प्रश्न : अम्मा, आम्ही देवाच्या सगुण रूपावर का ध्यान करावे? निर्गुण निराकार परब्रह्मावर ध्यान केले तर काय हरकत आहे?

अम्मा :  बेटा, सत्य, प्रेम यासारख्या गुणांची तू एखाद्या रूपाविना कल्पना करु शकतोस का? ते शक्य नाही, कारण हे गुण निराकार आहेत. गुणांचा विचार करण्यासाठी आपल्याला एखाद्या वस्तूची जरुरी पडते की जिच्यात ती गुणवैशिष्टे स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत. असे असतांना सर्व कल्पनांच्या पार असलेल्या निर्गुण निराकार परब्रह्मविषयी काय बोलावे? आपले मन एवढे स्थूल आहे की ते अशा देवाचा विचारही करु शकत नाही की जो निर्गुण, निराकार व अपरिवर्तनीय आहे. म्हणून आपल्याला एखाद्या अशा विभूतींची जरुरी पडते जी दिव्य गुणांनी ओतप्रोत आहे. श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीबुद्ध या अशा दिव्य विभूती आहेत. आपल्या मनाला आधारासाठी कशावर तरी झुकण्याची नेहमीची सवय आहे. लहानपणी आईवडिलांनी आपल्याला गोंजारावे, आपले लाड, कौतुक करावे असे आपल्याला वाटते. थोडे मोठे झाल्यावर आपल्याला खेळण्यात गोडी वाटते, आपल्या समवयस्क मित्रांच्या संगतीत अधिकाधिक वेळ रहावे असे वाटते. नंतर शाळेत गप्पा मारण्यासाठी आपल्याला खूप मित्रमंडळी मिळतात. पुढे कॉलेजात गेल्यावर आपले मन मोकळे करण्यासाठी आपल्याला मित्रमैत्रिणी भेटतात. पुढे लग्न झाल्यावर आपल्या समस्या व काळज्या सांगण्यासाठी आपली पत्नी किवा पती असतो. अशाप्रकारे मन मोकळे करण्यासाठी मरेपर्यंत कुणी ना कुणी असतेच. अशाप्रकारे सांत्वना व दिलासासाठी सदैव कुणावर तरी अवलंबून असणारे मन अशा देवाची कल्पनाही करु शकत नाही की जो निर्गुण निराकार आहे. आपल्याला पूजाउपासनेसाठी देवाच्या नाम व रूपाची आवश्यकता असते.  म्हणून आपण म्हणतो की निर्गुण निराकार परब्रह्म कृष्ण व रामाच्या रूपात प्रकट झाले आहे. आपण या नामरूपात्मक सगुण ईश्वराशी एक आंतरिक नाते विकसित केले पाहिजे. इथे आपण त्यांच्या देहांची पूजाउपासना करीत नसून त्यांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या उच्च दिव्य तत्त्वांची आपण आराधना करीत असतो. निराकारावर ध्यान करण्यासाठीही उदात्त कल्पनेची जरुरी असते. ज्यांना जन्मजात अत्यंत सूक्ष्म मनाची देणगी लाभली आहे फक्त तेच निराकारावर ध्यान करु शकतात. पण असे किती लोक आहेत? 99 टक्के लोकांची मने अत्यंत स्थूल आहेत. त्यांच्यात सूक्ष्मता मूळीच नाही. थोड्याशा सूक्ष्म मनाच्या भक्तांसाठी आपण अधिकांश लोकांकडे दुर्लक्ष करु शकतो का?

प्रश्न :  देवीदेवतांच्या रूपांवर ध्यान करण्यात काही विशेष लाभ आहे का?

अम्मा :  देवाच्या साकार रूपावर ध्यान करुन मनाची एकाग्रता व मनःशुद्धी प्राप्त करु शकतो. आपण ज्या देवतेवर ध्यान करत आहोत त्या देवतेचे गुण आपल्यात विकसित होतील. मूलभूत गोष्ट अशी आहे की आपण सर्वप्रथम एकाग्रता मिळविण्यासाठी व वासनांचा समूळ नाश करण्यासाठी नेटाने प्रयत्न केला पाहिजे. उघड्या डोळ्यांनी एखाद्या बिंदूकडे पहात राहणे हासुद्धा एकाग्रता मिळविण्याचा एक चांगला अभ्यास आहे.