“अम्मा ” – सद्गुरु श्रीमाता अमृतानंदमयी देवी यांनी अवतार घेतलेली पवित्र भूमी आज अमृतपुरी म्हणून ओळखली जाते. अम्मांच्या आश्रमाच्या जगभर पसरलेल्या सेवाकार्यांचे मुख्यालय इथे असून केरळातील कोल्लम जिल्ह्यात आलप्पाड पंचायत क्षेत्रांतर्गत परयकडव गावातील हा भाग आता जगभर अमृतपुरी म्हणून ओळखला जातो. एका बाजूला अरबी समुद्राचा अथांग विस्तार तर दुस-या बाजूला खाडीसदृश्य जलमार्ग यांच्यामध्ये एका चिंचोळ्या बेटावर आकाशाला गवसणी घालणा-या नारळाच्या झाडांच्या गर्दीत असलेला हा आश्रम जगज्जननी अम्मांच्या अनेक दैवी लीलांना साक्षी आहे. या पावन भूमीत पाय ठेवताच एका अनिवर्चनीय शांतीचा अनुभव येतो.

1978 पासून काही साधक अम्मांच्या सान्निध्यात अम्मांचे शिष्य म्हणून राहू लागले. अम्मांच्या कुटुंबियांच्या मालकीचे छोटेसे देवघर(देऊळ) की ज्याला मल्याळम् मध्ये कलरी म्हणतात, येथेच अम्मांनी भक्तांना कित्येक वर्षे दर्शन दिले. 1981 साली आश्रमाची रीतसर नोंदणी झाली. आत्मसाक्षात्काराची आस बाळगून साधना करणारे, रंजल्या -गांजलेल्यांची सेवा करुन ईश्वर दर्शनाची आस बाळगणारे असे 3000 देशी-विदेशी साधक कायमस्वरूपी येथे वास्तव्य करुन आहेत. यात संन्यासी, वानप्रस्थ, गृहस्थ व ब्रह्मचारी असे सर्व प्रकारचे साधक आहेत. नाना जाती-धर्माचे देशविदेशातील ही साधक मंडळी वेदाध्ययन, शास्त्रश्रवण, स्वाध्याय, आत्मचर्चा, ध्यान, जप, योगाभ्यास, अर्चना, भजन, गुरुसेवा इत्यादी नानाविध साधनेत अहोरात्र व्यस्त असतात. जीवनातील सर्व पैलूंना स्पर्श करणारे सेवा कार्यक्रम इथे अम्मांच्या अध्यक्षतेखाली अखंड चालू आहेत. ज्ञान-भक्ति कर्मयोगाचा सुंदर समन्वय- प्रायोगिक अद्वैत वेदान्त इथे पहायला मिळतो. अम्मांचे दिव्य सान्निध्य हेच अमृतपुरीतील मुख्य वैशिष्ट्य आहे.

अम्मा वर्षभरातील अधिकांश देशविदेशात प्रवास करुन दुःखी जनांचे अश्रू पुशीत असतात. इतर वेळी त्यांचे अमृतपुरीत वास्तव्य असते. ध्यान, भजन, शिष्यांचे संशयनिवारणासाठी प्रश्नोत्तरे हे सर्व अमृतपुरीत अम्मांच्या सान्निध्यातील दिनचर्येचा भाग आहे.

Satsang with Amma

अम्मा अद्वैत वेदान्ताचा उपदेश करीत असल्या तरी इथे सर्व धर्मसंप्रदायांच्या साधकांना आपापल्या धर्मसंप्रदायाचे पालन करण्यास प्रोत्साहन देणा-या अम्मा साधकांना त्यांच्या पूर्वसंस्कारांनुसार मंत्रदीक्षाही देतात.