अम्मांचा नववर्षाचा संदेशातील काही भाग
अम्मांनी नववर्षाच्या संदेशामध्ये एक गोष्ट सांगितली होती.
एकेकाळी एक सत्यनिष्ठ व न्यायी राजा होता. त्याला दोन पुत्र होते. राज्याचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली तेव्हा दोघांपैकी कोण चांगला राजा बनू शकेल यावर तो गंभीरपणे विचार करु लागला. राज्य चालविण्याची पात्रता दोघांपैकी कोणामध्ये चांगली आहे हे पाहण्यासाठी त्याने दोघांची परीक्षा म्हणून एक साधा प्रयोग करण्याचे ठरविले. त्याने दोघांना बोलावून प्रत्येकास काही रक्कम दिली आणि सांगितले, “तुमचे दोघांचे स्वतंत्र महाल आहेत. या दिलेल्या पैशाचा वापर करुन तुम्ही तुमचे महाल कशानेही भरुन टाका. तुमच्यापैकी जो कुणी सूज्ञपणाने हे करुन दाखवील तो माझा उत्तराधिकारी बनेल. ”
मोठ्या मुलाने विचार केला, “ओह! पिताजींनी ही फारच थोडी रक्कम दिली आहे. एवढ्याशा रकमेतून संपूर्ण महाल भरुन टाकावा असे काय बरे विकत घेता येईल? ”
खूप विचार करुनही त्याला काहीच सुचले नाही. शेवटी वैतागून त्याने राज्यभरातील कचरा विकत घेतला आणि महालातील प्रत्येक खोलीत भरुन टाकला.
मोठ्या भावाप्रमाणे, लहान भावालाही याच विचाराने ग्रासून टाकले होते. परंतु तो विचार करत राहिला. आणि ब-याच विचाराअंती त्याला एक कल्पना सुचली. त्याने दिलेल्या पैशातून अत्तराची बाटली, तेल व दिवे विकत घेतले. साऱ्या महालात त्याने दिवे पेटविले व अत्तर शिंपडले. सारा महाल प्रकाश व सुगंधाने भरुन गेला. माझ्या मुलांनो, आपल्यापैकी सर्वांचीच ही कथा आहे. तो महाल म्हणजे आपले हृदय आणि ते पैसे म्हणजे आपले जीवन होय. निवड करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण आपले आयुष्य एकतर अविवेकी मार्गाने जगू शकतो किवा विवेकाने, देवाच्या इच्छेनुसार जगू शकतो. जर आपण विवेकाचा मार्ग निवडला तर आपण आपले व इतरांचेही आयुष्य माधुर्याने भरुन उजळून टाकू शकतो. कोणता मार्ग निवडायचा याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे.