माता अमृतानंदमयी मठ शाळा व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणार

अमृतपुरी, दिनांक 22 सप्टेंबर 2010 रोजी अम्मा (श्रीमाता अमृतानंदमयी देवी) म्हणाल्या की,
“जर राज्य सरकारे व अन्य संस्थांनी सहयोग व सहकार्य केले तर माता अमृतानंदमयी मठ संपूर्ण भारतभरातील शाळा व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. भारत विकास करीत आहे, असे म्हटले जात असले तरी परिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याबाबत आपण अजूनही खूप मागे आहोत. आपले रस्ते व सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था याचा पुरावा आहे.

“परदेशात रस्ते, सार्वजनिक स्थळे व स्वच्छतागृहे कमालीचे स्वच्छ व नीटनेटकी असतात. याउलट भारतातील रस्ते व सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत गलिच्छ आहेत. रस्त्याच्या बाजूला लघवी करणे, रस्त्यावर व सार्वजनिक स्थळी थुंकणे ही भारतातील लोकांची एक सवयच बनली आहे. कचराकुंडी असली तरी लोकांना कचरा व उष्टे-खरकटे अन्न कचराकुंडीत टाकण्याची सवय नाही. लोक कचरा व अन्न असेच रस्त्याच्या बाजूला, अनेकदा रस्त्यातच टाकतात. परिसर शुद्धी व स्वच्छता हे विकासाचे, संस्कृतीचे व सभ्यपणाचे एक महत्वाचे अंग आहे.

“परिसर साफ ठेवण्यासाठी आपण एक विशाल जनजागृती मोहीम हाती घेतली पाहिजे. त्यासाठी सार्वजनिक स्थळी, बस स्टँडवर व रस्त्याच्या बाजूला परिसर शुद्धी व स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले पाहिजे.”

अम्मा पुढे म्हणाल्या , ”ही मोहिम यशस्वी होण्यासाठी टी.व्ही. व वृत्तपत्रे इत्यादी प्रसारमाध्यमांचे प्रामाणिक सहकार्य व आधारही अत्यंत महत्वाचा आहे. जर राज्य सरकारे, शाळांच्या व्यवस्थापन कमिट्या व स्थानीक लोकांचा सहयोग व सहकार्य मिळाले तर माता अमृतानंदमयी मठ सार्वजनिक स्थळी व शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधून देण्यास तयार आहे. ”
सुनिश्चित नियोजन आणि विद्यार्थी व स्थानीक लोकांच्या सहकार्यातून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

ही योजना सर्वप्रथम केरळमध्ये कार्यान्वित होईल. त्यानंतर क्रमशः भारताच्या इतर राज्यात ती कार्यान्वित होईल.