अनेकांना ह्या गोष्टीचे विलक्षण आश्चर्य वाटते. दक्षिण भारतातील लहानशा खेडेगावात वाढलेली ही एक लहानशी मुलगी आणि तिला सर्व विश्व “अम्मा, जगन्माता” ह्या नावाने कसे बरे ओळखू लागले? मातृत्वाचा मूलभूत अर्थ केवळ बाळाला जन्म देण्याचा नसून, त्या जीवाचे निस्वार्थी प्रेमाने, अपरंपार करुणेने परिपालन करणे हाच आहे. कशाचाही लोभ न धरता दुसऱ्यासाठी झिजणे ह्यातच त्याचे सार आहे.
आपण जर अम्मांच्या जीवनाकडे पाहिले तर कोणते रूप जाणवते? हे एक असे भारलेले व्यक्तीमत्व आहे, जिने आपले तन मन धन सर्वस्व समाजाच्या उद्धारासाठीच समर्पित केले आहे. दानशीलता आणि त्यागी स्वभावधर्म हा तर त्याचा पायाच आहे. एखाद्या बेघर माणसाने अम्मांकडे रडत येऊन आसरा मागितला तर त्या त्याला घर देऊ करतील. तेव्हा आपण त्यांना विशेषण लावतो, “जनकल्याणकरी व्यक्ती”. जेव्हा कुणी दीनदुखी केविलवाणा होऊन येतो आणि अम्मा त्याला प्रेमाने जवळ घेतात, तेव्हा आपल्याला त्यांच्यात “माता” दिसते. कुणी आत्मोन्नतीच्या आशेने अम्मांकडे येतो आणि अम्मा त्याला ज्ञानाचा साक्षात्कार देऊ करतात, तेव्हा आपण त्यांना “गुरु” मानतो. निस्वार्थीपणे सर्वांची काळजी घेताना त्या ‘सर्वांमध्ये मी माझेच आत्मस्वरूप पाहते’ असे सांगतात. हेच ते जगन्मातेचे रूप! ह्या मानवी रूपाचा कळस गाठण्याच्या हेतूने, प्रवचनांच्या आणि दर्शनांच्या माध्यमातून अम्मा जगाला जागवण्यात सतत प्रयत्नशील असतात.
सर्वांच्या समस्या गुंतलेल्या असतात ह्याच गोष्टींभोवती – आपल्या आत्म्याचे स्वरूप कसे ओळखायचे? विश्व आणि देव; धर्म, प्रेम आणि कौटुंबिक आयुष्य; ध्यानधारणा व आध्यात्मिक नियमांचे परिपालन ह्या सगळ्यांचा संबध कसा जोडायचा? अम्मांनी त्यांच्या तरुण वयापासून गंभीर साधकांच्या अशा शंका दूर करण्याचे कार्य हाती घेतले आहे. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आणि शास्र ग्रंथांचा अभ्यास-अध्ययन न करताही त्यांच्या बोलण्यातून शास्रग्रंथातील गहन तत्वज्ञान व्यक्त होते. हे ज्ञान शाळा-कॉलेज मध्ये जावून मिळत नाही. ते तर मूर्तिमंत सत्यस्वरूपाचे आकलन झाल्यावरच मिळते. त्यामुळेच अम्मांचे लहानपण ज्या घरात गेले, ते आज हजारो लोकांसाठी एक श्रद्धा स्थान झाले आहे. त्याचे रुपांतर आज एका आश्रमात झाले असून तेथे जगातील कानाकोपऱ्यातून मोठ्या आशेने लोकं वसतीसाठी येतात – कशासाठी? केवळ अम्मांना गवसलेले सत्य स्वरूप आणि त्यांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठीच! साधकाच्या विचारशक्तीप्रमाणे मग त्याला अम्मांकडून मार्गदर्शन दिले जाते.
अम्मा म्हणतात- ” माझे स्वप्न, माझी आदर्श विश्वाची कल्पना अशी आहे – जेथे पुरुष आणि स्त्रिया एकमेकांच्या बरोबरीने प्रगतीक्षेत्रात पुढाकार घेतील आणि पक्ष्याच्या दोन पंखाप्रमाणे दोघे समानतेने एकमेकांचा आदर ठेवतील व सुखाने वावरतील.”
अम्मा या संपूर्ण विश्वाकडे आपलेच आत्मस्वरूप म्हणून पाहतात . त्यामुळे त्या स्वतःच्या शरीराच्या गरजा-मर्यादांची पर्वा न करता सातत्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी व दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी तत्पर असतात. ज्या आपुलकीने आणि जिव्हाळ्याने अम्मा सगळ्यांची थट्टा-मस्करी करतात, त्यांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी ऐकतात, त्यामुळे आज जगातील हजारो लोकांचे त्यांच्याशी जवळचे नाते जुळले आहे. अनेकांना त्यांच्या रुपात जिवश्च-कंठश्च मैत्रीचाच अवतार दिसतो. दिवसामागून दिवस गेले, आठवड्यामागून आठवडे उलटले, आणि वर्षामागून वर्षे सरली तरी सातत्याने दर्शन देणे हा अम्मांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी वयाच्या सतरा वर्षांपासून अम्मा लोकांना प्रेमाने आलिंगन देत आल्या आहेत. कधी-कधी तर खंड न पडू देता त्या बावीस ताससुद्धा दर्शन देत बसलेल्याचे सर्वश्रुत आहे. अम्मांच्या जवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम तर मिळतेच, शिवाय कुणी आपल्याला पूर्णपणे जाणून घेतेय ह्या भावनेने ते सुरक्षित आणि समाधानी होतात. त्या विश्वासावर त्यांना आयुष्याची मार्गक्रमणा करण्याचे सामर्थ्य मिळते. आणि अम्मा म्हणतात – हीच गोष्ट त्यांना स्वतःच्या शरीराच्या गरजा-मर्यादा ह्यापेक्षा महत्वाची वाटते. तरुण किंवा वृद्ध असो, सशक्त किंवा रोगिष्ट असो, गरीब किंवा श्रीमंत असो; प्रत्येकाला अम्मांकडून भेदभाव न करता तेव्हढेच निर्भेळ प्रेम मिळते. अम्मा कुणालाही दूर लोटत नाहीत. भक्ताला जवळ घेतील तितक्याच प्रेमाने त्या नास्तिकालाही जवळ घेतात.
अम्मा म्हणतात- “ह्या जगातील प्रत्येक माणसाला निदान एका रात्री पुरती निद्रा कोणत्याही भयाची छाया न पडता मिळालीच पाहिजे. प्रत्येकाला निदान एक दिवस पोटभर खाणे मिळालेच पाहिजे. आणि असा एक दिवस तरी असा उजाडला पाहिजे जेव्हा कुणालाही हिंसक वृत्तीची शिकार होऊन हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ येणार नाही.”
अम्मांच्या मते अद्वैत म्हणजे निव्वळ तत्वज्ञान नसून ही एक प्रत्यक्ष आचरणात आणण्याची महत्वाची बाब आहे. तसे पहिले तर, अम्मांचा प्रत्येक विचार, त्यांच्या वाणीतून प्रगटलेला कोणताही शब्द आणि त्यांची प्रत्येक कृती ह्या सगळ्यात एक महत्वाचे सत्यच प्रतिबिंबित होते. अंतर्यामी असो किंवा प्रकटलेले असो, त्याची दिव्यता मोठीच! त्यामुळे हिरीरीने अनेकविध जनकल्याणकारी कार्ये पार पाडण्यासाठी अम्मांचा सतत पुढाकार असतो. गोरगरीबांसाठी हॉस्पिटले उभारणे, बेघर लोकासाठी घरे बांधणे, त्यांना शुश्रूषा व्यवस्था सहज उपलब्ध करून देणे, अनाथाश्रमाची सोय करणे, निसर्ग-आपत्तीने ग्रस्त झालेल्यांना दिलासा देणे ह्या सर्व गोष्टींचे आयोजन करण्यात त्यांचे मार्गदर्शन असतेच. त्याबरोबरच गरीब निराधारांसाठी निवृत्तीवेतन, रोजच्या उपजीविकेसाठी नोकरी-धंदा मिळवण्यासाठी लागणारे शिक्षण ह्या गोष्टीसुद्धा त्या विसरत नाहीत. ह्या तर काही मोजक्या गोष्टी. त्यांच्या जनकल्याणकारी कार्यांची खरी यादी तर खूपच मोठी आहे. अम्मांकडून मिळालेल्या निस्वार्थी प्रेमाच्या अनुभवाने जगातील हजारो लोकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी त्यांचे आयुष्य दुसऱ्यांच्या मदतीसाठी वाहिले आहे. आपला अमूल्य वेळ देवून किंवा पैशाच्या रुपाने ते ह्या कार्यात मदत करीत आहेत. जणू काही अम्मांनी पेरलेल्या प्रेमाच्या बीजातून उभारलेले हे रोपटेच त्यांच्यात साकारलेले दिसते.
अम्मा नेहमी म्हणतात, “आजच्या युगात गरिबीचे दोन प्रकार दिसून येतात. जेव्हा कुणाकडे अन्न-वस्त्र आणि निवाऱ्याची उणीव असते, तेव्हा ती एक प्रकारची गरिबी असते. आणि प्रेम व कारुण्याचा अभाव असलेली दुसरी गरिबी. सर्वप्रथम आपण ह्या दुसऱ्या प्रकारच्या गरिबी दूर केली तर पहिली गरिबी आपोआपच दूर होईल . कारण आपल्या हृदयात प्रेम आणि करुणा असली तर आपण जीव ओतून दुसऱ्यासाठी अन्न-वस्त्र, निवारा मिळवून देण्याचा प्रयत्न करू शकतो.”
अम्मांच्या जनकल्याणकारी कार्यांच्या सफलतेचे रहस्य हेच आहे. त्यामुळेच त्या कार्यांचा उत्तरोत्तर विकास होत आहे. अम्मांच्या ह्या मोठ्या योजनेमध्ये एक भव्य शक्ती आहे. त्यामुळे दुखीत लोकांची प्रगती होतेच. शिवाय जे निस्वार्थीपणे सेवा करतात, त्यांची मने निर्मळ होतात. नकळत ते आध्यात्मिक मार्गाला लागतात आणि त्यात त्यांची प्रगती होऊ लागते. आज अम्मांची जनकल्याणकारी कार्ये जाती -धर्म- राष्ट्र -वंश इत्यादी संकुचित भेदांच्या बाहेर पडली आहेत. संपूर्ण जगाचे डोळे त्यावर एकाग्र झाले आहेत. अम्मांच्या, “माता अमृतानंदमयी मठ” ह्या संस्थेला २००५ मध्ये युनाईटेड नेशन्स कडून एक विशेष दर्जा बहाल करण्यात आला आहे.
अम्मा नेहमीच म्हणतात- “गंजून पडण्यापेक्षा झिजणे खूप नशीबाचे!”.
प्रत्येकाच्या नजरेप्रमाणे त्यांना अम्मांमध्ये वेगवेगळे रूप दिसते. कुणी त्यांना जनकल्याणकारी व्यक्ती मानते. कुणाला त्यांच्या रुपाने त्यांची आई भेटते. कुणाला त्यांच्या स्वभावात मैत्रीचा भाव दिसतो, तर कुणाला गुरु सापडतो. काहींना साक्षात देवीमाता दिसते. अम्मांनी त्यांचे आयुष्य ह्या विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. अम्मांचे खरे स्वरूप ह्या सगळ्या रूपांच्या पलीकडचे आहे. विश्वाच्या भोवती विखुरलेल्या जागृतीचा दैवी प्रकाश आणि ही त्याची विलोभनीय प्रभा. सर्वांच्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी अम्मा प्रत्येकाच्या कुवतीनुसार त्याच्या पातळीवर येतात. मग तो गरीब असो, एकटेपणाने ग्रासलेला असो किंवा खरोखर जिज्ञासेने पछाडलेला असो. अम्मांच्या जीवनाचा हाच तर मूलभूत हेतू आहे आणि त्यासाठीच अम्मा प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचतात. अम्मा म्हणतात, की त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत त्या कुणाला प्रेमाने जवळ घेऊन सांत्वन करावे आणि दुखीतांचे अश्रू पुसावे अशीच त्यांची मनस्वी इच्छा आहे.