अम्मांची दर्शनाची पद्धत अत्यंत विलक्षण आहे. जगन्मातेची साक्षात प्रतिमूर्ती असल्याने या माऊलीला पाहताक्षणीच हृदयाला पाझर फुटून नेत्रांद्वारे अश्रुधारा ओघळू लागतात. दर्शनासाठी आलेल्या सर्वांच्याच पाठीवर आईच्या ममतेने हात फिरवून, सर्वांच्या समस्या वैयक्तिकरित्या ऐकून अम्मा मार्गदर्शन करतात व सांत्वना, आशीर्वाद देतात. त्या देशविदेशात प्रवास करुन आपल्या आध्यात्मिक अनुभूतीचा, प्रेम व कारुण्याचा संदेश प्रसारित करीत आहेत. अम्मांच्या दर्शनाने लाखो लोकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडून आले आहे. त्या परिवर्तनामधूनच अम्मांच्या जनसेवा कार्यक्रमाचे विश्वव्यापी जाळे विणले गेले आहे.