दिनांक 27 सप्टेंबर रोजी अम्मांचा 57 वा जन्मदिन सोहळा अमृतपुरीच्या पैलतीरावरील अमृता विश्वविद्यापीठाच्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरूपात साजरा झाला.
आत्मज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असलेल्या, जन्ममृत्यूच्या पार गेलेल्या अम्मा आपला या धरणीवरील अवतरणदिन साजरा करण्यास कधीच उत्सुक नसतात. पण या निमित्ताने जगभरातील सर्व जातीधर्मांचे लाखो लोक एकत्र येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात, समाजातील दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी निष्काम भावनेने प्रेरीत होऊन सेवा करतात, म्हणून अम्मा अवतरणदिन साजरा करण्याची परवानगी देतात.
दरवर्षी जन्मदिनी अम्मा नवनवीन सेवायोजनांची घोषणा करुन त्यांची अंमलबजावणी लगेच सुरु करतात, आणि जगभरातील अम्मांचे भक्तही तोच अम्मांचा जन्मदिन संदेश समजून त्यावर कार्य सुरु करतात. यावर्षीही अम्मांनी काही अभिनव सेवा योजनांची घोषणा केली.
दरवर्षीप्रमाणे अम्मांच्या जन्मदिन सोहळ्याची सुरुवात पहाटे ‘सूर्य कालडी जयसूर्यन् भट्टात्तिरीपाद’ यांच्या महागणपती होमाने झाली. त्यानंतर हजारो भक्तांनी विश्वशांतीसाठी श्रीललितासहस्रनाम अर्चनेत भाग घेतला. त्यानंतर स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी यांचे अम्मांचे जीवन, त्यांचा उपदेश व कार्याची ओळख करुन देणारे हृदयस्पर्शी प्रवचन झाले.
सकाळी ठीक 9 वाजता अम्मांचे मंचावर आगमन झाले. मेडिकल कॉलेजच्या विथ्यार्थिनींनी मोहिनीअट्टम हे नृत्य सादर करुन अम्मांचे मंचावर स्वागत केले. स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी यांनी अम्मांच्या जगभरातील भक्तांच्या वतीने अम्मांची पाद्यपूजा केली. तदनंतर अम्मांच्या ज्येष्ठ संन्यासी शिष्यांनी जगभरातील कोट्यावधी भक्तांच्या वतीने अम्मांना पुष्पहार घालून आपली श्रद्धासुमने अम्मांना अर्पण केली. त्यानंतर अम्मांचे हृदयस्पर्शी प्रवचन झाले.
आपल्या प्रवचनात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तांना उद्देशून अम्मा म्हणाल्या, “जागतिकीकरणाच्या माध्यमातून जगभर संपर्क प्रस्थापित झाला असूनही जग अजूनही दुःख भोगतच आहे. आपले कुठे चुकले आहे? बाह्य संपर्क साधनांनी अवघे जग एखाद्या लहान खेड्यासारखे जवळ आले आहे. तथापि त्याचवेळी आपण आंतरिक सद्वस्तूंचे ऐक्य साधण्यात- सर्व हृदये व मने परस्परांशी जोडण्याकडे पुरेसे लक्ष देण्यात अपयशी ठरलो आहोत.”
निसर्गाप्रति आदरभाव विकसित करण्याची आवश्यकता, अंमली पदार्थांचे सेवन रोखण्याची आवश्यकता, धर्माधिष्ठित आचरणाची आवश्यकता, ध्यानधारणेची जीवनातील भूमिका इत्यादी अनेक विषयांना अम्मांनी स्पर्श केला.
प्रवचनाच्या शेवटी अम्मांनी भारतातील प्रदूषण व घाणीचे साम्राज्य या कळीच्या विषयाला हात घातला. त्या म्हणाल्या, “स्वच्छताच ईश्वर तत्त्व आहे. वन, सागर, पर्वत, नदी या सर्व गोष्टींना निसर्गप्रदत्त एक सौंदर्य आहे. निसर्गाला या सर्व गोष्टींची साफसफाई करण्याची गरज पडत नाही. निसर्गतः या गोष्टी घाण होत नाही, पण मनुष्य मात्र या सर्वांना घाण करीत आहे. तसेच मनुष्य जे काही निर्माण करतो ते मात्र नेहमीच साफ ठेवण्याची, दुरुस्ती करण्याची गरज पडते.
“आपली सार्वजनिक स्थळे, शौचालये, प्रसाधनगृहे, रस्ते या सर्वांची आपण घोर उपेक्षा केली आहे. सार्वजनिक स्थळे अत्यंत घाण आहेत, त्यांची सफाई होत नाही, म्हणून आपणच आपल्या देशाला पदोपदी नावे ठेवीत असतो. सार्वजनिक अस्वच्छतेमुळे बाहेरचे देशही आपल्याला हसतात. राष्टकुल स्पर्धेत खेळाडूंसाठी ज्या खोल्या बनविल्या आहेत, त्यावरही लोक पान खाऊन थुंकले आहेत. बाहेरच्या देशातील टी.व्ही. वर अस्वच्छतेचं हे सारं चित्र दाखवून ते आपल्या देशाची टर उडवित आहेत. विदेशातील मासिकांमध्ये आपल्या रस्त्यांची दुर्दशा व घाणीच्या संदर्भात खूप लेख छापून येत आहेत. हे सारं पाहून अम्माला खूप वाईट वाटते. भारत अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहे. भारत विज्ञान, तंत्रज्ञान व आर्थिक क्षेत्रात प्रगती करत आहे. प्रसिद्ध झालेले अनेक अहवाल सांगत आहेत की 2025 साली भारत जगातील तिसरी महासत्ता म्हणून उदयास येईल. असे असले तरी पर्यावरण स्वच्छता, आपल्या राहत्या परिसराची साफ-सफाई याबाबतीत मात्र आपण अजूनही खूप मागे आहोत. मातृभूमीच्या अभिमानाला गालबोट लागते तेव्हा आपल्या मनाला दुःख वाटले पाहिजे, आणि ते दूर करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याबद्दल प्रामाणिकपणे विचारही केला पाहिजे. आपल्याकडून जे काही होऊ शकते ते आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे.
“वर्तमानपत्रे, पत्रकार व टीव्ही चॅनेलच्या सहकार्याने खूप मोठे परिवर्तन घडून येईल असा अम्माचा विश्वास आहे. केरळात संपूर्ण साफसफाईचा एक नवा अध्याय सुरु व्हावा यासाठी अम्माने प्रयत्न केला आहे. सफाईच्या कामात जे काही सेवक व सेवादल कार्य करीत आहेत त्यांच्यासाठी सायकलींची व्यवस्था केली आहे.”
नंतर अम्मांनी घोषणा केली की, “राज्य सरकार व शाळांच्या व्यवस्थापन समित्यांचे सहकार्य व सहयोग असेल तर माता अमृतानंदमयी मठ भारतभरातील सरकारी शाळा व सार्वजनिक स्थळी शौचालये-स्वच्छतागृहे बांधून देण्याची जबाबदारी उचलण्यास तयार आहे. मठ सर्वप्रथम ही योजना प्रायोगिक तत्त्वावर केरळात सुरु करील आणि त्यानंतर भारतातील अन्य राज्यांतही या योजनेचा विस्तार करण्यात येईल.
“आपापल्या परिसरातील रहिवाशांनी स्वच्छता समित्या स्थापन कराव्यात. साधारणतः प्रत्येक समितीने दोन किलोमीटर अंतराची स्वच्छता करण्याची जबाबदारी उचलावी. अशा रीतीने समित्यांची शृंखला तयार झाली तर खरोखरच अभूतपूर्व परिवर्तन घडून येईल. या समित्यांनी आपापल्या भागांमध्ये कचरा कुंड्यांची व्यवस्था करावी. ‘रस्त्यावर कचरा टाकू नये’ व ‘रस्त्यावर थुंकू नये’, असा संदेश देणारे फलक जागोजागी लावावेत. कचराकुंडीत जमा झालेला कचरा वेळोवेळी काढून, त्याची प्रतवारी करुन विल्हेवाट लावावी. तसेच शाळेतील मुलांनी रस्त्यावर न थुंकता त्यासाठी त्यांना हातरूमालाचा उपयोग करण्याची सवय लागावी म्हणून शाळांमध्ये दहा लाख हातरूमाल मोफत वाटण्यात येतील. अशाप्रकारे रस्त्यावर थुंकण्याची सवय संपुष्टात आली तर कित्येक आजारांना पायबंद बसू शकेल.”
हजारो भक्तांनी टाळ्यांच्या गजरात अम्मांच्या या अभिनव घोषणेचे स्वागत केले.
अम्मांच्या प्रवचनाचे स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी यांनी इंग्रजीत भाषांतर केले. त्यानंतर त्यांनी मान्यवर अतिथींचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात ते म्हणाले, “आज सा-या जगाचे डोळे अम्मांकडे लागले आहेत, आणि अम्मा काय करत आहेत? त्या आपली दृष्टी गरीब, गरजू, निराधार विधवा, अपंग, दुःखपीडित, पददलित, आजारी, नैराश्याने ग्रासलेल्या लोकांकडे वळवित आहे. वस्तुतः हा अम्मांच्या जन्मदिन संदेशाचा- उपदेशाचाच एक भागच आहे. आपण जेव्हा स्वतःचा विचार करण्याआधी दुसःयांच्या सुखाचा विचार करतो तेव्हाच खराखुरा जन्म होतो. सारे जग तुमच्या हृदयांत घ्या आणि मुक्त व्हा. हाच तर अम्मांच्या संदेशाचा गाभा आहे.”
केन्द्रिय मंत्री श्री. श्रीप्रकाश जयस्वाल, श्री. गुरुदास कामत, श्री. के.पी. थॉमस, विदर्भातील माजी आमदार श्री. विजय जाधव, तसेच केरळ, तमिळनाडूतील अनेक आमदार या प्रसंगी उपस्थित होते.
27 सप्टेंबर रोजी श्रीमाता अमृतानंदमयी देवी तथा अम्मांच्या जन्मदिनोत्सव प्रसंगी कालडीच्या श्रीशंकराचार्य संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन.पी. उन्नी यांना त्यांच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक व भारतीय तत्त्वज्ञान या क्षेत्रातील महान योगदानाबद्दल या वर्षीचा अमृतकीर्ति पुरस्कार देण्यात आला. ब्रांझचे सरस्वती शिल्प, 123456 रूपये रोख व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. एन् पी. उन्नी यांनी सांस्कृतिक, आध्यात्मिक व भारतीय तत्त्वज्ञानावर विपुल लेखन केले आहे. याखेरीज विविध शासकीय व बिगरशसकीय शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापकाच्या भूमिकेतून त्यांनी भारतीय संस्कृतीचे संवर्धन व जोपासनेसाठी भरीव कार्य केले आहे. पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर आपल्या भाषणात ते म्हणाले, “माझे जीवन आत्मोन्नतीसाठी समर्पित आहे, आणि त्यासाठी मी सद्गुरु अम्मांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाची कामना बाळगतो. ”
अमेरिकन पत्रकार श्रीमती ज्यूडिथ कॉर्नेल यांनी इंग्रजीत लिहिलेले अम्मांचे जीवनचरित्र
“Amma: Healing the Heart of the World” या पुस्तकाच्या मल्याळम् आवृत्तीचे प्रकाशन या प्रसंगी झाले.
अम्मांचे जीवनचरित्र व उपदेशपर पुस्तकांचे संपूर्ण भारतभर वितरण करण्यासाठी ‘अमृता बुक्स’ या प्रकाशन संस्थेचेही उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले. या प्रकाशन संस्थेच्या वतीने सर्वप्रथम अम्मांचे जीवन चरित्र व स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी यांनी संकलित केलेल्या from Amma’s Heart
या दोन पुस्तकांचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.
अम्मांच्या आश्रमाची अधिकृत वेबसाईट आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध होती. या वेबसाईटच्या भारतीय भाषेतील आवृत्तींचे उद्घाटन मार्थोमा चर्चचे बिशप मार क्रिसोस्टेम मेट्रोपोलिटीन यांच्या हस्ते झाले.
www.amrita.in ही वेबसाईट आता मल्याळम, तमिळ, तेलुगु, कन्नड, मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली व संस्कृत अशा नऊ भारतीय भाषांमध्ये पाहता येईल. लवकरच गुजराथी व उडिया या भाषेतही ही वेबसाईट सुरु होईल. आता भारतीय लोक जगभरातून कोठूनही आपल्या मातृभाषेतून अम्मांचा उपदेश वाचू शकतील.
दरवर्षी अम्मांच्या जन्मदिन प्रसंगी नवनवीन सेवायोजनांचा प्रारंभ होतो. यावर्षीही अम्मांनी काही अभिनव सेवायोजनांची घोषणा केली.
अमृताश्री सुरक्षा – अमृताश्री सुरक्षा ही योजना मठाच्या पुढाकाराने सुरु झालेल्या अमृताश्री बचतगट व आर्युविमा (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने सुरु होत आहे. माता अमृतानंदमयी मठ एल.आय.सी. च्या माध्यमातून अमृताश्री बचतगटाच्या सदस्या असलेल्या एक लाख महिला व त्यांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण देईल. केन्द्रिय मंत्री श्री. गुरुदास कामत यांनी मठाच्या वतीने एल.आय.सी.चे क्षेत्रिय प्रबंधक श्री. दोरायस्वामी यांना विमा हप्ता म्हणून 15 लाख रूपयांचा धनादेश दिला. नंतर त्यांनी पॉलिसी चेक अमृताश्री बचत गटाचे संयोजक श्री. रंगनाथन् यांना सुपूर्द केले.
केरळात नुकत्याच आलेल्या वादळाने आश्रमाजवळील चार मच्छिमारांचा जीव घेतला होता. या चार मच्छिमारांच्या विधवांचा पेन्शन यादीत समावेश करुन त्यांना प्रत्येकी 1000 रूपयांचा प्रथम धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच विद्यामृतम् शिष्यवृत्ती व अमृतनिधी पेन्शन योजनेत नवीन लाभधारकांचा समावेश करुन या योजनांचा आणखी विस्तार करण्यात आला. तसेच सर्व लाभधारकांच्या पेन्शनच्या रक्कमेतही यावर्षीपासून वाढ करण्यात आली आहे. केन्द्रिय व राज्य मंत्र्यांच्या हस्ते हे धनादेश लाभार्थींना वाटण्यात आले.
अमृता विश्वविद्यापीठ व अमृता विद्यालयांचे सर्व विद्यार्थी तसेच अमृता युवा धर्मधाराच्या सर्व सदस्यांनी पर्यावरण रक्षण व संपूर्ण भारत स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या कार्यात कटिबद्ध राहण्याची शपथ याप्रसंगी घेतली. स्थानीक तरुणांनी तंबाखू, दारु व अन्य अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही अशी शपथ घेतली.
मान्यवर अतिथींनी अम्मांच्या कार्याच्या गौरव करणारी भाषणे केली.
दरवर्षीप्रमाणे 54 जोडप्यांची सामूहिक विवाहसोहळ्यात लग्ने लावण्यात आली. वस्त्र, दागिने, संसारोपयोगी भांडी इत्यादी सर्व खर्च आश्रमाच्या वतीने करण्यात आला. दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अम्मांचे मंचावर आगमन झाले आणि तब्बल चोवीस तासांनी दुसःया दिवशी सकाळी नऊ वाजता सर्व उपस्थित भक्तांना दर्शन देऊनच अम्मा आसनावरुन उठल्या.
जन्मदिन सोहळा संपवून आश्रमात परत येतांना वाटेत अम्मांनी आपल्या वयोवृद्ध आईकडे जाऊन त्या माऊलीलाही जगन्मातेच्या रूपात दर्शन देऊन धन्य केले.