हिंदू धर्म सर्वांमध्ये दिव्यत्व पाहतो. समस्त चराचराला ईश्वराचे साक्षात रूप मानतो. हिंदू धर्माच्या दृष्टीने मानव व ईश्वर दोन नाहीत, ते भिन्न नसून एकच आहे. सर्व भूतमात्रांत ते दिव्य चैतन्य व्याप्त आहे. हिंदू धर्म आपल्याला शिकवितो की स्वप्रयत्नाने कोणीही अंतस्थ दिव्यत्वाची अनुभूती करून नराचा नारायण बनू शकतो. सृष्टी व स्रष्टा भिन्न नसून ईश्वर स्वतःच सृष्टीचे रूप धारण करतो, या अद्वैत सत्याची अनुभूती घेणे, सत्याचा साक्षात्कार करणे, हेच जीवनाचे परम लक्ष्य आहे असे हिंदू धर्म मानतो.

स्वप्न हे, ते स्वप्न पाहणा-या व्यक्तीहून भिन्न नसते. परंतु स्वप्न हे वास्तव नसून स्वप्न आहे हे जाणण्यासाठी त्या व्यक्तीला जागे व्हावे लागते. खरंतर सर्वकाही ईश्वरच आहे, परंतु आपण सर्वांमध्ये ईश्वराला पाहू शकत नाही. आपण दृष्टिगोचर वस्तूंमध्ये नानात्व पाहतो. काही गोष्टी व व्यक्तींप्रति राग व काहींप्रति द्वेषाचा अनुभव करतो. परिणामतः सुख व दुःख हे आपल्या जीवनाचा स्वभाव बनतो. परंतु आपण जेव्हा आपल्या सत्य स्वरूपाप्रति जागरूक होतो तेव्हा तेथे ‘मी’ आणि ‘तू’ हा भेद उरत नाही. आपल्याला अनुभूती होते की सारंकाही ईश्वरस्वरूपच आहे. त्यानंतर मग केवळ आनंदच उरतो. या लक्ष्यप्राप्तीसाठी प्रत्येकाच्या भिन्न भिन्न संस्काराला अनुसरुन हिंदूधर्मात अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. साधनामार्ग, आचार व अनुष्ठांनाच्या बाबतीत इतकी विपुलता दुस-या कोणत्याही धर्मांत आढळून येत नाही.

आपण मातीला घोडा, गाढव, उंदीर, सिंह इत्यादी अनेक आकार देऊ शकतो. नामरूपानुसार भिन्न असूनही वस्तुतः ती मातीच असते. आवश्यकता आहे ती केवळ त्या नामरूपातही मातीच पाहण्याच्या क्षमतेची. त्यासाठी नाम-रूपाच्या आधारावर प्रपंचात नानात्व पाहणारी आपली दृष्टी बदलावी लागते. वस्तुतः एकाच सद्वस्तूने ही सारी रूपे धारण केली आहेत. म्हणून हिंदू धर्मात सर्वकाही ईश्वरच मानले जाते. ईश्वराहून भिन्न अशी कोणतीही वस्तू नाही. पशु, पक्षी, वृक्ष-वनस्पती, पर्वत, नद्या, सर्वांनाच, एवढेच नाहीतरी विषारी नागालाही ईश्वर मानून त्यांची सेवा करण्याचे, त्यांच्यावर प्रेम करण्याचे हिंदू धर्म शिकवितो.

या परमानुभूतीने आपल्याला ज्ञान होते की ज्याप्रमाणे शरीराचे भिन्न अवयव आपल्याहून भिन्न नाहीत, त्याचप्रमाणे सर्व व्यक्ती व वस्तू आपल्याहून अभिन्न आहेत. जो बोध आजपर्यंत आपल्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित होता, त्याचा समस्त प्रपंचात विस्तार होऊन तो बोध सर्वसमावेशक होतो. आपल्या पायाच्या एका बोटाला काटा टोचल्यावर आपल्याला जशी वेदना होते, त्याचप्रमाणे दुस-यांचे दुःखही आपले स्वतःचेच दुःख बनते. अग्नीच्या उष्णतेप्रमाणे, पाण्याच्या शीतलतेप्रमाणे, फुलाच्या मध व सुगंधाप्रमाणे आत्मानुभूती प्राप्त महात्म्याचा परम करुणा हा सहज स्वभाव बनून जातो. दुस-यांना सांत्वना देणे हा त्यांचा सहज स्वभाव बनतो. जेव्हा आपले स्वतःचेच बोट आपल्या डोळ्यात जाते तेव्हा आपण बोटाला शिक्षा करीत नाही. आपण त्याला क्षमा करतो. एवढेच नाही तर त्या हातानेच आपण दुख-या डोळ्याला सांत्वना देतो. याचे कारण असे की बोट व डोळा आपल्याहून भिन्न नाहीत.

दुस-यांमध्ये आत्मदर्शन करण्याच्या स्तरापर्यंत सर्वांनांच उन्नत करणे हे हिंदू धर्माचे लक्ष्य आहे. व्यक्तीपुरताच मर्यादित असलेला अस्तित्वाचा बोध अथवा ‘मी’ पणाचा बोध विश्वव्यापी बनवून व्यक्ती ईश्वराशी एकरूप होते व पूर्णत्वाला पावत. समस्त प्रपंचात ईश्वरदर्शन करण्याचा तसेच ईश्वर व आपल्यात अभिन्नतेचा अनुभव करण्याचा उपदेश हिंदू धर्म देतो. या लक्ष्यप्राप्तीसाठी कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, इत्यादी अनेक मार्गही दर्शवितो.