भगवंताला आपल्याकडून काहीही नको आहे. आपण भगवंताला धूपदीप ‘अर्पण करतो. या गोष्टी भगवंताला हव्यात म्हणून आपण त्याला त्या अर्पण करीत नाही. खरंतर आपल्या डोळ्यांची ज्योतीही ईश्वरप्रदत्त आहे. असे असताना दोनचार रुपयांच्या आपल्या दिव्याच्या ज्योतीची त्या भगवंताला काय आवश्यकता? परंतु ईश्वराचा आश्रय घेतला तर त्यात आपलाच लाभ आहे. आपण देवाला जे काही अर्पण करतो, ते आपल्या समर्पणाचे प्रतीक असते. अशा रीतीने आपल्यात समर्पणभाव विकसित होतो. एवढेच नाही तर तेलातुपाच्या दिव्यातून निघणारा धूर वातावरणाचीही शुद्धी करतो. याचप्रमाणे मी आणि माझ्या इच्छांची पूर्ती हा मनोभाव सोडून देऊन सारंकाही भगवंताचेच आहे. त्याच्या इच्छेनुसार सारंकाही होवो, या मनोभावाचा विकास झाला पाहिजे. अशा समर्पणभावानेच भक्ती परिपूर्ण होईल.
अहंकार! केवळ हीच एक आपली सृष्टी आहे. त्याचाच परिपूर्ण त्याग करायचा आहे. त्याचेच भगवंताला समर्पण करायचे आहे. त्याचे समर्पण केल्यानंतर जे काही शेष राहील ती ईश्वरसृष्टीच असेल. त्यानंतर आपण भगवंताच्या ओठांवरील मुरली बनून जाऊ. नाद उद्घोष करणारा शख बनून जाऊ. त्यासाठी आपल्या पृथक व्यक्तित्वाचा त्याग करणे पर्याप्त आहे. ‘मी’ आणि ‘माझे’पणाचा त्याग केल्यावर व्यक्तित्व उरत नाही, फक्त सर्वव्यापी चैतन्यच उरते. ज्याप्रमाणे बीज हातात ठेवल्याने ते अंकुरित होत नाही, खडकावर टाकल्यावरही ते अंकुरित होत नाही. ते मातीतच पेरले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही कर्माचे उचित फळ मिळण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. समर्पणभावाचे जागरण झाले की भगवंताच्या कृपेने सारकाही स्वयमेव सिद्ध होते. भगवदचरणी आपण आपल्या मनाचे समर्पण केले पाहिजे.
आपण मंदिरात जाऊन पुष्पांजली अर्पण करतो. वस्तुतः ईश्वरचरणी आपले हृदयपुष्प अर्पण केले पाहिजे. जेव्हा आपण आपले मन ईश्वरचरणी ।अर्पण करतो तेव्हा तीच भक्ती होते व तेच वास्तविक समर्पण होते. परंतु त्या मनाचे प्रतीक म्हणून आपण पुष्प अर्पण करतो. जर मन दुःखभाराने पीडित असेल तर आपल्या दुःखांचे भगवंतासमोर निवेदन करण्यात काही चूक नाही. आपण आपल्या अंतरीचे दःख भगवंताला सांगून त्याला आपल्या दुःखात वाटेकरी करुन आपले दुःख त्याच्यासमोर हलके करु शकतो. परंतु आपली प्रार्थना भक्तीसाठी असली पाहिजे. केवळ त्यातूनच पूर्ण फलप्राप्ती होईल. तथापि आपण असे समजू नये की देवाला सारंकाही तपशीलवार सांगितले तरच त्याला समजेल.