ओणम 23 ऑगस्ट 2010
माझ्या मुलांनो, ओणमचा सण भक्ताचे परमात्म्यात विलीन होण्याचे स्मरण करुन देतो. आपले मन समर्पित करुनच आपण भगवद्चरणी लीन होऊ शकतो. मन समर्पित करण्याचा काय अर्थ आहे? ज्या वस्तूत आपले मन अत्याधिक आसक्त असते, ती वस्तू देवाला अर्पण करणे म्हणजे आपले मन समर्पित करणे होय. आज आपले मन धनामध्ये सर्वाधिक आसक्त आहे. आपण दुस-याला थोडेसेही पैसे देऊ इच्छित नाही. आपण तीर्थक्षेत्री जातो, पण भिका-यांना देण्यासाठी सुट्टे पैसे आधीच जमा करुन ठेवतो. अशा मनोभावामुळे दानाचा मूळ उद्देशच नष्ट होतो. आपली स्वार्थीबुद्धी थोडीतरी कमी व्हावी आणि गरीबांच्या गरजाही भागाव्यात, हा दानामागील उद्देश आहे. पण आपण देवाला काही अर्पण करण्यामधेही कंजूषी दाखवितो. समर्पण केवळ शब्दांचे नसावे तर आपल्या कर्मातून ते व्यक्त झाले पाहिजे. जो पूर्ण समर्पण करतो तोच खरा भक्त समजला जातो.
आज आपली स्वार्थीवृत्ती पाहता आपल्याला ‘भक्त’ शब्द उच्चारण्याचाही अधिकार नाहीये. राजा महाबली असा नव्हता. त्याच्याजवळ जे काही होते, ते त्याने भगवंताला अर्पण केले होते, आणि सर्वस्वाचे समर्पण केल्यावर त्याला परमपद प्राप्त करण्यास पळभरही विलंब लागला नाही. लोक अनेकदा म्हणतात की, ‘भगवान विष्णूने महाबलीला पायदळी दाबून पाताळात पाठविले.’ पण हे खरे नाही. भगवान विष्णूने महाबलीच्या आत्म्याला स्वतःमध्ये विलीन केले आणि अज्ञानाची निपज असलेल्या त्याच्या शरीराला पाताळात पाठविले.
महाबली असुर कुळात जन्मलेला असूनही तो एक थोर भगवद्भक्त होता. त्याच्यामध्ये अनेक सद्गुण होते. परंतु त्याच्यात एक मोठा दुर्गुणही होता. मी एक चक्रवर्ती सम्राट आहे, मी कोणतेही दान देऊ शकतो, असा त्याला अहंकार होता. तो स्वभावाने महादानी असला तरी त्याच्या अहंकारामुळे त्याला दानाचा पूर्ण लाभ मिळत नव्हता. अहंकारामुळे त्याची केवढी मोठी हानी होते आहे, हे त्याला स्वतःलाच ठाऊक नव्हते! भक्तांचा अहंकार दूर करणे हे तर भगवंताचे कर्तव्यच आहे. म्हणून भगवान विष्णू वामन अवतार घेऊन महाबलीकडे गेले आणि त्याच्याकडे तीन पावले भूमीचे दान मागितले. महाबलीला वाटले, हा बटू माझ्यासारख्या महादानी, उदार राजाकडे फारच कमी दान मागत आहे. परंतु बटूच्या रूपात आलेल्या भगवान विष्णूने दोन पावलातच सारी पृथ्वी व अंतरिक्ष व्यापले, आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू असे महाबलीला विचारले. तेव्हा कुठे महाबलीचा अहंकार चक्काचूर झाला. त्याला वाटले, ‘माझे राज्य किती क्षुद्र आहे ! भगवंतासमोर मी काहीच नाही, माझी योग्यता काहीच नाही. सारी शक्ती भगवंताचीच आहे.’ महाबलीने भगवंताच्या चरणी लोटांगण घेतले. तो परमात्म्यात विलीन झाला. वस्तुतः जेव्हा त्याचा ‘मी-माझे’पणाचा भाव भगवंताने नष्ट केला तेव्हा तो भगवंताच्या चरणी लीन झाला. भगवंताने महाबलीला पाताळात पाठविले, असे जे म्हटले जाते ते सत्य नाही.
शेवटी भगवंताने महाबलीला विचारले, “तुझी काय इच्छा आहे? ” यावर तो म्हणाला, “भगवंता! माझी एकच इच्छा आहे, जगातील सर्वांना पोटभर खायला मिळो, सर्वांना नेसण्यासाठी अंगभर चांगले वस्त्र मिळो, आणि ते सर्व एकसाथ आनंदाने नाचो, गावो सगळीकडे शांती व आनंदीआनंद होवो. ” कोणत्याही सच्च्या भक्ताची हीच एक इच्छा असते. खरा भक्त आत्मज्ञान वा मोक्षाची कामना करीत नाही. तो सर्व भूतमात्रांच्या सुखाची कामना बाळगतो.
तुम्ही जेव्हा ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर चालता तेव्हा काही लोक तक्रार करतात की तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी दुस-यांचा त्याग केला. परंतु एक भक्त जेव्हा भगवंताला शरण जातो तेव्हा ते जगावर प्रेम करण्यासाठी, जगाची निःस्वार्थभावाने सेवा करण्यासाठी असते. तो तेवढ्यासाठीच तप करतो. त्याचे स्वप्न असते अशा एका जगाचे जेथे सर्वांनी हरिनाम, भजन-संकीर्तनाचा आनंद लुटावा.
आजचा ओणमचा दिवस पूर्ण समर्पणाचा दिवस आहे. जोपर्यंत भक्तात ‘मी’पणाचा भाव शिल्लक असेल, तोपर्यंत तो परम अवस्थेत लीन होऊ शकणार नाही. स्वार्थीवृत्ती पूर्णपणे मिटली पाहिजे. एक कथा ऐका-
पूर्वी मगध देशात जयदेव नामक राजा राज्य करीत होता. त्याला तीन पुत्र होते. वृद्ध झाल्यावर त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचे ठरविले. त्याची इच्छा होती की तीन पुत्रांपैकी जो प्रजेवर निःस्वार्थभावाने प्रेम करतो त्याला माझ्या पश्चात राज्य मिळावे. त्याने तिन्ही राजपुत्रांना बोलावून विचारले, ”तुम्ही मागील काही दिवसांत एखादे चांगले काम केले आहे का?“
ज्येष्ठ राजपुत्र म्हणाला, “होय, एका मित्राने माझ्याकडे काही हिर ठेव म्हणून ठेवले होते. नंतर त्याने मागितल्यावर मी सर्वच्या सर्व परत देऊन टाकले. ”
राजा – “तर मग? ”
राजपुत्र – “जर मी ठरविले असते तर त्यातील काही चोरुन माझ्याजवळ ठेऊ शकलो असतो.
राजा – “मग का नाही ठेवलेस? ”
राजपुत्र – “चोरी केली असती तर माझ्या अंतरात्म्याने मला टोकले असते. मी फार दुःखी झालो असतो. ”
राजा – “तर मग तू दुःखातून वाचण्यासाठी हिरे परत केलेस! ”
नंतर त्याने मधल्या पुत्राला विचारले असता तो म्हणाला, ”एकदा मी प्रवासात होतो, एका गावात नदीत एक माणूस बुडत होता. पाण्याचा प्रवाह फार तेज होता आणि त्या नदीत मगरीही होत्या. किनाःयावर खूप लोक उभे होते, पण कोणीही नदीत उडी मारण्यास तयार नव्हता. अखेर मी नदीत उडी मारुन त्या माणसाला वाचविले. ”
राजा – “तू तुझा जीव का धोक्यात घातलास? ”
दुसरा राजपुत्र – “नाहीतर लोक मला काय म्हणाले असते? ते मला भित्रा म्हणाले असते. ”
राजा – “छान! लोकांनी तुला चांगला शूरवीर म्हणावे, तुझी प्रशंसा करावी म्हणून तू हे कार्य केलेस! ”
नंतर राजाने तिसःया पुत्राला विचारले असता तो म्हणाला, “मला ठाऊक नाही की मी कधी एखादे चांगले काम केले आहे. ”
हे ऐकून राजा विचारात पडला.
त्याचा विश्वास बसला नाही. त्याने दरबार भरवून प्रजेला विचारले, ‘धाकट्या राजपुत्राने एखादे चांगले काम कल्याचे तुम्हाला आठवत असेल तर सांगा.’
लोकांनी सांगितले, “ते फार सज्जन व विनम्र आहेत. ते आमच्या सुखदुःखाची जाणीव ठेवतात. ते आम्हाला पैसे व भोजन देऊन मदत करतात. बेघर लोकांना घरं बांधून देतात. त्यांनी चांगली कामे खूप केली आहेत, पण त्यांनी या कामाविषयी कोणालाही न सांगण्याची आम्हाला आज्ञा दिली आहे. ”
राजा खूष झाला. तो धाकट्या राजपुत्राला म्हणाला, “तू माझा उत्तम पुत्र आहेस. ” आणि त्या पुत्राला राज्य देऊन राजाने निश्चिंत होऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारला.
माझ्या लेकरांनो, तुम्ही कोणतेही सद्कर्म करा, पण हे काम ‘मी करत आहे’ ही अहंभावना मनात येता कामा नये. तुमचे काम दुस-यांची प्रशंसा मिळविण्यासाठी असता कामा नये. प्रत्येक कर्म ईश्वरपूजा समजून करा. भगवंताने दिलेल्या शक्तीमुळेच आपण कर्म करु शकतो. जसे एखाद्या विहिरीने म्हणावे, ‘पहा लोक माझे पाणी पितात, माझ्या पाण्याने आंघोळ करतात, कपडे धुतात. माझे पाणी किती लोकांच्या कामी येते.’
पण विहिरीने आधी हा विचार करावा की हे पाणी येते कुठून?
माझ्या लेकरांनो, आपण ईश्वराच्या हातातील केवळ एक उपकरण आहोत. सारी शक्ती ईश्वराची आहे, या गोष्टीचा कधी विसर पडू देऊ नका. तुम्ही जीवनात जसजसे पुढे जाल तसतसे भगवंताला अधिकाधिक समर्पण करीत राहा. भगवंत तुमचे रक्षण करील. आपले प्रेम व बंधन ईश्वराशी असले पाहिजे. आज आपण ज्यांना आपले म्हणतो, परिस्थिती बदलल्यावर ते आपल्याला सोडून जातील. परमात्माच आपला एकमेव सगासोयरा आहे. तोच नित्य सत्य आहे, हा बोध सदैव टिकून राहिला पाहिजे, तरच आपण दुःखापासून वाचू शकतो.
प्रार्थना करा, “हे आई जगदंबे! जर मी तुझा हात पकडला तर एखादे खेळणे पाहून तुला सोडून पळून जाऊ शकतो. कधी संसाराच्या सुखदुःखात सापडू शकतो. पण हे आई! जर तू माझा हात पकडला तर अशी वेळ येणार नाही. तू सदैव माझ्याबरोबर असशील आणि मी तुझ्या हातात सुरक्षित राहीन.’ ही प्रार्थना मनात सदैव टिकून राहावी. भगवंताचे विस्मरण होता कामा नये. पूर्ण समर्पण करा, मग निश्चितच तुम्ही परम अवस्था प्राप्त कराल. –