कर्मापासून पलायन करु नका-
प्रश्न : गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, काहीही झाले तरी आपण आपल्या स्वधर्माचा त्याग करता कामा नये. जर असे असेल तर अधिक लाभ मिळणारा दुसरा व्यवसाय करण्यासाठी आपण आपला वर्तमान व्यवसाय कसा काय सोडू शकतो?
अम्मा : त्या काळी अनेक लोकांचा असा समज होता की सार्या कर्मांचा त्याग करुन, अरण्यात जाऊन संन्यासी बनून राहिल्यानेच मोक्ष मिळू शकतो. या धारणेविरुद्ध भगवंताने घोषणा केली की सर्वस्वाचा त्याग करण्याची जरुरी नसून लोकांनी आपले या जगातील नियत कर्म आपल्या स्वधर्मात दृढपणे स्थित होऊन निष्ठापूर्वक पार पाडले पाहिजे. भगवंताने पुढे आणखी स्पष्ट केले की आपण आपल्या कर्मांचा त्याग न करता ती कर्मे उचित मनोभावाने पार पाडली तर तीच कर्मे आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातात.
धर्मपालनाच्या या संकल्पनेत आणखी एक महत्वपूर्ण तथ्य दडलेले आहे. शिल्पकाराच्या कुटुंबात जन्मलेले मूल सहजतेने चांगला शिल्पकार बनू शकते, कारण त्याच्यातील सूप्त गुण विकसित होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असते. अधिकांश वेळा मूल जन्मत:च ती देणगी घेऊन आलेले असते. पिता किंवा मातेचे कौशल्य मुलाला वारसा म्हणून मिळालेले असते. असे मूल जी गोष्ट दहा दिवसांत शिकू शकते, तेच शिकण्यासाठी इतर मुलांना कदाचित वर्षे लागतील. अशाप्रकारे वंशपरंपरेने प्राप्त झालेल्या कारागिरीत उन्नती करण्याची पुष्कळ संभावना दडलेली असते. परंतु बाहेरच्या व्यक्तीला ते कौशल्य हस्तगत करण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागते.
जुन्या काळी लोक त्यांचे पारंपारिक व्यवसाय स्वत:च्या घरीच करीत असत. ते कार्यालयात वा कारखान्यात जाऊन काम करीत नसत. घरातील सर्वचजण त्यांच्या पारंपारिक व्यवसायात सहभागी असत. गुरुकुलात विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर मुले त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात प्रवेश करीत. व्यक्ती कोणता व्यवसाय निवडते त्यावर तो चारपैकी कोणत्या वर्णाश्रमाचा आहे हे ठरत असे, केवळ त्याच्या जन्मानुसार नव्हे. कोणतेही मूल एका विशिष्ट जातीत वा धर्मात जन्मत नाही, सारी देवाचीच लेकरे आहेत. मोठी झाल्यावरच त्यांच्या गुणकर्मानुसार ती वेगवेगळ्या जातीत विभागली जात. त्या काळी क्षत्रिय जातीत जन्मलेल्या मुलाला ब्राह्मण बनण्याचा अधिकार होता, आणि ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले मूल क्षत्रिय बनू शकत असे. लाकुडकाम करणार्या व्यक्तीला सुतार म्हटले जाई. जरी तो सुतार ब्राह्मण कुटुंबात जन्मला असला तरी त्याला सुतार म्हटले जाई. तथापि नंतरच्या कालखंडात सनातन धर्माच्या नियमांत शिथिलता आल्यामुळे जन्मानुसार जाती ठरु लागल्या.
जुन्या काळी, लोक नुसतेच पैसा कमविण्यासाठी काम करीत नसत. सर्वांचे या जीवनातील लक्ष्य आत्मज्ञान प्राप्त करणे हे होते, आणि आपल्या वाट्याला आलेले नियत कर्म हे ती अवस्था प्राप्त करण्यासाठी एक साधन होते. आपल्या कर्मात सर्वोत्तम निपुणता प्राप्त करण्यात लोक ईश्वरानुभूतीचा आनंद प्राप्त करीत.
जेव्हा प्रत्येकजण आर्थिक लाभासाठी काम करतो तेव्हा सामाजिक सद्भाव नष्ट होतो, स्वार्थीपणा व लोभ यांचे प्राबल्य वाढते.
त्याकाळी कामगाराला पूर्वनिर्धारित वेतन देण्याची प्रथाही अस्तित्वात नव्हती. कामगारांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वेतन दिले जाई आणि त्यांना जे काही मिळे त्यात ते संतुष्ट असत. ते परस्परांचा आदर राखीत. वेतन देणारा व वेतन घेणारा असे दोघेही पूर्णपणे संतुष्ट असत. लोक अधिक स्वार्थी झाल्यावर ती प्रथा लोप पावली. मालकाचा मनोभाव, ‘कमी दाम, जास्त काम’ असा बनला आणि कामगारांनीही ‘कमी काम, अधिक दाम’ असा विचार करायला सुरुवात केली.
असे म्हटले जाते की, तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तेव्हा तुम्ही देवतेला जे पैसे अर्पण करता ते मोजून टाकू नये, तर तुम्ही ओंजळभर पैसे अर्पण करावे. हल्ली लोक पाचदहा पैशांची नाणी बाजूला काढून ठेवतात, म्हणजे, ओंजळभरुन पैसे जरी दिले तरी थोड्याशा रुपयांपेक्षा अधिक पैेसे जाणार नाहीत!
आज अधिकांश लोकांना त्यांची मुले इंजिनीयर व डॉक्टर व्हावीत असे वाटते की जेणेकरुन ते पुष्कळ पैसा कमावून समाजात प्रतिष्ठा मिळवतील. फार कमी पालक त्यांच्या मुलांचा कल व आवडीवर लक्ष देतात. जर शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा निरोगी असेल तर मुलांची प्रतिभा आपोआपच समोर येईल. परंतु याउलट आजची स्पर्धा मुलांमध्ये तणाव निर्माण करीत आहे. आपले ध्येय प्राप्त करण्यात ते असफल झाले तर ते त्यांचे मनोबळ गमावून बसतात आणि आपले उर्वरीत आयुष्य निराशेत घालवितात. अनेकांना त्यांची निराशा आत्महत्येस प्रवृत्त करते. हे कदापि घडू देता कामा नये. आपली आध्यात्मिक उन्नती व जगाची सेवा हाच आपल्या शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. हे ध्येय आपल्याला कोणत्याही कार्यक्षेत्रात प्रगती करण्यास प्रेरणा प्रदान करील. समजा, आपण अयशस्वी झालो तरी निराश होऊन आपले जीवन वाया घालविण्याऐवजी आपल्याला पुन्हा प्रयत्न करण्यास प्रेरित करील.
आपण जेव्हा जीवनात एखादे कार्यक्षेत्र निवडतो, तेव्हा त्या क्षेत्रात शक्य होईल तेवढे अधिकाधिक प्राविण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्या क्षेत्रात चिकटून राहून जीवनात यशस्वी झाले पाहिजे. कोट्याधीश बनणे हे जीवनाचे ध्येय नसून, शाश्वत आनंदाची अनुभूती घेणे हेच जीवनाचे लक्ष्य आहे. असे असले तरी कुटुंबाचे भरणपोषण करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे. आपल्या कामाचा मोबदला स्वीकारताना आपल्याला जरुरी तेवढेच घेणे हेच आपले एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे.
जुन्याकाळी, लोक कठोर परिश्रम करीत असत, परंतु आपले उत्पन्न स्वत:ला व कुटुंबाला आवश्यक तेवढेच ठेवीत, व उरलेले गरीबांना वाटून टाकीत. आज समाजात व्यापार प्रबंधन(बिझीनेस मॅनेजमेंट) अत्यंत आकर्षक व्यवसाय बनला आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी व्यापार आवश्यक आहे, परंतु व्यापाराचे ध्येय केवळ वैयक्तिक लाभ एवढेच असू नये, तर देशाची प्रगतीही विचारात घेतली पाहिजे. आज आपल्याला असे अनेक व्यापारी व उद्योगपती आढळून येतील की त्यांनी केवळ स्वत:पुरतीच नव्हे तर आगामी हजार पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती गोळा करुन ठेवली आहे! त्याचवेळी, त्यांच्या सभोवती असंख्य गरीब लोक आहेत, जे रात्रंदिवस काबाडकष्ट करुनही एकवेळच्या जेवणासाठीही पुरेसा पैसा जमा करण्यास असमर्थ आहेत. याविषयावर क्वचितच कोणी विचार करतो. आजच्या अधिकांश लोकांचे लक्ष्य आहे, ‘दुसर्यांच्या जीवावर स्वत:साठी अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेणे!फ
जर तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र सोडून दुसरे निवडले, तर त्याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कामावर संतुष्ट नाही. पण हे जरुरी नाही की तुम्हाला नवीन कामात समाधान मिळेल. कारण समाधान मनावर अवलंबून असते, बाह्य कर्म वा परिस्थितींवर नव्हे. जर लोकांनी अधिक पैसा मिळविण्यासाठी आपले कार्यक्षेत्र बदलले तर त्यातून त्यांची लोभीवृत्तीच दिसून येते. त्यांचा दृष्टिकोन बदलल्याखेरीज अशा लोकांना जीवनात कधीच समाधान गवसणार नाही. परंतु ज्यांनी आपल्या मनावर प्रभुत्व मिळविले आहे, त्यांच्यासाठी कोणतीही परिस्थिती अनुकूल सिद्ध होईल. त्यांना कोणत्याही कार्यक्षेत्रात आनंदच मिळेल. काहीही, कोणीही त्यांना असमाधानी बनवू शकणार नाही. आपण जे काही काम करीत असू, त्यात अशाप्रकारची मनोदशा आपण विकसित केली पाहिजे.
जर आपण एक प्रकारचा व्यवसाय सोडून दुसरा सुरु केला, तर कदाचित आपल्याला तात्पुरते समाधान मिळेल, पण हे जरुरी नाही की ते टिकून राहील. बर्फात पडलेला साप निरुपद्रवी वाटेल. पण त्याला थोडीशी ऊब दिली तर लवकरच फुत्कारुन व दंश करुन तो आपला खरा स्वभाव दाखविल. त्याचप्रमाणे, परिस्थिती उद्भवताच मन त्याचा सत्य स्वभाव प्रगट करील आणि तुम्ही तुमची मन:शांती गमावून बसाल. मनाचे फाजील लाड पुरविणे व ते मागेल, ते सर्व त्याला देत राहणे हा काही मनाला नियंत्रित करण्याचा मार्ग नाही. आपण मनाला नियंत्रित करुन त्याला यथार्थ लक्ष्याकडे वळविले पाहिजे. त्याचप्रमाणे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या कर्तव्याप्रती दृढ, निष्ठापूर्वक राहण्याचा उपदेश केला आणि अशाप्रकारे तो जीवनात यशस्वी झाला. तुम्ही तुमच्या पसंतीचे कोणतेही काम करा, पण तुमचा मनोभाव बदलला पाहिजे. त्यानंतर मग य्ाुद्धही यज्ञकर्म बनते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हाच उपदेश केला. काही स्वार्थी कारणांसाठी आपल्या नियत कर्मांपासून पलायन करण्यास त्यांनी कदापि उत्तेजन दिले नाही. तसेच दोन डोळे बंद करुन तिसरा डोळा उघडण्याचा उपदेशही त्यांनी केला नाही. त्यांचे उदाहरण आपल्याला, दोन्ही डोळे उघडे ठेवून तिसर्या डोळ्याने पाहण्याचे शिकविते. दुसर्या शब्दात, भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सर्व गोष्टींतील अंतर्निहित एकत्व ध्यानी ठेवून जीवनाला तोंड देण्यास शिकविले आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचे अध्ययन करुन श्रीकृष्ण बनले पाहिजे.
श्रीमद्भगवद्गीतेचे अध्ययन करुन श्रीकृष्णासारखे कर्मनिष्ठ बनले पाहिजे.