अम्मांच्या संदेशाचा सारांश
(24 डिसेंबर 2010)
जेव्हा जेव्हा एखादा उत्सव व पवित्र दिवस असतो, तेव्हा अम्मा संदेश देते. तथापि, हे सर्व संदेश वेगवेगळे दिसत असले तरी वस्तुतः ते सारे एकच असतात, त्यांचे सारतत्त्व एकच असते. धर्म अनेक असले तरी, अध्यात्माचा संदेश एकच एक असतो. फक्त तो संदेश वेगवेगळ्या रीतीने सादर करण्यात येतो, इतकेच.
तो संदेश तुम्हाला एका वाक्यात सांगायचा म्हटले तर असा सांगता येईल- “स्वतःला जाणून घ्या. ” हाच तो सर्वोच्च संदेश आहे. हा संदेश फक्त आध्यात्मिक मार्गापुरताच संबंधित नाही तर आपण ज्या कोणत्या कार्यक्षेत्रात कार्य करीत असू त्या प्रत्येक क्षेत्रात जर आपल्याला अपेक्षित परिणाम हवा असेल तर आपण सर्वप्रथम आपले सामर्थ्य जाणले पाहिजे. आपले सामर्थ्य आणि आपल्या दुर्बळता हे दोन्ही आपण जाणले पाहिजे. स्वतःला जाणण्याचा हा एक स्तर आहे. तथापि स्वतःला निव्वळ मनाच्या पातळीवर समजून घेणे हे काही आत्मज्ञानाचे सर्वोच्च शिखर नाही. त्यासाठी आपल्याला अंतरात गहनतम पातळीपर्यत जाण्याची जरुरी असते.
कारण स्वतःला फक्त आत्म्याच्या स्तरावर जाणल्याने आपल्याला आपले पूर्ण सामर्थ्य व दुर्बळता कळत नाही, आणि आपण त्यांच्या पारही जाऊ शकत नाही. याउलट शास्त्रांनी आपल्याला संदेश दिला आहे- “तुम्ही दुर्बळ नाहीत, तुम्ही असमर्थ नाहीत, तर तुम्ही अमर्यादित शक्तिसामर्थ्याचा स्रोत आहात. ” हेच ते परम सत्य आहे. हे सत्य जाणून घेणे हेच जीवनाचे परम लक्ष्य आहे. ऋषिमुनी व सद्गुरु हाच एक संदेश काळाची व लोकांची गरज ओळखून वेगवेगळ्या रीतीने मानवजातीला देत आले आहेत.