मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला पूर्णपणे ईश्वरावर केन्द्रित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनातल्या मनात मंत्रजप करीत प्रदक्षिणा घालाव्यात. दर्शन झाल्यानंतर दोन्ही हात जोडून, डोळे मिटून उभे राहून एकाग्र चित्ताने गाभा-यातील देवरूप आपल्या मनःचक्षूंनी पहावे, ध्यान करावे. मंदिरात जाऊन केवळ बाह्य रूपाचे दर्शन करणे पुरेसे नाही. दररोज ईश्वरध्यानासाठी थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे. यथासंभव मंत्रजप करीत रहावे. अशाप्रकारे आपण शक्तिसंचय करु शकतो. अनेक विभक्त धारांनी वाहणारे नदीचे पाणी एकत्र केले तर त्याचा एक विशाल शक्तिशाली प्रवाह बनतो. त्या प्रवाहात अपार शक्ती असते. त्यातून वीजनिर्मितीही होऊ शकते. त्याचप्रमाणे अनेक विचारधारांनी मनाच्या शक्तीचा अपव्यय होतो. त्याला एकाच विचारावर केन्द्रित केले तर त्याची एक महान शक्ती बनेल. जर साधारण व्यक्तीची तुलना वीजेच्या एखाद्या खांबाशी केली तर तपस्वीची तुलना ट्रान्सफार्मरशी करु शकतो.