सारंकाही चैतन्यस्वरूप आहे. मंदिर उपासनेच्या माध्यमातून सर्वांमध्ये त्या चैतन्याचे दर्शन करून सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा व सर्वांची ईश्वरभावनेने सेवा करण्याचा मनोभाव प्राप्त केला पाहिजे. हा सर्वांना स्वीकार करण्याचा मनोभाव आहे.

प्रश्न – जर ईश्वर सर्वव्यापी आहे तर मग मंदिरांची काय आवश्यकता आहे?
अम्मा – सनातन धर्माचे हे वैशिष्ट्य आहे की तो प्रत्येक व्यक्तीच्या स्तरावर जाऊन त्याचा उद्धार करतो. नाना संस्कारांचे लोक असतात. सर्वांचा मानसिक स्तर एकच नसतो. म्हणून प्रत्येकाच्या संस्कारानुरूपच मार्गदर्शन केले पाहिजे. दूधपित्या तान्ह्या बाळाला मांस खाऊ घातले तर ते त्याला पचणार नाही. त्याला त्याच्या अनुरूप आहार दिला पाहिजे. काही रुग्णांना इंजेक्शनची अलर्जी असते, म्हणून त्यांना औषध गोळीच्या स्वरूपात दिले जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शारीरिक व मानसिक जडणघडणीनुसारच योग्य त्या मार्गाचा उपदेश केला पाहिजे. या तथ्याच्या आधारावरच हिंदू धर्मातील विभिन्न संप्रदायांचा उद्भव झाला आहे. सगुण उपासना, निर्गुण उपासना, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग या सा-यांचा उद्भव हाच आधार आहे. या सर्व मार्गांचे आधारभूत तथ्य नित्यानित्य वस्तुविवेकच आहे. भजन, पूजन, अर्चना या सर्वांचे लक्ष्य हेच आहे.

अंधाला ब्रेल लिपीच्या सहाय्याने शिकविले जाते; बधिरांना सांकेतिक भाषेत शिकवावे लागते. सर्वांना त्यांच्या स्तरानुसारच ज्ञान देऊन मार्गदर्शन करता येते. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या स्तरावर जाऊन, त्यांचा उद्धार करण्यासाठी मंदिरांची आवश्यकता आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.

वायू सर्वत्र व्याप्त आहे, परंतु पंख्याजवळ बसल्यावर सुखद वाटते ना? वृक्षाच्या सावलीत एक विशेष शीतलता असते जी अन्य स्थळी आढळून येत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या उपाधीच्या माध्यमातून ईश्वराची पूजा केली जाते, तेव्हा ईश्वराचं सान्निध्य अधिक तीव्रतेने अनुभवास येते. सूर्यप्रकाश सर्वत्र आहे, परंतु बंद खोलीत प्रकाश मिळण्यासाठी दिवा पेटवावा लागतो. गाईमध्ये दूध आहे परंतु तिचा कान पिळल्याने ते दूध मिळणार नाही. दूध तर आंचळातूनच मिळेल. ईश्वर सर्वव्यापी असला तरी मंदिरातील मूर्तीवर विश्वास ठेवणा-यांना सहजतेने त्याची उपस्थिती जाणवते. परंतु त्यासाठी विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. विश्वासाचा अर्थ आहे मनाचे ट्यूनिग, किवा मनाला ईश्वराशी जोडणे. मंदिरात ईश्वराची उपस्थिती असली तरी अविश्वासी लोकांना त्याची अनुभूती होणार नाही. विश्वासामुळेच अनुभूती होते.

एकदा अम्मा व आश्रमवासी नृत्याचा कार्यक्रम पाहत होते. एक विदेशी जोडपे विदेशी नृत्य करीत होते. त्यांचे हातात हात घेऊन नृत्य करणे एका मुलीला आवडल नाही. ती मुलगी बोलली, “छीः! हे कसले घाणेरडे नृत्य आहे, स्त्री-पुरुष एकसाथ नृत्य करताहेत!“ यावर अम्माने तिला म्हटले, “जर शिव-पार्वतीने असे एकसाथ नृत्य केले तर ते पाहून तुला लाज वाटेल का?

आपण शिवपार्वतीला दिव्य मानतो म्हणून आपल्याला त्यांच्यात काहीही वाईट दिसणार नाही. आपण जेव्हा ‘शिवपार्वती’ म्हणतो तेव्हा त्यात एक दिव्यत्व येते. म्हणून आपण त्यांना श्रेष्ठ मानतो. हे सारं विश्वासावरच अवलंबून आहे. आपण इतर स्त्रीपुरुषांत दिव्यत्व पाहू शकत नाही, म्हणून त्यांचे नृत्य आपल्याला घाणेरडे वाटते. अर्थात, आपला मनोभावच मुख्य आहे. विश्वासात दृढ प्रतिष्ठित होऊन आपण प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याला ईश्वरदर्शन होईल, विश्वासच मुख्य पाया आहे.

ज्या मंदिरात वा प्रार्थनास्थळात अनेक लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात तेथील वातावरण इतर स्थळांतील वातावरणाहून वेगळे असते. दारुचा गुत्ता व ऑफिसचे वातावरण एकसारखे नसते. तसेच मंदिराचे वातावरण व दारुच्या गुत्याचे वातावरण परस्परांहून पूर्णतः भिन्न असते. लोक दारुच्या दुकानात मनोबळ गमावून बसतात. याउलट मंदिरात मनोबळ वाढते, मनोबळाचा विकास होतो. मंदिरे, प्रार्थनास्थळे सद्तरंगाने संपृक्त असतात. त्या वातावरणात विचलीत मनालाही शांतीचा अनुभव येतो. अत्तराच्या कारखान्यात एक वैशिष्ट्य असते, तेथील वातावरण सुगंधी असते. याउलट इतर रसायने बनविणाःया कारखान्यांचे वातावरण अत्तराच्या कारखान्याहून भिन्न असते. मंदिराचे भक्तिभावाने भरलेले वातावरण, तेथील पावन दृश्य या साःया गोष्टी मनाची एकाग्रता साधण्यास, आपल्यात भक्तिभाव जागविण्यास सहाय्यक ठरतात. मंदिर आरशासारखे असते. स्वच्छ आरशात आपण आपल्या चेहःयावरील घाण स्पष्ट पाहू शकतो व ती साफही करू शकतो. त्याचप्रमाणे आपली आंतरिक अशुद्धी निवारण करण्यासाठी मंदिरे सहाय्यक ठरतात.

ईश्वर आराधनेची पहिली पायरी आहे- मंदिरोपासना. देवाची उपासना करण्यासाठी व त्याच्याशी व्यक्तिगत संबंध स्थापित करण्यासाठी मंदिरे व तेथील देवविग्रह यांचे सहाय्य होते. परंतु आपण क्रमशः सर्वत्र ईश्वरीय चैतन्याचे दर्शन करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. मंदिरात योग्य मनोभावाने उपासना करूनच हे शक्य होईल. हाच मंदिर उपासनेचा उद्देश आहे.

आपण मुलांना बालपणी पक्ष्यांची चित्रे दाखवून शिकवितो. पोपट मैनेचे चित्र दाखवून त्यांना शिकवितो की हा पोपट आणि ही मैना आहे. मोठे झाल्यावर ते पोपट व मैनेतील फरक सहज ओळखू शकतात, त्यासाठी त्यांना चित्रांची गरज पडत नाही. परंतु प्रारंभी मात्र त्यांची जरुरी असते. वस्तुतः सर्वकाही ईश्वरच आहे. या अर्थाने काहीही नाकारता येणार नाही. घरात वरच्या मजल्यावर जाणारा जिना व गच्ची दोन्ही त्याच दगड-वाळू व सीमेंटने बनलेले असते. परंतु आपल्याला वर चढण्यासाठी जिन्याची जरुरी पडते. मंदिरांचेही हेच प्रयोजन आहे.

असे म्हणतात की मंदिरात जन्म घेऊ शकतो परंतु तिथेच मरता कामा नये. ईश्वराचा शोध घेण्यासाठी मंदिराचा एक उपाधी म्हणून उपयोग करू शकतो. परंतु त्यातच गुरफुटून राहू नये. सर्व बंधनातून मुक्त झाल्यावरच आपण मुक्त होतो. ईश्वर फक्त मंदिरातच आहे अशी अवधारणा कधीच बनवून घेऊ नये.

सारंकाही चैतन्यस्वरूप आहे. मंदिर उपासनेच्या माध्यमातून सर्वांमध्ये त्या चैतन्याचे दर्शन करून सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा व सर्वांची ईश्वरभावनेने सेवा करण्याचा मनोभाव प्राप्त केला पाहिजे. हा सर्वांना स्वीकार करण्याचा मनोभाव आहे.

तुम्ही आणि तुमच्या दाहिदिशांना पसरलेले हे विश्व, हे सारं ईश्वरीय चैतन्याने ओतप्रोत आहे. सर्वांमध्ये एकत्वाचे दर्शन करून स्वतःमधेच सर्वांना पाहण्याचा मनोभाव विकसित केला पाहिजे. आपण जेव्हा सर्वांमध्ये ईश्वराचे दर्शन करू तेव्हा मग आपण तिरस्कार करायचा ठरविला तर कुणाचा करू? मंदिरातील उपासना व त्यासंबंधित आचारविचार या सर्वांचे लक्ष्य व्यक्तीला या स्तरापर्यंत उन्नत करणे हेच आहे. सागर व त्याच्या लाटा पाहताना भले भिन्न वाटतील परंतु ते दोन्हीही पाणीच आहे. कंठहार, कंकण, अंगठी, पैंजण – हे सारे अलंकार भिन्न भिन्न दिसतील. हे अलंकार शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर धारण केले जातात. परंतु मूलतः ते सारे सोनेच असत. आपण जेव्हा सुवर्णाच्या दृष्टीने पाहतो तेव्हा सारे एकच आहे, त्यांच्यात काहीच भेद नाही. परंतु आपण जेव्हा त्यांचा बाह्य आकार पाहतो तेव्हा ते भिन्न वाटतात. याचप्रमाणे आपल्याला सारे लोक बाह्य रूपाने भिन्नभिन्न प्रतीत होतात, परंतु तत्त्वतः सारंकाही एकमेव परब्रह्मच आहे. केवळ तेच एकमेव ब्रह्मचैतन्य सर्वत्र विराजमान आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती घेणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य आहे. या अनुभूती बरोबरच व्यक्तीच्या सा-या समस्यांचा अंत होतो, जसे सूर्योदय झाल्यावर अंधःकार दूर होतो. आज आधुनिक शास्त्रज्ञही म्हणतात की सारी उर्जेचीच भिन्न रूपे आहेत. ऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वी आपल्या अनुभवाच्या आधारे एक पाऊल पुढे टाकून घोषणा केली की सारंकाही चैतन्यस्वरूप आहे- ‘सर्वं ब्रह्ममयम्’।

जर या सत्याची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला ‘ईश्वर केवळ मंदिरातील मूर्तीपुरताच सीमित आहे या विश्वासाचे उल्लंघन करावे लागेल. सर्वांमध्ये त्या चैतन्याचे दर्शन केले पाहिजे. त्यासाठी तत्त्व समजून मंदिरोपासना करायला हवी. खरेतर आपल्या अंतरात वास करणा-या आत्मचैतन्याचीच आपण उपासना केली पाहिजे. परंतु सर्वसामान्य लोकांसाठी हे कठीण आहे म्हणून ज्याप्रमाणे आरशात प्रतिबिब पाहतो तसे आपण हे आत्मचैतन्य मंदिरातील देवविग्रहात पाहून त्याची उपासना करतो. मंदिर उपासनेच्या माध्यमातून आपण आपल्या अंतरात मंदिर निर्माण केले पाहिजे. मग आपण सर्वत्र ईश्वरदर्शन करू शकू. हे मंदिर उपासनेचे आधारभूत लक्ष्य असले पाहिजे.

आपण मंदिराच्या गाभा-यासमोर देवविग्रहाचे दर्शन केल्यानंतर डोळे बंद करतो. यावरून याच तत्त्वाचा बोध होतो. बाहेर ज्या ईश्वररूपाचे दर्शन केले तेच रूप डोळे बंद करून आपल्या हृदयांतही पाहणे, मग त्यानंतर डोळे उघडून सर्वांमध्ये तो ईश्वर पाहणे. अशाप्रकारे नामरूपाच्या पार जाऊन सर्वव्यापी आत्मचैतन्याचा साक्षात्कार करू शकू.