प्रश्न – हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवीदेवतांची आराधना केली जाते. वस्तुतः ईश्वर एक आहे की अनेक?

अम्मा – हिंदू धर्मात ईश्वर अनेक नाहीत. हिंदू धर्मात एकाच ईश्वरावर विश्वास ठेवला जातो. एवढेच नाही तर हिंदू धर्म अशी घोषणा करतो की संपूर्ण ब्रह्मांडात ईश्वराहून भिन्न असे दुसरे काहीच नाही. दृष्यमान जगतातील ही सर्व भिन्नभिन्न नामरूपे ही त्या एकमेव परमात्म्याचीच अभिव्यक्ती आहे.

ईश्वर सर्वव्यापी चैतन्य आहे. तो नामरूपांच्या अतीत आहे. परंतु भक्तांवर अनुग्रह, कृपा करण्यासाठी आपल्या इच्छेनुसार तो कोणतेही रूप धारण करु शकतो, नानाविध भाव धारण करु शकतो. हवा मंद मंद झुळकीच्या स्वरूपात वाहू शकते, सोसाट्याच्या वाःयाच्या रूपात वाहून धुराळा उडवू शकते आणि चक्री वादळाच्या रूपात वाहून आपल्या बरोबर काहीही उडवू शकते. तर मग या हवेचा नियंता कोणते रूप धारण करु शकणार नाही? त्याच्या ऐश्वर्याचे वर्णन कोण करु शकेल? ईश्वर सगुण व निर्गुण असे दोन्ही भाव स्वीकारु शकतो, जसे वायू स्तब्धही राहू शकतो, आणि शक्ति शाली स्वरूपही धारण करु शकतो; जसे पाणी वाफ बनू शकते तसेच बर्फही बनू शकते. त्याचप्रमाणे सर्वेश्वराची शिव, विष्णू, गणेश, कार्तिकेय, दुर्गा, सरस्वती, काली इत्यादी नाना रूपांत आराधना केली तरी तत्वतः ती एकाच परमात्म्याची आराधना ठरते.
प्रत्येकाची आवडनिवड, रुचि निरनिराळी असते. प्रत्येकाचे संस्कार भिन्न असतात व प्रत्येकाचे संगोपनही वेगवेगळ्या वातावरणात झालेले असते. म्हणून हिंदू धर्म आपल्या अनुयायांना त्यांची मानसिक जडण घडण, आवडनिवड व आध्यात्मिक उन्नतीच्या स्तरानुसार कोणत्याही भावांत, कोणत्याही रूपात ईश्वराची आराधना करण्याचे स्वातंत्र्य देतो. हिंदू धर्मात ईश्वराच्या नानाविध भावरूपांची उत्पत्ती याच स्वातंत्र्याचे फलस्वरूप आहे. ते भिन्न ईश्वर नसून एकाच ईश्वराचे भिन्न भिन्न भाव आहेत.