{2 डिसेंबर 2014 रोजी ख्रिश्चन धर्मपीठ व्हॅटिकन सिटी, येथील पॉन्टीफ़िशल अकादमी ऑफ सायन्स मध्ये देह-व्यापार व आधुनिक गुलामी या विषयावर अम्मांनी दिलेले भाषण.}

watch video:

प्रेमस्वरूपी व आत्मस्वरूपी, आज येथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार. आदरणीय पोप फ्रान्सिस व इतर आदरणीय अतिथीगण. या ऐतिहासिक संमेलनात भाग घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी वेळ काढला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छिते. या प्रसंगी मी पॉन्टीफ़िशल अकादमी ऑफ सायन्सचे कुलपती आदरणीय पोप महोदय व या संमेलनाचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी अत्यंत परिश्रम घेतले त्या आदरणीय बिशप मार्सेलो सांशेज सोरोंडो यांचा दृढ संकल्प व सामाजिक जाणीवेबद्दल आभार व्यक्त करते.

मानवी देहव्यापार समाजासाठी अत्यंत वाईट असा शाप आहे. तो केवळ या शताब्दीपुरताच मर्यादित नाही तर अनादी काळापासून चालत आलेला आहे. आपण गुलामी व वेठबिगारी दूर करण्याचा जेवढा अधिक प्रयत्न करतो तेवढे अधिक ते उलटवार करतात. जणूकाही एखादा प्रेतात्मा आपल्याला पुनःपुन्हा त्रस्त करण्यासाठी येतो आहे. जसे की पोप महोदयांनी म्हटले आहे की आज आपण समाजाला एक शरीर समजले तर मानवी देह व्यापार म्हणजे त्या देहावरील उघड्या जखमेसारखा आहे. हा मानवतेप्रति अपराध आहे.

या अत्यंत क्रूर व अनैतिक गुन्ह्याचा समूळ नाश करणे व त्याची शिकार झालेल्या लोकांची मुक्तता व रक्षण करण्याच्या दिशेने काही भरीव पावले उचलणे हे प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे. तसेच न्याय व समाज कल्याणाप्रति बांधील असलेल्या प्रत्येक नागरिकाची देखील ही नैतिक जबाबदारी आहे. परंतु या समस्येचे समाधान सोपे नाही हे कटु सत्यही आपल्याला ठाऊक आहे, कारण की देह-व्यापाराची ही समस्या खूप जुनी व खोलवर रुजलेली आहे. या देह व्यापारामुळे कितीतरी निरागस व असहाय्य मुलांचे जीवन कोमेजून जाते. आपल्या मनात भविष्याची मधुर स्वप्ने पाहणार्या या निष्पाप जीवांचे जीवन पाहता पाहता नष्ट होते. आपल्याला हे जीवन परमात्म्याच्या कारुण्याने मिळाले आहे म्हणून आपण सत्कर्म करीत हे जीवनपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण केले पाहिजे. दुसर्यांचे जीवन नष्ट करणे म्हणजे परमात्म्याने दिलेल्या या अमूल्य भेटीचा दुरुपयोग करणे होय. सारे जीव परमात्म्याच्या हातातील केवळ एक उपकरण (कठपुतळी)आहेत.

धर्म हा परमात्म्याच्या दरबाराचा कायदा आहे. त्याचा आदर व पालन करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. देह-व्यापार हा घोर अधर्म आहे. सर्व धर्मगुरुंमध्ये दुसर्यांना देहव्यापाराच्या गुलामीच्या जाळ्यात फसविणारे मानवजातीचे अपराधी आणि दुर्दैवाने त्या जाळ्यात फसलेले अभागी जीव अशा दोघांनाही मदत करण्याची क्षमता असते. ह्या दोघांनाही योग्य मार्ग दाखविण्याची आवश्यकता आहे. धर्मगुरुंनी हे युद्ध लढून धर्मरक्षणासाठी तयार असले पाहिजे. या युद्धाचा उद्देश्य दुसर्यांना ठार मारणे असा नसून आसुरी बुद्धीच्या लोकांपासून असहाय लोकांचे रक्षण करणे हा आहे. आपण धर्म,वर्ण, जात इत्यादींनी प्रेरित होऊन सूडभावनेने काम न करता सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या दिव्यत्वाचे स्मरण ठेवून सहानुभूती विकसित करण्याची आवश्यकता आहे.

मानवाने धर्म, जात, भाषा, देश, प्रांत इत्यादींच्या नावावर खूप विभाजन केले आहे. आपणच उभ्या केलेल्या या भिंती पाडण्यासाठी आपण शुद्ध सर्वसमावेशक प्रेमाचा पुल बांधूया. कितीही कठोर हृदय असले तरी प्रेमाने ते मृदू होते. अत्यंत घनदाट अंधारातही प्रेमाचा प्रकाश प्रसारित होतो. निःस्वार्थ प्रेमात आपल्याला गुलाम बनविणार्या आसुरी मनाला स्वतःचाच मुक्तिप्रदा बनविण्याचे सामर्थ्य असते. देहव्यापार करुन दुसर्यांना गुलाम बनविणारे लोक एक प्रकारच्या नकारात्मक कुप्रवृत्तीचे शिकार झालेले असतात. धर्मगुरुंनी मनात कोणताही सुप्त व स्वार्थी उद्देश न बाळगता सर्व धर्मांचे सार तत्त्व असलेले निःस्वार्थ प्रेम व अध्यात्मावर आधारित, पुनर्वसनाची एक कार्ययोजना निश्चित केली पाहिजे.

उघड्या डोळ्यांनी अधर्म होत असलेला पाहूनही तो थांबविण्यासाठी काहीच न करणे हा देखील एक अधर्मच आहे. सरकार व राजकीय नेत्यांनी गुन्हेगार सुटू नये म्हणून पळवाटा नसलेले कायदे बनवून ते कठोरपणे लागू केले पाहिजे. अनेक देशांत तेथील सरकारे व काही बिगर सरकारी स्वयंसेवी संस्था देहव्यापाराच्या समस्या दूर करण्यासाठी लढा देत आहेत. परंतु मानवाला भोगवस्तू समजून त्याचा वापर करुन फेकून देणार्या देहव्यापाराच्या क्षेत्रांतील या माफियांचे सामर्थ्य व आर्थिक लाभ कमी झालेला काही दिसून येत नाही. या व्यापारातील पीडितांची संख्या वेगाने वाढतच चालली आहे. एखाद्या विशाल वृक्षाच्या मुळांसारखे या समस्येची मूळेही समाजात खोलवर रूजली आहेत. आपल्या डोळ्यांसमोर घडत असलेल्या या अन्याया विरुद्ध भरीव पावले उचलण्यात आपण अयशस्वी ठरलो, तर तो भावी पिढ्यांसाठी उपहासाचा विषय बनेल.

देह-व्यापाराची शिकार झालेले पीडित लोक त्यांचा आत्मसन्मान गमावून बसतात आणि त्यातून ते निराशेच्या खोल गर्तेत बुडतात. दहशतवादी त्यांचा उपयोग अंमली पदार्थांचे स्मगलिंग करण्यासाठी, आत्मघाती बॉम्बरच्या रूपात व अनेक प्रकारच्या बेकायदेशीर कामांसाठी करतात. आपण खात असलेले काही अन्नपदार्थ लहान मुलांना रात्रंदिवस सक्तीने राबवून त्यांच्याकडून जबरदस्तीने बनवून घेतले जातात. या पीडितांचे मुत्रपिंड व शरीराचे काही अवयव बाजारात विकाऊ वस्तू म्हणून विकले जातात. हे पीडित जेव्हा कोणत्याही कामासाठी निरुपयोगी ठरतात किंवा सततचा दुर्व्यवहार व दुरुपयोगाने मनोरुग्ण वा एड्स सारख्या असाध्य रोगांचे शिकार होतात तेव्हा त्यांना मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिले जाते.

मी स्वतः माझ्या कानांनी देहव्यापारात फसलेल्या हजारो लोकांच्या दर्दभर्या कहाण्या ऐकल्या आहेत. एकदा एक स्त्री माझ्याकडे येऊन रडू लागली. ती म्हणाली, ‘अम्मा, मला एड्स झाला आहे. मरण्याआधी माझ्या बाळाला माझ्या डोळ्यांनी पाहण्याची माझी एकमेव इच्छा आहे. अम्मा, माझ्यावर एवढी दया करा! मला मदत करा.’ अम्माने अधिक चौकशी केली असता तिने सांगितले, ‘मी 9 वर्षाची असताना एका घरात मोलकरीण म्हणून काम करत होते. तेथे मला एक प्रौढ माणूस भेटला. त्याने मला अधिक पगाराचे व इतर अनेक प्रलोभने दाखविली. माझ्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मी त्याच्या बरोबर गेले. नवीन ठिकाणी गेल्यावर तेथे माझ्यासारख्या अनेक मुलींना मी पाहिले. मला त्या कुणाशीही बोलू दिले नाही. अखेर तो कुंटणखाना असल्याचे मला समजले. पुरुषांनी माझ्यावर बलात्कार करणे सुरु केले. सुरुवातीला मला राग येत होता, अपराधीपणाही वाटत होता. परंतु काळाच्या ओघात आत्मसन्मानाची भावना मरुन गेली आणि आहे त्या घृणास्पद कामात आनंद शोधू लागले.

पाच वर्षानंतर मी एका मुलीला जन्म दिला. त्यांनी महिनाभर मला मुलीला स्तनपान करु दिले. नंतर अचानक त्यांनी मुलीला माझ्यापासून हिरावून घेतले. काही वर्षांनी मला एड्स झाल्याचे निदान झाले. त्यांनी मला माझ्या मुलीला भेटण्यास मनाई केली. मी फारच आजारी झाले तेव्हा ते म्हणाले की आम्ही तुला दवाखान्यात घेऊन जात आहोत, परंतु त्यांनी मला रस्त्यातच सोडून दिले. त्यांनी मला माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्यावे म्हणून मी परोपरीने विनंती केली परंतु त्यांनी काहीएक ऐकले नाही. त्यांनी मला परत कुंटणखाण्यातही घेतले नाही. मी ज्यांच्याकडे मदतीसाठी हात पसरला त्या सर्वांनी माझ्याशी अत्यंत तिरस्कृत व घृणास्पद व्यवहार केला. माझ्यासाठी सारे दरवाजे बंद झाले होते. आता मी आणखी जगू इच्छित नाही. मरण्याआधी माझ्या बाळाला पाहण्याची माझी एकमात्र इच्छा आहे. ते लोक तिलाही माझ्यासारखे हार्मोन्सची इंजेक्शने देऊन मोठी बनवतील का? आणि उपयोग करुन रस्त्यावर फेकून देतील का?’’

तिची ती दयनीय कथा ऐकून मी काही लोकांना तिच्या मुलीचा शोध घेण्यास पाठविले. ते अत्यंत कठीण काम होते. अशा अनेक स्त्रियांनी त्यांच्या दुःखद कथा अम्माला सांगितल्या आहेत. एका दुर्दैवी स्त्रीने तिची कथा सांगितली- ‘एक माणूस नियमितपणे आमच्या भेटीसाठी येत असे. आम्हाला ज्या कशाची आवश्यकता असायची त्याची तो मोठ्या आपुलकीने मदत करायचा. अशाप्रकारे तो आमच्या चांगला परिचयाचा झाला होता. काही दिवसांनी त्याने आमच्या मुलांना विदेशात पाठवून त्याच्या मित्राच्या कंपनीत चांगले काम देण्याचा प्रस्ताव ठेवला. दरमहा मोठी रक्कम पाठविली जाईल असे त्याने आश्वासन दिले. त्याने आम्हा सर्वांना प्रत्येकी 1000 रुपये अॅडव्हान्सही दिला. नंतर तो आमच्या मुलांना घेऊन गेला. त्या दिवसापासून आम्ही त्या माणसाला व आमच्या मुलांना परत पाहिले नाही. आमची मुले कुठे आहेत तेही आम्हाला माहित नाही. आम्ही ऐकले आहे की ते कुंटणखान्यात आहेत. काही लोक त्यांना शोधण्यासाठी त्या कुंटनखान्यात गेली असता त्यांना सांगितले गेले की मुलांना विकून दुसरीकडे पाठविले आहे. एवढे सांगून ती ढसढसा रडू लागली.

आज प्रत्येक गोष्टीचे मूल्य वाढले आहे. पुरुष त्यांचे वीर्य विकत आहेत आणि स्त्रियाही त्यांची बीजांडे विकून मोठा पैसा मिळवत आहेत. परंतु त्याचवेळी अनेक देशांमध्ये वेश्यावृत्तीसाठी किंवा वेठबिगार म्हणून 10-20 डॉलरच्या मोबदल्यात मुले विकली जात आहेत.

देह-व्यापार एक जटिल समस्या आहे. त्याचे समाधानही बहुमुखी असले पाहिजे. आपल्याला धर्म, दारिद्य्र व कायदेशीर बाबी इत्यादी समग्र पैलूंवर लक्ष द्यावे लागेल. समाजसेवा व जागरूकता-अभियानांचीही या कार्यात महत्त्वाची भूमिका आहे. हे सर्व पैलू विचारात घेऊन आपण परस्पर सहकार्याने सद्य परिस्थिती सुधारू शकतो. नियमितपणे मधुमेहाचे औषध घेऊनही जर तो रोगी गोड पदार्थ खात राहिला तर त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल. मधुमेहासाठी आहार नियंत्रण व जीवनशैलीतील बदल हे घटक औषधापेक्षाही जास्त महत्त्वाचे असतात. ज्यांना शाळेच्या अभावी योग्य शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत आणि अधिकांश मुले चौथी किंवा आठवी पर्यंतच शिकतात, अशा गरीब मुलांच्या बाबतीत केवळ आर्थिक मदतीने परिस्थिती सुधारणार नाही. आपण नव्या पिढीला तसेच देहव्यापारात फसलेल्यांना प्रायोगिक शिक्षण दिले पाहिजे की जेणेकरुन त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण होईल. आपण त्यांच्यामधील सुप्त साहस व आत्मविश्वास जागवून त्यांना परिस्थितीवर मात करण्यास मदत केली पाहिजे. आपण त्यांना जाणीव करुन दिली पाहिजे की ते मांजरीच्या पिल्लांसारखे असहाय्य व दुर्बळ नाहीत तर शक्तिशाली साहसी सिंह आहेत. आपण त्यांचे मनोबळ वाढविले पाहिजे.

शिक्षण दोन प्रकारचे असते. एक आहे उपजीविकेसाठीचे शिक्षण आणि दुसरे आहे जीवनाविषयीचे शिक्षण. आपण महाविद्यालयात डॉक्टर, इंजीनियर किंवा वकील बनण्यासाठी जे शिक्षण घेतो ते उदरनिर्वाहासाठीचे शिक्षण झाले. याउलट जीवनाविषयीच्या शिक्षणासाठी अध्यात्माची मूलभूत तत्त्वे समजून घेण्याची जरुरी असते. शिक्षणाचा खरा उद्देश केवळ यंत्रांची भाषा समजणारे लोक निर्माण करणे हा नाही. शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे हृदयाची संस्कृती प्रदान करणे- एक अशी संस्कृती जी चिरस्थायी संस्कारांवर आधारित आहे.

अम्मांचे भक्तगण जेव्हा गावांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी जातात तेव्हा महिलांना लैंगिक शिक्षण व जीवन संपन्न बनविणारे शिक्षणही दिले जाते. परिणामस्वरुप अनेक तरुण मुली स्वतःला वेश्यावृत्तीसाठी विकण्यापासून वाचवू शकल्या. अनेकदा त्यांचे मातापिताच त्यांची विक्री करतात. ज्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले गेले होते अशा काही जणी अम्माकडे मदत मागण्यासाठी आल्या असता अम्माने त्यातील 80 % मुलींना वाचविले आहे. उर्वरीत 20% तेच नरकप्राय जीवन जगत आहेत. त्यांची बदलण्याची इच्छा नाही आणि अम्मानेही त्यांना दुसरे काही काम करण्याची जबरदस्ती केली नाही.

कामवासना ही एक प्रकारची भूकच आहे. आपल्याला भूक लागली तरी आपण जे काही समोर येईल त्यावर ताव मारीत नाही. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन खाद्यपदार्थांची ऑर्डर देतो. आपल्या आजूबाजूला बसलेल्यांनीही अनेक पदार्थांची ऑर्डर दिलेली असते. अशा वेळी आपल्या मनात कधी असा विचार येऊ शकतो की अरे, मी त्या पदार्थाची ऑर्डर दिली असती तर बरे झाले असते. आपल्या मनात असा विचार आला तरी आपण संयम बाळगतो. अशाप्रकारे जीवनात आपल्याला प्रत्येक ठिकाणी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे, विशेषतः कामवासनेच्या बाबतीत.

आध्यात्मिक संस्कार बालवयातच दिले पाहिजे. लहानपणी आई सांगायची की, ‘बेटी, नदीत कधी लघवी करु नये. नदी देवी आहे.’ खाडीच्या थंड पाण्यात पोहताना लघवीची इच्छा व्हायची पण आईचे शब्द आठवून आम्ही स्वतःवर संयम ठेवू शकत होतो. नदीप्रति आपला आदरभाव असेल तर आपण कधी तिच्यात घाण करणार नाही. जुन्या काळी लोकांचा नदीप्रति आदरभाव असल्याने आपले पूर्वज नदी स्वच्छ ठेवत होते आणि स्वच्छ नदी सर्वांनाच लाभदायक असते. देव आहे की नाही हे महत्त्वाचे नसून देवावर आपला विश्वास व श्रद्धा असेल तर आपल्यात चांगले संस्कार व समाजात धर्माची पताका उंच ठेवण्यास मदत होते. हे संस्कारच समाज व संपूर्ण सृष्टीत संतुलन टिकवून ठेवतात.

रस्ते वाहनांच्या रहदारीसाठी बनविले जातात. पण कुणी म्हटले की मी माझ्या मर्जीने गाडी चालवेन तर अशाने अपघात होतील. ज्याप्रमाणे रहदारीचे काही नियम असतात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक संस्कार आपल्याला नियमानुसार जगण्यास मदत करतात.

अनेक लोक बाल मजूरी संपविण्याच्या दिशेने कार्य करीत आहेत. परंतु नुसते कायद्याच्या आधाराने त्यावर बंदी घालून ही समस्या दूर होणार नाही. एकदा एकजण दहा वर्षाच्या मुलाला घेऊन अम्माकडे आला. तो मुलगा कसा अनाथ झाला हे सांगून तो म्हणाला की हा मुलगा आश्रमात राहून मोठा व्हावा अशी माझा इच्छा आहे. त्याच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असल्याने त्याची आई व बहीण घराजवळच्या एका काडेपेटी बनविणार्या कारखान्यात काम करु लागल्या. नंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी आईला मुत्रपिंडात खडा झाल्याने काम करण्यास मनाई केली आणि अखेर तिने अंथरुण धरले. त्याच्या बहिणीला एवढी कमी मजुरी मिळायची की त्यात त्यांचा उदरनिर्वाह होणे अवघड झाले. मग काही दिवसांनी बालमजूरी विरुद्ध कायदा बनला आणि काडेपेटी फॅक्टरीच्या मालकाला अटक झाली. त्याची फॅक्टरी बंद झाली आणि परिणामस्वरुप तेथे काम करणार्या सर्व मुलांची नोकरी गेली. आता कमाईचा दुसरा कोणताच मार्ग नसल्याने एके दिवशी आईने मुलाला सकाळी शाळेत पाठविल्यावर मुलीला विष देऊन स्वतःही विष घेऊन आत्महत्या केली. असे कारखाने बंद करणे योग्य आहे असे वाटते परंतु त्या कारखान्यावर पूर्णतः अवलंबून असलेल्या गरीब कुटुंबांचा त्यावेळी आपल्याला विसर पडतो. एखाद्या समस्येचे समाधान शोधण्याच्या प्रयत्नात जर आपण फक्त एकाच पैलूवर लक्ष देऊन इतर पैलूंकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम अशा गरीब लोकांना भोगावा लागतो ज्यांच्याकडे उपजीविकेसाठी दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नाही. म्हणून बालमजूरी व देहव्यापाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याआधी, आपण अशी एक संस्था स्थापन केली पाहिजे, जी अशा कुटुंबांना आत्मनिर्भर बनविण्याच्या कामी तसेच त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांना पूर्ण मदत करु शकेल.

करुणा अध्यात्माचा प्रारंभही आहे आणि शिखरही आहे. जर आपण ‘करुणा’ हा शब्द केवळ शब्दापुरताच मर्यादित न ठेवता तो कर्मामध्ये रूपांतरित केला तर जगातील जवळजवळ 90% समस्या दूर होतील. जगात दोन प्रकारचे दारिद्य्र दिसून येते. पहिला प्रकार आहे- अन्न, वस्त्र आणि निवार्याच्या अभावाचे दारिद्य्र आणि दुसरा प्रकार आहे प्रेम व कारुण्याच्या अभावाचे दारिद्य्र. परंतु आपण प्रथम दुसर्या प्रकारच्या दारिद्य्रावर काम केले पाहिजे. आपल्या हृदयात प्रेम व कारुण्य असेल तर आपण अन्न, वस्त्र व निवार्याचा अभाव असलेल्या दरिद्री नारायणाची पूर्ण मन लावून सेवा करु शकू.

भगवद्गीतेनुसार, सृष्टी आणि स्रष्टा भिन्न नसून एकाच वस्तूची दोन भिन्न नावे आहेत. जसे समुद्र आणि त्याच्या लाटा दोन नसून एकच वस्तू आहे. पाण्याने भरलेल्या हजार घटांमध्ये हजार सूर्य प्रतिबिंबित होत असलेले दिसले तरी वस्तुतः सूर्य एकच आहे. याचप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये एकच आत्मा विद्यमान आहे. ज्याप्रमाणे एका हाताला वेदना होत असतील तर दुसरा हात स्वाभाविकपणे वेदना दूर करण्यासाठी सरसावतो, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी दुसर्यांमध्ये स्वतःला पाहून सहाय्य व सहारा देण्यासाठी पुढे आले पाहिजे.

सर्व धर्म व सर्व देशांचे लोक मानवी गुलामीच्या विनाशकारी परिणामाचे शिकार ठरुन घोर यातना व दुःख सहन करीत आहेत. भाषा, जाती व वर्णभेदाने त्यांच्या शारीरिक व मानसिक दुःखात थोडाच फरक पडतो? हे सारे लोक एक समान मानव आहे. अंतहीन दुःख व भावनिक दमनाच्या पंज्यातून सुटण्यासाठी धडपडणारे मानव!

बाह्य जखमा भरुन येण्यासाठी काही अँटिबायोटिक्स व मलमे असतात. याचप्रमाणे आपल्या आतील अवयवांचे रोग दूर करण्यासाठी दुसर्या प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु आपल्या मनाचे घाव भरण्यासाठी एकमेव औषध आहे- शुद्ध प्रेम. देह-व्यापारात भरडल्या गेलेल्यांचे मानसिक व भावनिक घाव भरुन काढण्याचे एकच माध्यम आहे आणि ते आहे आपण त्यांची निस्स्वार्थ प्रेमाने देखभाल करावी जेणेकरुन त्या लोकांना भूतकाळात त्यांच्यावर लादलेल्या अंधःकारातून बाहेर पडून स्वतंत्र जीवनाच्या प्रकाशात जगण्याचे बळ मिळू शकेल. हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला समाजसेवकांचे एक पथक तयार करावे लागेल. आणि अशी समर्पित सेना निर्माण करण्याचे कार्य केवळ धर्म आणि आध्यात्मिक गुरुच करु शकतात.

माझी प्रार्थना आहे की सर्व प्राण्यांमध्ये अंतस्थ कारुण्याचा उदय होवो. आपल्या सर्वांमध्ये अशी विवेक बुद्धी जागृत व्हावी की आपण जीवन व आपल्या सभोवतालच्या सर्व जीव जंतूशी प्रेम व आदराने व्यवहार करावा. आपण काही पृथक पृथक द्वीप नसून ईश्वरीय सृष्टीच्या शृंखलेच्या परस्परांत गुंफलेल्या कड्या आहोत. ईश्वर कृपेने आपल्यास हे सत्य ओळखता यावे.आपण दुसर्यांचे सुखदुःख स्वतःचे सुखदुःख समजले पाहिजे. भूतकाळातील सर्व दुःख विसरुन, आपण सर्वांना क्षमा करण्यास सक्षम होवोत. या जगातील सर्व चांगुलपणासमोर नतमस्तक होऊन आपण अखंड सुखाचे भागीदार बनोत.

केवळ प्रेमाने परिपूर्ण संरक्षण व देखभालीनेच देह व्यापाराची शिकार झालेल्यांची आपण तीन प्रकारे मदत करु शकतो. एक- त्यांचे भूतकाळातील घाव भरुन येण्यास, दुसरे त्यांच्यावर लादलेल्या अंधःकारातून त्यांना बाहेर काढण्यास, आणि तिसरे त्यांच्या जीवनात येणार्या नवीन पहाटेचे स्वागत करण्यासाठी त्यांना तयार करुन. आपल्या सर्वांनाच दुसर्यांच्या तसेच आपल्या स्वतःच्याही जुन्या चुका व त्यातून मिळालेले दुःख विसरण्याचे सामर्थ्य लाभो. समष्टीप्रति आपण कृतज्ञतेचा अनुभव करुन नतमस्तक व्हावे!

देह-व्यापाराच्या समस्येचे नैतिक, आर्थिक व कायदेशीर असे अनेक पैलू आहेत. म्हणून त्याचे समाधानही अनेक स्तरांवर शोधावे लागेल. सर्वसमावेशक प्रयत्नांनीच आपण ही समस्या काही मर्यादेपर्यंत कमी करण्याची आशा करु शकतो. माझी परमात्म्याला प्रार्थना आहे की त्याने या कार्याशी संलग्न असलेल्या सर्वांना कार्य करण्याची शक्ती प्रदान करावी.

॥ ॐ लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु॥