आत्मस्वरूपी व प्रेमस्वरूपी सर्वांना नमस्कार.

माझ्या मुलांनो! मानवाला मानसिक शांती मिळविण्यास मदत व्हावी म्हणून धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांची सुरुवात केली गेली होती. परंतु त्यांचा वांछित परिणाम मिळत असल्याचे कुठे दिसून येत नाही, आणि त्यासाठी दोषी आहे मानवाचा पैशाचा अती लोभ. पैसा व भोगविलासावरच सारे लक्ष केन्द्रित केल्याने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ काय आहे याचाच मुळी विसर पडला आहे. जीवनाला जीवन देणा-या प्रेमाचा आपल्याला साफ विसर पडला आहे.

देवाने आपल्याला मानव जन्म देऊन विकसित व विशाल होण्याची एक अमूल्य संधी दिली आहे. आपले विचार व कर्म जीवनाला एक सुव्यवस्थित स्वरूप व शुद्धता देऊन जीवनाला अर्थ प्रदान करतात. परंतु दुर्दैवाने आज आपण जीवनाला एकमेव अर्थ दिला आहे- ‘पैसा कमविण्याची संधी.’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मानव कोणत्याही भल्याबु-या साधनांचा उपयोग करण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत उच्च नैतिक मूल्यांचे जे पतन होत आहे ते पाहून आश्चर्य वाटू नये.

अध्यात्म, पैसे कमविण्याच्या वा इच्च्छापूर्तीच्या विरुद्ध नाहीये. परंतु आपण एक संतुलित दृष्टिकोन बाळगावा अशी रास्त अपेक्षा अध्यात्माकडून बाळगली जाते. संपत्ती व मानवता तराजूच्या दोन पारड्यासारखे आहेत. त्यांच्यात संतुलन राहील याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. तेवढ्यासाठीच आपल्या ऋषिमुनींनी अर्थ व कामाच्या तुलनेत धर्माला अधिक महत्व दिले आहे. धर्माचा बळी देऊन अर्थ-काम कदापि मिळवू नये असे बजावले आहे.

समाजातील जीवनमूल्यांचा -हास थांबविण्यासाठी परिवर्तन अत्यंत आवश्यक आहे. तथापि हे परिवर्तन मुख्यतः आंतरिक असले पाहिजे. आपल्या नकारात्मक वृत्तींना सद्गुणांमध्ये परिवर्तित केले पाहिजे. जर आपण स्वतः या परिवर्तनासाठी तयार नसू तर निसर्ग वा देव ती कामगिरी पार पाडेल. ईश्वर दुष्ट प्रवृत्तींची अधिक वाढ होऊ देणार. उदार व्यक्तींचा समाज निर्माण करणे ही आज काळाची गरज झाली आहे.
शिक्षण – मुलांवर उच्च जीवनमूल्यांचे संस्कार बालपणांतच करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. स्पर्धेच्या नावावर मुलांमध्ये द्वेष व घृणा वाढू देऊ नये. आपण त्यांना परस्परांवर प्रेम करण्याचे शिकविले पाहिजे. शाळा कॉलेजातील अभ्यासक्रमात प्रेम व कारुण्याच्या पाठांचा समावेश असला पाहिजे. यातून पददलित वर्गाचे दुःखकष्ट व शोषण दूर करण्यास मदत होईल, युद्ध व हिसक संघर्ष कमी होतील व विश्वशांतीचे आपले स्वप्नही काही प्रमाणात साध्य होईल. परस्पर प्रेम वाढल्यावर निसर्गही शांत होईल.

सच्चे सुख आपल्या स्वतःच्या मनाला समजावून घेतल्यावरच येऊ शकते. जोपर्यंत आपण स्वतःच आपल्या दुर्बल मनाने निर्माण केलेल्या अंधार कोठडीत बंद राहण्याचा निश्चय केला आहे तोपर्यंत कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही. आपल्याकडे इतर कितीही साधनसंपत्ती असली पण जर आपल्या स्वतःच्या मनाचाच कृपाशीर्वाद नसेल तर आपण सुखी होऊ शकणार नाही. खरेतर सुखी होणे फारसे अवघड नाही, त्यासाठी फक्त एकच वस्तू हवी आणि ती आहे प्रेम! प्रेम जीवनाचा केन्द्रबिदू आहे. आपली सर्व कर्म या बिदूवर लक्ष केन्द्रित करुनच पार पाडली पाहिजेत, तेव्हाच आपण स्वतःही प्रेमाचा अनुभव करु शकू, आणि हे प्रेम इतरांनाही वाटू शकू. आज आपल्या जीवनात इतर सारंकाही आहे, पण शुद्ध प्रेम नाहीये. म्हणूनच सगळीकडे सहृदय मनुष्य कमी होऊन त्यांच्या जागी हृदयशून्य यंत्रमानव जन्माला येत आहे. आपल्या सर्वात जवळची वस्तू असलेले प्रेम आज आपल्यासाठी सगळ्यात दूरचे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी एक महिला दर्शनासाठी आली होती. तिच्या पतीला पक्षवात झाला आहे. शेजाःयांच्या घरी धुणीभांडी करुन ती महिला कसेतरी घर चालवत आहे. ते कुटुंब मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. माझ्या मुलांनो! हे एक उदहारण आहे. लाखो परिवारांची हीच कहाणी आहे. आणि दुसरीकडे कितीतरी लोक ऐषारामी जीवन जगत आहेत. आलिशान पार्ट्यांमध्ये मद्यप्राशन करुन पैसा बरबाद करीत आहेत. अनेक लोक दुष्कर्मात गुंतले आहे. केवळ स्वतःच्याच स्वार्थाचा विचार करीत आहेत. आणि त्याचवेळी दुसरीकडे अनेक लोक एकवेळच्या जेवणालाही महाग झाले आहेत. आपल्या इच्छाआकांक्षा पूर्ण करुन सुखाच्या शोधात मग्न असणा-या आपल्या मनात त्या बिचाःया गरीबांचा क्षणभर तरी विचार येतो का? माझ्या मुलांनो! अशा अभागी लोकांचा तुम्ही आधी विचार केला पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्यास तयार झाले पाहिजे. आपल्या स्वतःच्या सुखाचा मार्ग त्यातूनच जाणार आहे हे लक्षात घ्या. ॐ