इतर सणांसारखेच नवरात्राचेही अनेक पैलू आहेत. जर याचा आंतरिक अर्थ घेतला तर आपण एका साधकाची आध्यात्मिक यात्रेचा क्रम व गति त्यात पाहू शकतो. साधकाच्या या यात्रेचे तीन सोपान मानले जाऊ शकतात आणि या तीन सोपानांचे प्रतिनिधित्व करतात दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती. हे तीन सोपान पार केल्यावर दहाव्या दिवशी जेव्हा लक्ष्याची प्राप्ती होते तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
शक्तीच्या माध्यमातूनच शिवाला जाणले जाऊ शकते. मूल स्वाभाविकरीत्या आपल्या आईशी जोडलेले असते. त्याच्यात आईबद्दल अधिक जवळीक असते. आध्यात्मिक क्षेत्रातही देवीशी तादात्म्य स्थापित करणे अधिक सोपे आहे कारण ती मातृस्वरूप आहे. आदिशक्तिच आपल्याला परमशिवापर्यंत पोहोचविते.
तसेच या पर्वाचा संबंध प्रभू रामचंद्राशीही आहे. विजयादशमी दसरा, दशहरा या नावाने भारतभर प्रचलित आहे. या दिवशीच प्रभू रामचंद्रांनी दशमुखधारी रावणाचा वध करुन आसुरी शक्तीवर विजय मिळविला होता. आपण श्रीरामाची कथा जरी घेतली तरी आपल्याला त्यातून अनेक आध्यात्मिक तत्त्व व ईश्वरप्राप्तीचा संदेश मिळू शकतो. सीतादेवी मनाचे प्रतीक आहे तर श्रीराम आत्म्याचे. मन जेव्हा आत्म्यात लीन असते तेव्हा ते आनंदाचा अनुभव करते. मग ते वनात असो की राजमहालात याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. जेव्हा मनात इच्छा उठतात तेव्हा त्यांचा वास्तविक अंत दुःखातच होतो. परंतु त्या इच्छा स्वर्णमयी वेष धारण करुन मनाला भरकटायला लावतात आणि त्यातून मनाचा आत्म्याशी वियोग होतो. सीतेच्या मनात सुवर्णमृग प्राप्त करण्याची इच्छा उठली. श्रीरामाने परोपरीने समजावून सीता समजू शकली नाही आणि तिने श्रीरामाला तो सुवर्णमृग पकडून आणण्यास पाठविले. लक्ष्मण तपस्येचे प्रतीक आहे. परंतु सीतेने मोहाच्या आहारी जाऊन तपस्यारूपी लक्ष्मणालाही बाहेर घालवून दिले. आता मनरूपी सीतेकडून भगवंतही सुटला आणि तपस्याही सुटली. बाहेर जातेवेळी लक्ष्मण एक रेषा ओढून गेले ती लक्ष्मणरेषा म्हणून प्रसिद्ध आहे. ही रेषा कोणत्याही परिस्थितीत ओलांडू नये असे लक्ष्मणाने सीतेला जाता जाता सांगितले. जोपर्यंत सीता त्या रेषेच्या आतमधे होती तोपर्यंत ती सुरक्षित होती. ती रेषा होती निष्ठा आणि जीवनातील मर्यादेची. मोहग्रस्त सीता त्या रेषेच्या जवळ येताच वासनारूपी रावणाने सर्वशक्तीनिशी सीतेचे अपहरण केले आणि तिला भगवंताच्या वियोगाचे दुःख सहन करावे लागले.
दस-याला दशहरा असेही म्हटले जाते. त्याचा अर्थ आहे दहा मुख असलेल्या रावणावर विजय. ज्याने आपली दहा इंद्रिये वश केली आहे तो दशरथ आणि येथेच श्रीरामाचा जन्म होतो. जो पूर्णतः आपल्या दहा इंद्रियांच्या अधीन आहे, जो पूर्णतः बहिर्मुख आहे तो आहे दशमुख रावण. जेव्हा इंद्रियांचे दमन होते, जेव्हा दशमुखी अहंकाराचा वध होतो आणि नंतर सीतेचे श्रीरामाशी मिलन होते.
जीवनाचे ध्येय आहे आत्मसाक्षात्कार प्राप्ती, आपल्याच आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे. भगवद्गीतेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण ज्ञानीचे लक्षण सांगतात. हे यासाठी नाही की साधारणतः या लक्षणांचा मापदंड घेऊन एखाद्या महात्म्याची कसोटी पहावी किवा या कसोटीवर कोणी उतरला तर तो आत्मसाक्षात्कारी आहे असे समजावे. ही लक्षणे एवढ्यासाठी सांगितली आहेत की आपणही ही लक्षणे, हे गुण आपल्यात जाणीवपूर्वक रुजविण्याचा, ते वृद्धिगत करण्याचा प्रयत्न करावा. अम्मा म्हणतात की श्रीरामाची गाथा श्रीराम बनण्यासाठी आहे. साधना पथावर साधकाला प्रथम आपल्यातील दुष्प्रवृत्तीचे निराकरण करावे लागते. एका मर्यादेपर्यंत दुष्प्रवृत्तींचे निराकरण केल्यावर दिव्य गुणांच्या वाढीसाठी श्रम करावे लागतात आणि त्यानंतरच आत्मज्ञानाचा उदय होतो.
पहिले तीन दिवस दुर्गामातेची पूजा होते. मातेला पराशक्तिच्या रूपात, आपल्या नकारात्मक प्रवृत्तींचा विध्वंस करणाःया परमशक्तिच्या रूपात पूजले जाते. मधु आणि कैटभ भगवान विष्णुच्या कर्णमला पासून उत्पन्न झालेले राक्षस आहेत. दुर्गामोतेची पूजा या संकल्पाने केली जाते की तिने आपल्यातील मल अर्थात अहंकार व अहकारजनित इतर दुष्प्रवृत्तींचा नाश करावा. केवळ दुष्प्रवृत्तींचा नाश केल्याने आपण त्यापासून कायमचे मुक्त होत नाही. वासनांचे बीज तर सुप्तावस्थेत आपल्यामधेच असते. म्हणून पुढची पायरी आहे सद्प्रवृत्ती आणि सद्गुणांची वृद्धी. या सद्गुणांनाच भगवद्गीतेत दैवी संपत्ती म्हटले आहे. संपत्तीचा अर्थ धनही आहे. म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. लक्ष्मी केवळ स्थूल धनसंपत्ती प्रदान करणारी देवी नाही. ती तर आई आहे जी आपल्या लेकरांच्या आवश्यकतेनुसार देत असते. लक्ष्मीच आपल्याला आध्यात्मिक ज्ञानही देते, त्यापासूनच सत्याचे अमूल्य रत्न आपल्या हाती लागते.
दैवी संपत्तीने संपन्न असलेला साधकच ज्ञानाचा अधिकारी असतो. म्हणूनच शेवटचे तीन दिवस सरस्वतीची पूजा केली जाते. सरस्वती देवी ज्ञानस्वरूप आहे. ती साधकाला परमज्ञानाचे दान देते. सरस्वतीचे श्वेतवस्त्रही परमज्ञानाचे प्रतीक आहे.
दहावा दिवस सत्यप्राप्तीचा दिवस असल्याने विजयोत्सवाच्या स्वरूपात साजरा होतो. साधनेच्या माध्यमातून दुर्गुणांचे निराकरण करुन, सद्गुणांची निवड करुन, त्यांचा विकास करुन साधक जेव्हा ज्ञानप्राप्ती करतो तेव्हा तो ह्या तिन्ही पायःया ओलांडून आत्मज्ञानाची प्राप्ती करतो. आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतो.
नवरात्र केवळ साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीचा गाथाच नाही. येथे साधनाक्रमाचे निर्देशही दिले आहेत. प्रथम मनःशुद्धी झाल्याशिवाय कोणीही ज्ञानप्राप्ती करु शकत नाही. अम्मा म्हणतात की, पुस्तकपंडीत वा प्रवचनकार यांच्या केवळ जिव्हेवरच ब्रह्म असते. जीवनाच्या विभिन्न परिस्थितीत त्यांच्या वचनांचा पोकळपणा सिद्ध होतो.
नवरात्र केवळ साधकांसाठीच नाही तर सर्वसाधारण लोकांसाठीही तेवढेच महत्वपूर्ण आहे. सर्व बाधा, सर्व समस्यांचा नाश करण्यासाठी दुर्गामातेची पूजा केली जाते. लक्ष्मी सर्व सुख-ऐश्वर्य प्रदान करते आणि सरस्वती ज्ञान प्रदान करते. या तिन्हींची प्राप्ती केल्याविना जीवनाची पूर्तता होत नाही.
देवीची ही भिन्न रूपे, भिन्न शक्ती नसून ती मातेचीच भिन्न-भिन्न रूपे आहेत. आपल्या संतानाच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार पराशक्तिच भिन्न रूप व भाव धारण करते.
जाता जाता हेही सांगणे आवश्यक आहे की आपले सण अशावेळी साजरे केले जातात की त्यावेळी आपल्या उपासनेचा, आपल्या साधनेचा जास्तीत जास्त लाभ होईल.