आपल्या अलौकिक प्रेमाने व त्यागमय कार्यांनी श्रीमाता अमृतानंदमयी देवी तथा अम्मा जगभरातील लाखो लोकांची आराधना मूर्ती बनल्या आहेत. त्यांच्याकडे येणा-या प्रत्येकालाच, जाती-धर्म-देश-वय-लिग अशा कोणत्याही भेदभावाविना अम्मा मातृवात्सल्याने छातीशी कवटाळून, हळूवारपणे पाठीवरुन हात फिरवून आपल्या अपार दिव्य प्रेमाचा वर्षाव करतात. अशा या अत्यंत साध्यासुध्या परंतु अतिशय प्रभावी रीतीने अम्मा असंख्य लोकांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणीत आहेत; त्यांची हृदये उमलण्यास मदत करीत आहेत. गेल्या 36 वर्षांत अम्मांनी संपूर्ण जगभरातील जवळजवळ अडीच कोटी लोकांना मातृवात्सल्याने आलिगन देऊन दर्शन दिले आहे.

दुस-यांचे उत्थान करण्याच्या अम्मांच्या या अथक कार्याचे फलस्वरूप म्हणून संपूर्ण जगभर धर्मार्थ सेवाकार्याचे एक विशाल जाळेच विणले गेले आहे. या सेवाकार्याच्या माध्यमातून लोकांना निःस्वार्थ सेवेचे सौन्दर्य व महत्व पटत असून त्यामाध्यमातून ते शांतीचा अनुभव घेत आहेत.

अम्मांची शिकवण आहे की “जड, चेतन अशा सर्वच वस्तुमध्ये दिव्यत्वाचा वास आहे. संपूर्ण चराचरात ही दैवी आधारभूत एकात्मता पाहणे हे नुसतेच अध्यात्माचे सार नसून सर्व दुःखांचा अंत करण्याचा तोच एकमेव मार्ग आहे.”

अम्मांची शिकवणूक वैश्विक आहे. जेव्हा जेव्हा त्यांना तुमचा धर्म कोणता असे विचारले जाते तेव्हा त्या आवर्जुन म्हणतात, “माझा धर्म आहे- प्रेम.” त्या असा आग्रह धरीत नाही की तुम्ही देवाधर्मावर विश्वास ठेवलाच पाहिजे. “तुमचे सत्यस्वरूप काय आहे, हे जाणून घ्या व तुमच्या त्या स्वस्वरूपावरच विश्वास ठेवा,” एवढेच त्या आवर्जुन सांगतात.