्हा सुनामी आली तर या खारफुटीच्या झाडामुळे किनारपट्टीची धूप कमी प्रमाणात होईल.
मृत्यूचे तांडव पाहून मनाने खचलेल्या दहा हजार मुलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी योगाभ्यास, संस्कृत, इंग्रजी, खेळ इत्यादी कार्यक्रमांचे दहा दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले.
कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या ज्या जोडप्यांची सर्व मुले सुनामीत मृत्युमुखी पडली होती अशा 7 महिलांची पुन्हा शस्त्रक्रिया करुन त्यांना पुन्हा आई होण्याचे भाग्य प्रदान करण्यात आले.
केरळ व तमिळनाडूत सुनामीग्रस्तांच्या घरांचे बांधकाम पूर्ण करुन त्यांना घराच्या चाव्या सोपविण्याचे काम अम्मांच्या आश्रमानेच सर्वप्रथम पूर्ण केले. या बांधकामात आश्रमवासी व अम्मांच्या देशीविदेशी भक्तांनी श्रमदान केले. हे श्रमदानमूल्यही हिशोबात धरले तर जवळजवळ 200 कोटी रूपयांची मदत सुनामीग्रस्तांपर्यंत पोहोचली गेली.
सुनामीनंतर अम्मांनी स्वतः श्रीलंकेत जाऊन आपद्ग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांना अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी मदत दिली.
रोजगाराचे साधन नष्ट झालेल्या केरळ व तमिळनाडुतील सुनामीग्रस्त शेकडो कोळ्यांना मच्छिमार बोटी, जाळी, इंजिन इत्यादी साहित्य वाटण्यात आले.