जन्मदिन प्रसंगीच्या प्रवचनाचा सारांश (27 सप्टेंबर 2016)

परमात्मा त्या अखंड सत्तेचे नाव आहे, ज्यात कसले विभाजन नाही, कोणतीही सीमा नाही. निसर्गमाता(प्रकृती), वातावरण, पशु-पक्षी, वृक्ष-वनस्पती यांचा कण् अन् कण् त्या ईश्वरीय ऊर्जेने ओतप्रोत आहे. जड-चेतन, सर्वांमध्ये परमात्मा व्याप्त आहे. जर आपण या सत्याची अनुभूती घेतली तर आपण स्वतःवर आणि दुसर्‍यांवर केवळ प्रेमच करु.

प्रेेमाचा प्रथम तरंग तर आपल्या आतूनच उठतो. जर आपण एखाद्या शांत जलाशयात खडा फेकला तर पहिला तरंग त्या खड्याच्या आसपासच उठत असल्याचे आपल्याला दिसून येईल. मग हळूहळू त्या तरंगाचा विस्तार होत तो किनार्‍यापर्यंत पोहोचतो. याचप्रमाणे प्रेमाचा आरंभही आपल्या आतच करु शकलो तर तो हळुहळू विस्तारत या संपूर्ण विश्‍वाला आपल्या कवेत घेईल.

जर आपण कबुतराच्या गळ्यात दगड बांधला तर तो बिचारा उडू शकणार नाही. आज आपणही आपल्या प्रेमरूपी पक्ष्याच्या गळ्यात आसक्तीरुपी दगड बांधून बसलो आहोत आणि म्हणूनच आपण मुक्तीच्या आकाशात झेप घेऊ शकत नाही. मी आणि माझेपणाच्या शृंखलांनी बद्ध होऊन आपण आपल्या प्रेमाला बंदिस्त करून टाकले आहे. प्रेमशून्य जीवन हे जीवनच नाही. प्रेम नसेल तर सेवाही केली जाऊ शकत नाही.

आज, मनुष्याचे जीवन अंतर्बाह्य, दुःखाच्या आक्रोशाने भरुन गेले आहे. त्याच्यावर ज्या दोन गोष्टी राज्य करतात, त्या आहेत- वासना आणि क्रोध. पहिली गोष्ट पूर्ण झाली नाही की क्रोध उफाळून येतो. आज मानवाची मनःस्थिति अशी झाली आहे.

 

नुकतेच, भारतीय वृत्तमाध्यमांमध्ये वादविवादाचा गरमागरम मुद्दा होता- लोकांवर हल्ला करणार्‍या भटक्या कुत्र्यांची समस्या. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य लोक कुणालाच या समस्येचे उत्तर सापडत नव्हते. कुत्र्यांमध्ये विवेकबुद्धी नसते, म्हणून ते लोकांना चावतात. परंतु आपण मानव तर विवेकबुद्धीने संपन्न आहोत आणि तरीही एक-दुसर्‍यांना फाडण्यासाठी एवढे तत्पर? त्याचे काय समाधान देऊ शकतो?

जगामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत फार काही बदलले नाही. उलट सुधारण्याऐवजी परिस्थिती जास्त बिघडली आहे. दहशतवाद मानवजातीसाठी सर्वात मोठी समस्या बनला आहे. त्याने समाजाची शांती हिरावली आहे. आकडेवारी पाहिली तर या चालू वर्षातच जगभरात विविध ठिकाणी 1200 दहशतवादी हल्ले झाले आहेत.

आज आपली जागृत-अवस्थेची वास्तविकता, कोणत्याही भयानक दुःस्वप्नापेक्षाही वाईट आहे. आपण म्हणतो की शिक्षण क्षेत्रात केरळ राज्य इतर राज्यांपेक्षा खूप पुढारलेले आहे. परंतु त्याबरोबरच आपल्या या लहानशा केरळ राज्याने धार्मिक पृथ्थकरण, राजकीय मतभेदांच्या नावावर होणारे शत्रूत्व, गुन्हेगारी, बलात्कार व महिलांवरील अत्याचार इत्यादी क्षेत्रांत अनेक मोठ्या राज्यांनाही मागे टाकले आहे. चांगल्या परिवारातील सुशिक्षित लोकही गुंडगिरीमध्ये दिसत आहेत. अंमली पदार्थ व दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यांच्या या वाईट सवयींमुळे त्यांचे स्वतःचेच नाही तर दुसर्‍यांचेही जीवन नष्ट होत आहे. जीवन नरकप्राय बनत चालले आहे. वाहन अपघात, कौटुंबिक हिंसाचार, गल्लीतील भांडणे, महिला व मुलांचे लैंगिक शोषण इत्यादी समस्या विक्राळ बनत आहेत.

आज मानवजात एक चालती-फिरती समस्या बनली आहे! नैसर्गिक समस्यांचे नियंत्रण आपल्या हातात नसले तरी येणार्‍या समस्यांची चाहूल समजण्याचे तंत्रज्ञान तर आपल्या जवळ आहे ना?  परंतु, विज्ञान अजूनपर्यंत असे एखादे यंत्र बनवू शकले नाही, जे मनुष्याच्या मनात राहणार्‍या समस्यांचा शोध घेऊ शकेल. आज आपल्या जवळ ज्ञान तर खूप आहे परंतु विवेक फारच कमी आहे. ज्याप्रमाणे आपले डोके दुखत असेल तेव्हाच आपल्याला डोके असल्याची जाणीव होते, त्याचप्रमाणे आपल्या जीवनात दुःख, समस्या आल्यावरच आपण एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो.

ग्लोबल वार्मिंग (जागतिक तापमान वाढ), वातावरणातील बदल, मानव, निसर्ग व पृथ्वी इत्यादींच्या भवितव्यासंबंधी, त्यांचे विश्लेषण करण्यासाठी व त्यावरील समाधान शोधण्यासाठी जगभरात उच्चस्तरीय संमेलने, परिसंवाद व वादविवाद होत असतात.  दुसरीकडे मनुष्याच्या मनाच्या तापमानातही भयंकर वृद्धी होत आहे. त्याचे आंतरिक वातावऱण खूप खराब झाले आहे, परंतु दुर्दैवाने त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. उच्च स्तरीय वाद-विवाद व विचारमंचाच्या परिसंवादाचा केंद्रबिंदू भावी समस्यांचे समाधान शोधणे हे आहे. परंतु आज जग ज्या समस्यांना तोंड देत आहे, त्यांच्या समाधानाच्या दिशेने क्वचितच पावले पडत आहेत.

परिस्थिती एवढी बिघडली आहे की भय आणि विरोध, जीवनाचे मूलबिंदू बनले आहेत. प्रत्येकजण तणावमुक्त राहू इच्छितो. परंतु अधिकांश लोक फुकटचा तणाव ओढवून घेत आहेत.

जीवनातील परिस्थिती सतत बदलत राहतील. परिवर्तन निसर्गाचा स्थिर नियम आहे. परंतु आपले अनुभव गोड वा कडू बनविणारे तर आपण स्वतःच असतो- आपले मन आणि मनोभाव. जोपर्यंत आपण आपल्या मनावर संयम बाळगण्याचे शिकत नाही, दुःख आपला पिच्छा सोडणार नाही.

एकदा मन नियंत्रणात आले की मग कोणतीही समस्या, कोणताही दुखद प्रसंग आपल्याला विचलीत करु शकणार नाही, दुबळे बनवू शकणार नाही. खरेतर सुखाचा पायाच मुळात कृतज्ञताभाव आहे.

जर मन कृतज्ञतेने भरुन गेले तर आपण सहजतेने सुखी होऊ. अनेकदा आपण नकारात्मक व निंदात्मक तेव्हा होतो, जेव्हा आपले मन, आपले विचार एखाद्या अतिकडे झुकते आणि आपण वर्तमान क्षणाच्या सुखापासून वंचित राहतो.

आज भारत ज्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे, ते फार उत्साहवर्धक आहे. आपण आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये वेगाने पुढे चाललो आहोत. अंतरिक्षात आपल्या मंगळयानाच्या यशाने आपल्याला जगभर मान-सन्मान मिळाला आहे. परंतु आपल्या देशातील समस्त गरिबांचे जीवन मंगलमय होईल तेव्हाच देशाची प्रगती पूर्णत्वास पोहोचली आहे असे समजले जाईल. गेल्या दोन वर्षात मठाने भारतभरात 101 गावे दत्तक घेऊन तेथे कार्य सुरु केले आहे. काही गावांची परिस्थिती तर फारच निराशाजनक आहे. गेल्या शंभर वर्षात तेथे काहीच बदल झालेला नाही. आपण प्रगती करावी आणि आपल्या ग्रामीण क्षेत्राकडे दुर्लक्ष करावे हे योग्य नाही. हे  तर आपल्या हातापायांचा विकास व्हावा परंतु बाकी शरीर अविकसित राहावे असे आहे. आपल्याला याचा कधी विसर पडू नये की भारताचा आत्मा त्याच्या गावात वसलेला आहे. गावांमध्ये काळानुरुप भौतिक समृद्धीत विकास झाला पाहिजे, परंतु आपली मूळ संस्कृती व संस्कार कायम ठेवून. हृदयात कारुण्याचा उदय झाल्यावरच आपण मनुष्य बनतो, अन्यथा आपण पशूवतच असतो.

शिक्षण असे असले पाहिजे जे वचन, विचार व दृष्टिकोनाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रकाश प्रदान करू शकेल. हल्ली लोक एवढाच विचार करतात, मी यशस्वी होऊ इच्छितो! अधिकांश लोकांचा एकच मंत्र असतो- मी, मी, मी. जर लोकांनी मनात एकाच फळप्राप्तीच्या दिशेने कार्य केले तर ते त्यासाठी काहीही करण्यास संकोच करत नाही. अपराधही करतील. असा स्वार्थी दृष्टिकोन असेल तर व्यक्ती इतर सर्वांना आपला शत्रू समजू लागते. प्रत्येक गोष्टीवर आपले प्रभुत्व मिळविण्याच्या फंदात, व्यक्तीचे कर्म कुटिल व अपूर्ण होतात. कर्मांमध्ये आनंद व सहभाग असेल तरच त्यात पूर्णत्व येते.

पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा, आज मानवापुढील एक फार मोठी समस्या बनून उभा आहे . आपण आपल्या पूर्वजांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहिलो तर आपण या समस्येचे समाधानही सहजतेने शोधून काढू. जुन्या काळी आपल्या पूर्वजांना निसर्गाच्या संरक्षणासाठी अलग प्रयत्न करावे लागत नव्हते. कारण त्यांची जीवनशैलीच अशा प्रकारची होती की निसर्गाचे संरक्षण आपोआप होत होते. त्यांची जीवन-शैली, उपासना आणि सांस्कृतिक रुढी-प्रथा…सर्वांमध्ये पर्यावरण-संरक्षण समाविष्ट होते. समस्त भूतमात्र व सृष्टीप्रति श्रद्धा व आदर, त्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग होते. निसर्गाकडून जेवढे जरुरी आहे तेवढेच घ्यावे आणि तेदेखील त्याचे शोषण वा नाश न करता ही गोष्ट त्यांच्या आतमध्ये खूप खोलवर रुजलेली होती. जुन्या काळी मध काढण्यासाठी मधमाशांच्या पोळ्यामध्ये बाण मारत असत आणि जेवढा मध खाली पडत असे, तो एका भांड्यात जमा करत.

आजच्या प्रमाणे पूर्ण पोळ्याची नासधूस केली जात नसे. आपले पूर्वजही भूक शमविण्यासाठी निसर्गावरच अवलंबून होते परंतु असे असूनही त्यांच्या मनातील निसर्गाप्रतिचा करुणाभाव कधी लोपला नव्हता.

त्यांच्या मनात मधमाशांच्या परिश्रमाबद्दल आदरभाव होता. परंतु आजच्या जगात आपण काय पाहत आहोत ? मनुष्य मनुष्याकडून व निसर्गाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त ओरबडून घेत आहे. आणि त्यांचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझी लेकरे जी फळे व भाजीपाला पिकवून मला देतात ते मला मौल्यवान हिर्‍यांपेक्षाही जास्त मौल्यवान आहे. जेव्हा आपण एखादे बीज लावून त्याची देखभाल करतो तेव्हा त्याचा तो विकास पाहण्याचा आनंद अपूर्व असतो. त्यातून आपण समस्त निसर्गाप्रति आपले आंतरिक संबंध स्थापित करण्याविषयी जागृत होतो. या आनंदाचा ज्यांनी एकदा जरी  अनुभव घेतला असेल ते मग कधीही बागकाम सोडू शकत नाहीत.

आत्मविश्वास  मनाची अशुद्धी व बंधनांपासून मुक्त होण्यासाठी मदत करणार्‍या बूस्टर-रॉकेटसमान आहे जेणेकरुन आपण अध्यात्माच्या आकाशात उंच भरारी घेऊ शकू. तो आपल्याला अध्यात्ममार्गावर वेगाने पुढे जाण्याची शक्ती देतो.

कॉम्प्युटरचे हार्डवेयर व सॉफ्टवेयर असे दोन भाग असतात. सर्वसामान्य भाषेत बाहेरचा दिसणारा भाग म्हणजे हार्डवेयर आणि आतील न दिसणारा भाग म्हणजे सॉफ्टवेयर. परंतु तसे पाहिले तर हे दोन्ही वेगवेगळे नाहीत. कारण हार्डवेयर सॉफ्टवेयरविना काम करु शकत नाही आणि सॉफ्टवेयरपण, हार्डवेयरविना काम करु शकत नाही. हीच गोष्ट नामरूपात्मक दृश्य जगत व त्याच्या आतील अदृश्य शक्तीला लागू पडते. आपल्याला दिसणारे हे दृश्य जगत (नाम-रूप) हार्डवेयर आहे. या दृश्य जगतातील प्रत्येक गोष्ट परस्पर जोडणारी व सुव्यस्थित चालवणारी, एकमेव अखंड चेतन सत्ता कॉम्प्यूटरच्या सॉफ्टवेयरसमान आहे. तिलाच परमात्मा वा परब्रह्म म्हटले आहे. प्रत्येक कर्म करतेवेळी, आपण या सत्तेप्रति जागरूकता टिकवून ठेवली पाहिजे.

आपल्यात धैर्य व सहनशीलता यासारखे गुण असतील तर जीवनात वसंताचे आगमन होईल. या गुणाविना, जीवन नेहमीच तप्त वाळवंटासारखे असेल. अशा जागी फुले, नद्या व किलबिलणारे पक्षी कसे असतील? प्रेम हे एक असे धन आहे, जे घेणार्‍यापेक्षा देणार्‍याला जास्त सुख देते. हे एक असे धन आहे जे आपल्याजवळ आहे परंतु आपल्याला अजून त्याचा पत्ताच नाही. हे एक असे शस्त्र आहे जे मोठ्या शक्तिशाली शत्रूलाही जिंकू शकते. हा एक असा पाश आहे ज्याने नित्यमुक्त भगवंतालाही बांधू शकतो. हा एक असा मंत्र आहे जो आपल्याला मायापाशातून मुक्त करु शकतो. हे एक असे चलन आहे जे सर्व देशांत, सर्व काळी चालू शकते. प्रेम ही काही खिशात लपवून ठेवण्याची वस्तू नाही तर कर्मांमध्ये अभिव्यक्त करण्याची वस्तू आहे. आपण जेव्हा प्रेमस्वरूप बनतो तेव्हा आपली इंद्रिये त्याचा सेतू बनतात. त्याला कुणाचा अहंकार पराजित करु शकत नाही. हे दुःखावरचे रामबाण औषध आहे, मौनाचा आधार आहे. हे जीवनातील आपली संपूर्ण विजयराशी आहे. माझ्या सार्‍या लेकरांची हृदये या निःस्वार्थ दिव्य प्रेमाने काठोकाठ भरलेली राहो. ईश्‍वरकृपा तुमच्या सर्वांवर सदैव टिकून राहो.

-श्रीमाता अमृतानंदमयी देवी