आज मंदिरांत जाणा-यांची संख्या बरीच वाढली आहे. परंतु त्यानुरूप चांगल्या संस्कारांतही वाढ होत आहे असे म्हणणे मात्र कठीण आहे. याचे कारण असे की आज मंदिरात आपल्या संस्कृतीचे, संस्कारांचे ज्ञान देण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही.

आपण तत्व समजून, उमजून ईश्वरभजन करायला हवे. भिन्न देवी-देवतांच्या पृथक अस्तित्वावर विश्वास न ठेवता ही सर्व भिन्न देवरूपे त्या परम ब्रह्मचैतन्याचीच विभिन्न भावरूपे वा पैलु आहेत असे मानून प्रेमपूर्वक ईश्वरभजन केले पाहिजे. ईश्वर आपल्या मनातील सा-या इच्छा, विचार जाणत असला तरी आपल्या मनातील भावना भगवंतासमोर व्यक्त करण्यात काहीही वावगे नाही. परंतु क्रमशः निष्काम भावाने ईश्वर आराधना करण्यास शिकले पाहिजे. जेव्हा भक्ती केवळ भक्तीसाठी केली जाते तेव्हा त्यातून आपल्याला सारंकाही मिळून जातं. भौतिक प्रगती व आध्यात्मिक उन्नती दोन्ही गोष्टी साधल्या जातात. केवळ निष्काम प्रेमभक्तीनेच ईश्वर साक्षात्कार संभव आहे.

आज मंदिरांत जाणा-यांची संख्या बरीच वाढली आहे. परंतु त्यानुरूप चांगल्या संस्कारांतही वाढ होत आहे असे म्हणणे मात्र कठीण आहे. याचे कारण असे की आज मंदिरात आपल्या संस्कृतीचे, संस्कारांचे ज्ञान देण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही, म्हणून लोक आज मंदिरांना केवळ आपल्या इच्छापूर्तीचे एक साधनमात्र समजतात. आज मंदिरांत जाणारे जेव्हा श्रीविग्रहासमोर दोन्ही हात जोडून डोळे मिटून उभे असतात तेव्हा त्यांच्या मनःचक्षुसमोर देवाचे नाही तर त्यांच्या इच्छांचे चित्र तरळत असते.

अम्मा असे म्हणत नाही की मनात इच्छाच असू नयेत. परंतु मनात इच्छांचीच दाटी असेल तर आपल्याला मनःशांती मिळत नाही. अनेक लोक तर एवढ्यासाठी मंदिरात जातात की त्यांना वाटते की जर त्यांनी ईश्वर भजन केले नाही, ईश्वराला संतुष्ट केले नाही तर त्यांच्या जीवनात समस्या, अडचणी येतील. आपले सर्व प्रकारे रक्षण करणारा एक ईश्वरच आहे. योग्य प्रकारच्या ईश्वर आराधनेने सर्व प्रकारच्या भयापासून मुक्तता होते. आज मंदिरातील उपासना म्हणजे तत्वज्ञान रहित केवळ अंधानुकरण आहे असे म्हटले तर त्यात काहीही अतिशयोक्ती नाही.

पित्याने मंदिराला प्रदक्षिणा घातली म्हणून मुलगाही तेच करीत आहे. मुलगा त्याच्या पित्याच्या साःया आचारांचे अनुकरण करूनच लहानचा मोठा झालेला असतो. नंतर तोच मुलगा त्याच्या मुलासह मंदिरात जातो तेव्हा जे काही आधल्या पिढीने केले होते त्याचेच पुढची पिढी अंधानुकरण चालू ठेवते. परंतु तुम्ही हे सारं का करता आहात, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर कुणीच जाणत नाहीत. दुर्दैवाची गोष्ट अशी की लोकांचे हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांना आवश्यक ते ज्ञान देण्याची व्यवस्थाही आज आपल्या मंदिरांत नाही.

एक माणूस त्याच्या घरातील देवघरात नित्यनेमाने कुलदेवतेची पूजा करीत असे. एके दिवशी पूजेची सारी तयारी करून तो पूजेला बसला असता मांजरीने नैवेद्यासाठी बाजूला ठेवलेले दूध पिऊन टाकले. दुस-या दिवशी त्या माणसाने पूजेची तयारी केल्यावर मांजरीला पकडून टोपलीखाली कोंडून ठेवले व पूजा झाल्यावर तिला मोकळे सोडले. हे खरं आहे की त्या मांजरीतही ईश्वराचा वास आहे, पण सगुण उपासनेत बाह्य शुद्धीला अत्यंत महत्व दिले जाते. कारण बाह्य शुद्धीच अखेर आपल्याला आंतरिक शुद्धीच्या दिशेने घेऊन जाते.

कालांतराने पूजेच्या आधी मांजरीला टोपलीखाली कोंडून ठेवण्याचा एक दैनंदिन प्रघातच बनून गेला. अनेक दिवस उलटले. एके दिवशी त्या माणसाचे निधन झाले. पूजेची जबाबदारी थोरल्या मुलावर येऊन पडली. पूजेच्या आधी मांजरीला टोपलीखाली डांबून ठेवण्याचा प्रघात मुलानेही अनेक दिवस पाहिला होता. म्हणून त्याने तो प्रघात तसाच पुढे चालू ठेवला. एके दिवशी पूजा सुरु करण्याआधी तो जेव्हा मांजरीला शोधू लागला तेव्हा त्याला ती मेली असल्याचे आढळून आले. परंतु त्याने वेळ वाया घालविला नाही, त्वरीत शेजा-याच्या घरी जाऊन त्यांची मांजर घेऊन आला आणि तिला टोपलीखाली डांबून पूजेला सुरुवात केली!

आपले वडील कशासाठी मांजरीला टोपलीखाली डांबून ठेवीत होते ही साधी गोष्टही मुलाने समजून घेण्याची तसदी घेतली नाही. जे पित्याने सोयीसाठी केले त्याचेच मुलाने अंधानुकरण केले. थोड्याशा जिज्ञासेने विचारपूस करण्याचीही त्याची तयारी नव्हती. आज अधिकांश लोक अशाप्रकारेच आचारांचे पालन करीत आहेत. त्या आचारांचे आंतरिक तत्त्व समजावून घेण्याची थोडीशीही तसदी ते घेत नाहीत. जे पूर्वजांनी केले होते, त्याचेच समजून उमजून न घेता अंधानुकरण करतात. आपण असे अंधानुकरण करू नये. आपण ज्या कोणत्या धर्माचे अनुयायी असू, आपल्या धर्मातील आचारांचे आंतरिक तत्त्व समजावून घेतले पाहिजे. असे केले तरच प्रचलित अनाचार संपुष्टात येतील किवा काही अनाचार असतील तर त्यांचे निवारणही करता येईल.

अध्यात्म, मंदिरातील उपासना व पूजाअर्चनेसंबंधी निहित तत्वांविषयी सर्वसामान्य जनतेला ज्ञान देण्याची व्यवस्था मंदिराशी संलग्न होऊनच असली पाहिजे. मंदिरे मानव मनात संस्कार रुजविण्याचे केन्द्र बनावेत. अशाप्रकारे धर्मजागृती केली तर आपण आपल्या संस्कृतीचा गौरवशाली वारसा पुन्हा प्राप्त करू शकतो.ॐ