नैसर्गिक आपत्ती प्रसंगी सहाय्यता कार्य

सन् 2001 पासून अम्मांच्या आश्रमाने अनेक नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदतकार्यात भाग घेतला आहे. तातडीच्या मदतकार्यात भाग घेऊन त्यानंतर आपद्ग्रस्तांचे दीर्घकालीन पुनर्वसन कार्यक्रम राबविले आहेत. अम्मांची आपदग्रस्तांप्रती सहानुभूती व कळकळ एवढी परिपूर्ण असते की नुसतीच भौतिक स्तरावरची मदत न देता त्याबरोबर भावनिक व मानसिक पाठबळ देऊन भावी पुनर्वसनावरही लक्ष दिले जाते.

26 डिसेंबर 2004 रोजी दक्षिण आशियातील अनेक देशांना सुनामीचा फटका बसला होता. भारतात तमिळनाडू व केरळच्या किनारपट्टीवर अमृतपुरी आश्रम परिसरातही सुनामीच्या या विनाशकारी लाटा धडकल्या होत्या. त्यावेळी आश्रमात उपस्थित असलेले देशविदेशातील 20000 भक्त व हजारो स्थानीक लोकांना अम्मांनी स्वतः पाण्यात उतरुन खाडीच्या पलिकडे मुख्य भूमीवर सुरक्षित स्थळी हलविले. अगदी मुक्या प्राण्यांनाही सुरक्षित स्थळी हलविले.

Ram Lakshmi

अम्मांच्या आश्रमाची सेवाकार्ये फक्त केरळपुरतीच मर्यादित नसून भारतभरात कुठेही नैसर्गिक आपत्ती कोसळली तर अम्मांच्या आश्रमाचे स्वयंसेवकांचे पथक सर्व अत्यावश्यक मदतसामुग्री घेऊन आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाते. सुरुवातीचे मदतकार्य संपल्यावर आपद्ग्रस्तांचे दीर्घकालीन पुनर्वसन कार्य पूर्ण करुनच मदत पथक परत येते. गेल्या काही वर्षात तर अम्मांच्या आश्रमाची सेवाकार्ये भारताची सीमा ओलांडून परदेशातही सुरु झाली आहेत.

Earthquake help

2001 मधील गुजरातच्या भूकंपात उध्वस्त झालेल्या 3 गावांचे पूर्ण पुनर्वसन केले. 1200 घरे, शाळा, दवाखाना, पाण्याची टाकी, समाजमंदिर, देवमंदिर, मशिद अशा सर्व सुविधांनी युक्त तीन गावे आश्रमाने बांधून दिली. तीन गावांचे काम पूर्ण झाल्यावर अम्मांनी स्वतः या गावात जाऊन गावक-यांना त्यांच्या नवीन घराच्या चाव्या दिल्या.

काश्मिरमधील भूकंप, सुरत व मुंबईतील जलप्रकोप, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील महापुराच्या वेळीही अम्मांच्या आश्रमाने रुग्णवाहिका, नर्स, डॉक्टर व औषधे इत्यादी सर्व सुविधांनी युक्त वैद्यकीय पथक पाठवून, त्याचबरोबर अन्न, वस्त्र, ब्लँकेट, संसारोपयोगी भांडी व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन मदत केली.

2009 मधील कर्नाटक-आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीच्या महापुरात जलमय झालेल्या गावांसाठी वैद्यकीय पथकासह अन्य प्राथमिक मदत साहित्य पाठवून प्राथमिक मदत कार्य पूर्ण झाल्यावर कर्नाटक सरकारच्या विनंतीनुसार काही गावे दत्तक घेऊन केवळ 20 दिवसांत 108 घरे बांधून दिली.

Raichur houses

रायचूरजवळ कृष्णा नदीतील बेटावर दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या तपस्येने पुनित झालेल्या कुरुगुड्डी गावाचे कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार बेटाच्या बाहेर पुनर्वसन केले. ऑगस्ट 2010 पर्यंत 1700 घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरीत घरांचे बांधकामही अल्पावधीतच पूर्ण होईल.

सुनामीनंतर अम्मांनी स्वतः श्रीलंकेत जाऊन आपद्ग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांना अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी मदत दिली.

अमेरिकेतील कतरिना वादळानंतर वादळग्रस्तांना 10 लाख डॉलर्सची मदत केली.
2010 मधील हैतीमधे आलेल्या भूकंपानंतर तेथे सर्व अत्यावश्क मदतसाहित्य घेऊन मदत पथक गेले व भूकंपात अनाथ झालेल्या लेकरांसाठी अनाथालय सुरु केले.

केनियातही अनाथालय सुरु करण्यात आले.